कुसुम (लघुकथा)

कुसुम (लघुकथा)

गरिबाला कसल्या आल्यात भावना आणि फीलिंग्स? ही उच्चभ्रू लोकांची थेरं! आपण पडलो स्वभावाने आणि पैशाने गरीब. सतत मन मारून जगणारे किडे. बालपणी मोठ्यांच्या शिव्या खायच्या, त्यांना दबकून राहायचं, तरुणपणी शक्य असेल तितकं शिक्षणात स्वतःला झिजवायचं. मग एखादी सरळसोट चाकरी, लग्न, मुलं आणि म्हातारपणी मिंधं होऊन जगायचं!
ही काय life आहे?
सतत कुणालातरी वचकून राहायचं, कधीच मोकळेपणा मिळाला नाही, आणि आता ह्या वयात जिथे आम्हाला रिटायरमेंट ही सुद्धा शिक्षा वाटू लागलीये तिथे भावना समजून घेण्याची नाटकं कशाला?
नकोच.
सदाशिवराव तावातावाने बोलत होते.
स्वतःशीच!
बाथरूमच्या आरशात पाहून.
त्यांची ही जुनी सवय होती. मनातलं सगळं सत्य फक्त आरशाला सांगायची. इतर कुणालाही त्यांच्या मनात काय चालूये ह्याचा थांगपत्ता लागत नसे. आतल्या गाठीचे म्हणून ओळखले जात असले तरी ते स्वभावाने मऊ आणि निरूपद्रवी होते. त्यांची पत्नी सुशीलादेवी मात्र मुलखाच्या बोलघेव्हड्या! सतत टकळी चालूच.
ह्या स्वभावाने सुशीलादेवींनी अनेक तर सदाशिवरावांनी शून्य मित्र जोडले होते.
नाही म्हणायला सदाशिवरावांचा एक गणू नावाचा बालमित्र होता पण मैत्रीचं वारं एकतर्फी होतं. म्हणजे गणू त्यांच्याजवळ मन मोकळं करायचा, तर कधी कचाकचा भांडायचा सुद्धा! पण गणूचा सदा मात्र ढिम्म. सदाशिवराव त्याला अडीअडचणीत मदत करीत, त्याला सांभाळून घेत. पण स्वतः मात्र कोरडेच राहत. अशा स्वभावामुळे मनात भावना दाटून त्यांचा सतत कोंडमारा होत असे.
आताही असंच झालं होतं. घरी छोट्यामोठ्या कुरबुरी झाल्या की सर्व परिस्थिती सदाशिवराव सांभाळून घेत. मात्र त्यांना सांभाळून घ्यायला कुणीच नव्हतं. सुशीलादेवी होत्या पण त्यांचं लक्ष सतत बाहेर कुठेतरी असे. कुणाच्या घरी काय चालूये, कुणी काय नवीन खरेदी केली, कुणाकडे लग्न किंवा समारंभ आहे वगैरे वगैरे.
अशा स्वभावामुळे त्या स्वतःच्या घरी कमी आणि बाहेरच जास्त रमत असत. इतके दिवस सदाशिवरावांना काही ह्या स्वभावाचा अडसर वाटला नाही. पण आता रिटायरमेंट नंतर तरी बायकोने घरात असावे आपल्याला वेळ द्यावा असे त्यांना वाटत असे. अर्थात त्यांनी हे बोलून तर दाखवले नाहीच पण बायकोला जाणवू ही दिले नाही. त्यामुळे ते अधिकच एकटे पडत चालले होते.

आता आर्थिक दृष्टीने जरी बरे दिवस आले असले तरी परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. मुलगा आणि सून नौकरीच्या बळावर संसार चालवत. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी येतील म्हणून ते दोघे बचतीवर भर देत. त्यामुळे घरात विशेष चैनीच्या वस्तू नव्हत्या. सदाशिवरावांना विशेष छंद किंवा आवडही नव्हती की ज्यात मन गुंतून राहील. त्यामुळे त्यांची छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होत असे.

