अचाट गाणी आणि मेंदूला किल्ली!! – पिंगा

अचाट गाणी आणि मेंदूला किल्ली!! – पिंगा

अचाट गाणी आणि मेंदूला किल्ली!! – पिंगा

बिचारी माझी सहकर्मचारिणी !!!
(तिला आपण सहचा म्हणूया.)
काय झालं असं हा तुमचा प्रश्न असेल, मी कसं बरोबर ओळखलं !! जात्याच हुशार ना ! काय करणार. काही जण तर मला मनकवडी म्हणतात. असो. स्वस्तुती फार होतेय.
तर थोडक्यात प्रसंग असा घडला की , सहचाला लग्नाला जायचे होते. सीमांतपूजन गाठण्यासाठी ह्या बाईसाहेब हिंजवडी पट्टा ३ वरून नगर रोड ला (आणि तेही ऑफिस नंतर म्हणजे ट्रॅफिकची पीक (??) वेळ ) वाघोलीस्थित असणाऱ्या एका कार्यालयात (मंगल कार्यालय हो . ऑफिस नाही काही.. ) जाणार होत्या.
पण ह्या प्रवासापेक्षाही साहसी काम म्हणजे त्या मंगल प्रसंगी नातेवाईक आणि मित्रमंडळी ह्यांनी मिळून एक नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला होता (संगीत म्हणतात म्हणे त्याला, ते कार्यक्रम पाहून खरे “संगीत ” चक्कर येऊन कोसळेल खरे तर!! चित्रपटात दाखवतात म्हणून हल्ली लोक खऱ्या आयुष्यात काय
करतील ते सांगता येत नाही. ) ह्या संगीत मध्ये सहचा निवेदन करणार होती.खरी गोम तर पुढेच आहे. तिने मला गाणी कुठली बसवली ह्याची एक यादी वाचून दाखवली. त्यात अग्रक्रमी असणाऱ्या गाण्याचे बोल (की नाव ?) पाहून माझ्या मनात अष्टसात्विक भाव दाटून आले आणि मी मनोमन तिला नमस्कार केला. (खरा नमस्कार केला असता तर थँक यू म्हणाली असती ती!. Lack of understanding of sarcasm!! दुसरे काय! तुम्ही तिला भोळी म्हणाल!! काहीही म्हणा. ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)
तर ते अत्यंत लोकप्रिय गीत जे ही मंडळी लग्नात नृत्याविष्काराद्वारे सादर करणार होती त्याचे नाव (कि बोल??) आहे:
———————————————–पिंगा—————————————-
हो हो तेच ते. बाम मधलं (कु?)प्रसिद्ध गाणं.
लौकिकार्थाने चित्रपटात त्या दोन सुंदर अभिनेत्री सवती असतात, एक राजाची official राणी असते आणि दुसरी पण official असते पण agreement format वेगळा असल्यामुळे थोडे issues असतात. तर मला सांगा आताच्या काळात स्वतःच्या किंवा कोणाच्याही लग्नात हे गाणं योग्य ठरेल का, सादरीकरणासाठी ?
केवळ चाल चांगली आहे आणि गायिकेने उत्तम गायलंय , स्टेप्स पण जमतील म्हणून ??? नशीब, “माझ्या मंगळागौरीच्या वेळी मी हेच गाणं बसवणार आणि नाच करणार ” अस कोणाकडून ऐकायला लागला नाहीये अजून आयुष्यात !
ह्या गाण्याचं नाव (कि बोल? जाऊ दे. काय फरक पडतो.जे काही असेल त्याचा ) उल्लेख आला आणि माझ्या मनात गाण्याबद्दल स्वतःचं मत असलेले विचार थैमान घालू लागले.
ह्या विचारचक्रात एकटीच पिळवटून निघण्यापेक्षा तुमचं डोकं खाणं बरं म्हणून ते विचार जसेच्या तसे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.
(विचार मांडले की त्रास कमी होतो असा अस्मादिकांचा अनुभव आहे. ते इतर कोठे व्यक्त करण्याने लोक दूर पळू शकतात असाही अनुभव आहे म्हणून हा लेखन प्रपंच !! आणखी एक,कुणी ह्या गाण्याचा चाहता असेल तर त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशा लोकांनी मनाला लावून घेऊ नये! चील मारावं. इंग्लिश मधला चील , हिंदी मधला नाही , काय म्हणालात आवरा !! ही ही !! )