आजही असेच झाले. घरातील सर्वजण आपापल्या उद्योगाला गेले होते. सुशीलाबाई स्वयंपाक घरातील कामे आटपून जरा निवांत पहुडल्या होत्या .
सदाशिवरावांना चहा हवा होता पण तो करून घ्यायचा कंटाळा आला म्हणून त्यांनी बायकोला उठवलेच.
“अगं, ऐकतेस का, मला अर्धा कप चहा करून दे बरं.”
“अहो, आताच पडलीये मी. सकाळपासून मेली मरमर सुरुये. ते दिसत नाही का? आताशा होत नाही हो सतत काम माझ्याने , आयुष्यभर हेच केलंय.जरा आराम करू द्या,थोड्या वेळाने उठले की देते करून. “
“मला काही हवं असलं की बरोबर तुला आराम करायचा असतो ” सदाशिवराव ओठातल्या ओठात पुटपुटले. वर जोरात म्हणाले, ” ठिक आहे मी घेतो करून “
ते चहा करायला गेले आणि गडबडीत पाय घसरून पडले. फार काही लागलं नाही पण पाय मुरगाळला आणि ह्या आता सुशीलाबाईंची चिडचिड झाली.
आठ दिवस घरात धुसफूस झाली. सदाशिवराव घुम्यासारखे पडून असले तरी मनात भडकलेले होते. पाय बरा झाला त्याच दिवशी त्यांनी दुपारी छोटीशी bag भरली आणि हळूच घरातून सटकले.
कुठे जायचं, काय करायचं काहीच planning नव्हतं. खिशात थोडे पैसे होते. त्याच्या भरवशावर ते घरातून बाहेर पडले आणि थेट एका random st बसमध्ये जाऊन बसले. घरी निरोपाचा मेसेज करून ठेवला कामानिमित्त बाहेर जात आहे असा आणि मोबाईल बंद केला.
घराचे आणि कुटुंबाचे विचार मनात बिलकुल येऊ द्यायचे नाहीत असं त्यांनी ठरवलं आणि जाणीवपूर्वक खूप जुन्या गोष्टी आठवू लागले. त्यांच्या कॉलेजच्या काळात शिकत असताना एक मुलगी त्यांच्या वर्गात होती, कुसुम नावाची! तिची आठवण आली आणि सदाशिवराव व्याकुळ झाले. होणारच होते, कारण ती त्यांचं पहिलं वहिलं प्रेम होती. होतीच म्हणावं लागेल कारण सध्या त्यांचा संपर्क नव्हता. जणू ती कुठेतरी दूर हरवून गेली होती. निखळ हास्य मिरवणारी, नाजूक बांध्याची, वेणीचा शेपटा रुळवत चालणारी, थोडीशी सावळी, मनमोहक, कुरळ्या केसांची कुसुम नेहमी प्रफुल्ल दिसत असे.वर्गात फार मुली नव्हत्या. त्यामुळे कुसुम गरज पडली तर मुलांशी बोलत असे. त्यात सदाशिव म्हणजे अत्यंत शांत, स्कॉलर मुलगा असल्यामुळे तिला त्याच्याशी बोलायला बरं वाटत असे.
सहवासाने हळूहळू त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. पण…
प्रत्येक प्रेमकथेत पण यायलाच हवा का?
St थांबली. सदाशिवराव उतरले. ते त्यांच्या कॉलेजच्या गावी आले होते. ह्याला योगायोग म्हणावं की नियती? मघाशी त्यांनी विचाराच्या तंद्रित तिकीट घेऊन टाकलं होतं ते कुठलं ह्याकडेही त्यांचं लक्ष नव्हतं.
आलोच आहोत तर कुसुमला शोधावे का? त्यांच्या मनात आलं.
त्यांच्याजवळ स्मार्टफोन होता पण त्यांना तो फार काही वापरता येत नसे. त्यांनी जुन्या पद्धतीने जायचं ठरवलं.

त्यांचे अंतर्मन सांगत होते, कुसुम सुखात आहे. तसेच ती नक्कीच भेटायला येईल आज त्यांना. पण हे सगळे कसे घडेल ह्याचे त्यांच्याजवळ तर्कशुद्ध उत्तर नव्हतं. काहीच न सुचल्यामुळे ते रस्ता दिसेल तसे चालत राहिले.
काही खाल्ले नसल्यामुळे त्यांना भुकही कडकडून लागली होती. पण तिकडे दुर्लक्ष करत दिशाहीन अवस्थेत ते वाट दिसेल तसे चालत राहिले. त्यांनाच माहिती नव्हतं कुठे पोचणार ते. शेवटी थकून ते एका बाकावर जाऊन बसले. हा बाक त्यांच्या भुतकाळातील परिचयाचा होता.

ह्या बाकावर कॉलेज जीवनातील सुखादुःखाचे क्षण त्यांनी घालवले होते. जवळच छोटीशी बाग आणि चहाची टपरी होती.आपसूकच तिकडे पावली वळली होती. आपण असे फिरतोय हा शुद्ध मूर्खपणा आहे असे आता त्यांना वाटू लागले.
त्यांनी स्वतःचे खिसे तपासले.

काही सुट्टे पैसे होते. त्यांनी चहा घेतला. मन अजूनही कुसुमच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते. चहा गोड लागेना. मनात काहीतरी दाटून आले होते.ते तसेच विमनस्क अवस्थेत बसून राहिले. जुन्या आठवणींनी मनात फेर धरला होता.

इकडे घरी सगळेजण सदाशिवरावांना शोधत होते. फोन बंद असल्यामुळे काहीच पत्ता लागत नव्हता. सगळे काळजीत होते. सुशीलादेवी देवासमोरच करुणा भाकीत बसल्या होत्या.
वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच उरले नव्हते.त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. आपलं नवऱ्याकडे जरा दुर्लक्ष झालं ही जाणीव त्यांना झाली आणि त्या अधिकच बेचैन झाल्या.
त्यांना कुठे शोधावे असा विचार सुशीलादेवी करत होत्या. काही ठिकाणी त्यांनी calls करून पाहिले. पण सदाशिवराव कुठेच नव्हते.त्यांना आता खूपच काळजी वाटू लागली होती आणि जरा टेन्शन ही आलं होतं. तशा त्या खंबीर होत्या पण हा प्रसंग ह्यापूर्वी कधी आला नव्हता आणि कठीण, अनपेक्षित होता.

इकडे सदाशिवरावही बेचैन झाले होते. काय करावे काहीच सुचत नव्हते त्यांना! त्यांनी मनातून कुसुमला आर्त साद घालायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे एखादा निस्सीम भक्त परमेश्वराची करुणा भाकतो, त्याप्रमाणे ते तिला बोलावू लागले. आता त्यांना तिची नितांत गरज होती. पण ती कशी, कुठून येणार, काहीच कल्पना नव्हती.
“कुसुम, ये ना गं. तुझी खूप आठवण येतेय. या क्षणी तुझ्याशिवाय मला कुणीच सावरू शकत नाही. तूच आहेस गं ती माझ्या हृदयाची राणी! हा प्रपंच, संसार हे फक्त वास्तविकतेचे खेळ आहेत. माझ्या मनात फक्त तूच वसली आहेस. माझ्या मनाच्या प्रत्येक अवस्थेला तू जाणतेस. माझ्या बोलण्याच्या आवाजावरून, चेहेऱ्याच्या बदललेल्या लकेरीवरून तू ओळखायचीस की माझं काय बिनसलंय ते आणि आज मी मानसिकरित्या कोसळलोय गं! खूप काही दाटलंय मनात. कुठे बोलू काय बोलू. तू हवी होतीस गं. ये ना कुसूम.” असं सदाशिवराव मनात बोलत होते.