तर विषय आहे पिंगा गाणं. ह्या संदर्भात काही प्रश्न पडलेत ते असे:
पीसी डीपीला साडी नेऊन देते आहेर म्हणून अस गाण्याच्या आधी दाखवलय आणि ही डीपी बया लगेच ती नऊवारी साडी नेसून मंगळागौरी च्या कार्यक्रमासाठी हजर!!
प्रश्न १. दागिन्यांचं काय?? आम्हा बायकांना मुळी दागिन्यांची फार हौस !! एखाद्या साडीवर योग्य आणि मनाला पटणारे दागिने किंवा accesories मिळेपर्यंत किमान महिना जातो. पण हिच्याकडे लगेच होते, तेही मराठमोळ्या पद्धतीचे. तिच्या collection मध्ये तिच्या एरवीच्या फॅशन मधले दागिने असतील ना. हे वेगळ्या पद्धतीचे असूनसुद्धा तिच्याकडे ५ मिनिटात उपलब्ध झाले !! मानलं !!
प्रश्न २: नऊवारी साडी डीपी ला आधीपासून नेसता येत होती का? इथे शिकायची अशी घोषणा करून ६ महिने झाले पण अजून मुहूर्त लागला नाही. खरंच hats off!!
प्रश्न ३: साधारण सारख्या रंगाची आणि पॅटर्न ची साडी एका ललनेने ने दुसरीला (तेही almost सवतीला) द्यावी म्हणजे महा आश्चर्य!!!
(आठवा ती जाहिरात, “उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यो ?? आखिर क्यो ???”)
उत्तर पुढील प्रश्नात !
प्रश्न ४: नऊवारी साडी डीपी च्या उंचीला पुरली नाही असं दिसत आहे, इथे दावा साधला आहे पीसी बाईंनी !!
प्रश्न ५: हळदी कुंकू लावल्यानंतरचा प्रसंग झाल्यानंतर मला फक्त हळदीचा रंग दिसला !!
(कुणाचं काही वेगळ म्हणणं आहे का ? कृपया सांगा !!)
प्रश्न ६: गाणं सुरु होण्यापूर्वी पीसी थोडीशी रडते आणि लगेच तिची मैत्रीण येऊन तिला बोलवते, (त्या दोन मुली कोण आहेत ??) मग अगदी आनंद झाल्याप्रमाणे (अरे वा, आता माझा डान्स आहे , चला चला ह्या पोझ मध्ये )डाँसिन्ग एरिया मध्ये येते. इकडे कोरस मध्ये पिंगा ह्या शब्दाचा गजर आणि इतर मैत्रिणीनचा नाच सुरु झालेला असतोच. मग पीसी त्यांना जॉईन होते.
प्रश्न ७ : हा गंभीर प्रश्न आहे.
पूर्ण चित्रपटात पीसी च्या साड्या पारंपरिक पद्धतीने नेसवल्या होत्या. त्याचबरोबर मागे नाच करणाऱ्या सख्यांच्या साड्या सुद्धा व्यवस्थित पारंपारिक वाटतात.
मग ह्याच गाण्यात दोघीना लो वेस्ट – शिवल्यासारखी दिसणारी नऊवारी का ?
प्रश्न ८ : पिंगा गाण्यात मस्तानी नि काशीबाई यांनी आधी रंगीत तालिम न करताही त्यांची पावलं, ठेके एकसाथ कसे पडले? भगवान का चमत्कार की आणखी काय?

खरे पाहता , हे गाणं सुरु होतं मुळात “लटपट लटपट” ह्या शब्दांनी. हे दोन शब्द म्हणजे लताबाईंच्या मधुर आवाजातील एका जुन्या नितांतसुंदर मराठी लावणीची सुरुवात आहे हे सुजाण मराठी रसिकांना माहिती असेलच!
होतं काय की हे बाम मधलं गाणं लटपट लटपट असा सुरु झालं की डोक्यात पुढचे शब्द “तुझं चालणं गं मोठ्या नखऱ्याचं ” हे एकदम तालासुरात सुरु होतात आणि इकडे ह्या बाम मधलया पिंगा गाण्यात वेगळच काहीतरी वाजायला लागतं आणि पहिला निरस शॉट तिथेच बसतो डोक्याला !!! एकदा निरस शॉट बसला कि आपला डोकं बुवा भन्नाट चालायला लागतं

चित्रपट बनवण्याचा भन्साळींचा एक फॉर्मुला आहे :
दोन हिरोईनी + एक संस्कृती + एक हिरो + मोठे सेट्स + एक इतिहासावर आधारित तोडमोडीत कथा + दुःखद शेवट
हा ढोबळ फॉर्मुला आहे. थोडाफार इकडे तिकडे केलं की नवा सिनेमा तयार !!
गणिती रुपात हा फॉर्मुला असा येईल :
n H + C + LS + LTTT + SE
where:
HS = Historical Story (constant)
LTTT = larger than life theme (constant)
H = Heroine (constant)
n = number (variable)
SE = Sad Ending
C =Culture (composite constant)
values separated by commas may vary

C = साड्या, घागरे , दागिने , फुलं , महाल सदृश पिवळ्या प्रकाशात चमचमणार्या भिंती , सुई धागा , एखादा सण , त्या सणाचं so called विचित्रीकरण केलेलं गाणं

उदाहरणे :
१. बाम
२. रामलीला
३. पद्मावत
४. देवदास
५. हम दिल दे चुके सनम

——————————————————————————————————
(पुणेरी ??) पाटी :
१. कंसातील वाक्ये म्हणजे माझी मते आहेत. प्रसंग कंसाच्या बाहेर. दुष्ट कंस मामाचा असा बदला घेतला गेला आहे
२. लेखाचा उद्देश केवळ मनोरंजन हा आणि हाच आहे
३. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कथेचा लेखिकेला पूर्ण आदर, अभिमान आणि माजसुद्धा आहे , चित्रपटाचा गरजेपुरता उल्लेख आहे. हे लेखन फक्त सलीभ ह्यांच्या बाम मधील पिंगा गाण्याच्या सादरीकरणासंबंधी आहे. गाणे ,अभिनय , नृत्य हे चांगले की वाईट ह्याबद्दल हा लेख भाष्य करत नाही.
ज्याचे त्याचे स्वतंत्र मत आहे
४. बाम = बाजीराव मस्तानी
सलीभ = संजय लीला भन्साळी
पीसी = प्रियांका चोप्रा
डीपी = पदुकोणांची दिपीका
५. लेखातील प्रश्न हे सहज उत्सुकतेपोटी उत्पन्न झालेले असून एका निष्पाप महिलेच्या मनाचे प्रतिबिंब दर्शवतात. उगाचच अगदी टिपीकल आहेत म्हणून अवहेलना करू नये

One thought on “अचाट गाणी आणि मेंदूला किल्ली!! – पिंगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!