इतक्यात कुणाच्यातरी येण्याची चाहूल लागली. त्याचबरोबर बांगड्यां किणकिणल्या , पैंजणाचा मंजुळ छुमछुम ध्वनी ऐकू आला. सोनचाफ्याचा सुगंध दरवळला.
सदाशिवरावांनी वर पाहिले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. स्पष्ट दिसेना. अंधुक दृष्टीला एक परिचित स्त्री दिसली.नजरेत भरली ती तिच्या केसांची चंदेरी बट! अजूनही तितकेच सुंदर असणारे केस वयोमानानुसार विरळ झाले असले तरी त्यांचा छान अंबाडा बांधला होता. त्यावर नाजूक सोनचाफा खोचलेला होता. त्याचा दरवळ तिचे आगमन प्रसन्न करून सोडत होता. कानात खड्यामोत्याच्या कुड्या लखलखत होत्या.तिने डाळिंबी रंगाची सहावारी गोल साडी नेसली होती. त्याला गुलबट सोनेरी काठ होते.
हातात हिरव्या काचेच्या बांगड्या व मध्ये एक नाजूक सोन्याचे कंकण होते.
“हे तेच कंकण आहे ना?” सदाशिवराव तिच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत जड आवाजात म्हणाले.ती गोड हसली.
” हो सदा, हे तेच आहे. कंकण ओळखलस आणि मी? मला विसरलास? इतक्या दिवसांत एकदाही आठवण नाही आली माझी “
तीही भावनिक झाली होती.

“कुसुम, अगं आज मनातून तुला साद घालत होतो आणि तू आलीस. कसे कळते गं तुला सारे “
“हो सदा, आधीपासूनच असं आहे. मला समजत आलंय. पण मीही कर्तव्यात गुरफटले रे. तू तर अगदीच संसारी माणूस! मला कधी भेटायला आला नाहीस की कधी बोलवले नाहीस. मीच येत असे अधून मधून थोड्या वेळासाठी, एकांतात, मन मोकळं करायला. “
तिचे बोलणे तोडत सदाशिवराव म्हणाले, “हो आणि तुझे ते येणे म्हणजे शुष्क वाळवंटात वर्षाराणी प्रसन्न होऊन वरदान देत आहे असे वाटत असे. माझ्यासाठी जीवनामृतच ते!त्या अनमोल क्षणांना वेचत आलोय मी. तेच सहाय्यक ठरलेत ह्या जीर्ण कुडीमध्ये प्राण टिकवण्यासाठी!”

“असं का म्हणतोस?
आणि किती ते साहित्यिक बोलणं रे. अजूनही जुन्याच पिढीचा आहेस तू. कधी नवीन जगात डोकावून बघ. किती cool आहे नवीन पिढी पाहिलंस का?
अरेच्चा cool वरून आठवलं, तुझा चहा गार झाला की. चल, काहीतरी खाऊन घेऊ आपण. मी हे थालीपीठ आणलंय तुझ्या आवडीचं आणि सोबत घट्ट कवडीचं दही, ते खा बरं.”
” हो गं कुसुम, पण एका अटीवर. तू मला भेटायला वारंवार यायचंस आणि cool कसं व्हायचं हे शिकवायचं!”
” ते मात्र बघावं लागेल हा सदाशिवराव, तुमची प्रिय पत्नी सुशीलादेवी यांना तुम्ही अनुमती दिली तरच ते शक्य आहे “
“नाव काढू नकोस तिचं. तिला माझ्यासाठी वेळच नाही, इतर जगासाठी आहे.”
“सदा अरे, तूच समजून घे तिला. तिचं चुकलं तर रागाव सुद्धा! तिला कळेल, चिडणार नाही ती. पण असा अबोला धरून घर सोडून येऊ नको न सांगता सवरता! भीती वाटते हो “
असं बोलून झाल्यावर कुसुम उर्फ लग्नानंतरची सौ. सुशीलादेवी हिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिला आता ना दुखवण्याची आणि वेळोवेळी मनातलं बोलून स्वतःला आनंदी ठेवण्याची मनोमन शपथ सदाने घेतली.

झाडांची सावली एका दिशेने कलू लागली होती व सदा कुसुमचे प्रेम पुन्हा एकदा बहरू लागले होते.
….
समाप्त

जय श्रीराम

शब्दांश प्रकाशनच्या ‘फुलले रे’ ह्या online कथासंग्रहात पूर्वप्रकाशित
……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!