
बाजरीच्या झटपट खारोड्या – मराठवाडी वाळवण
जिन्नस:
१) २ वाटी बाजरीचे पीठ ,
२) भाजलेले तीळ २ चमचे (फराळाचा चमचा),
३) प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा,
४) २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट,
५) अद्रकचा छोटा तुकडा ,
६) ४-५ पाकळ्या लसूण ,
(हे तीनही जिन्नस वाटून घ्या, जाडसर पेस्ट बनवा)
७) चिमूटभर हळद ,
८) चवीनुसार मीठ
९) पिण्यायोग्य पाणी
पाककृती:
१) खारोड्या करायच्या आदल्या रात्री /संध्याकाळी बाजरीचे पीठ कोरडे भाजून घ्या.
२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.
४) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ऊन निघायच्या आधी) कढईत तेल घालून तेलात जिरे, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट , हळद , तिखट हे घालून परतून घ्या.
५) ह्या फोडणीत २ वाटी पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
६) पाण्यात चवीनुसार मीठ घाला.
७) रात्रभर भिजवलेले बाजरीचे पीठ ह्या पाण्यात घाला. हे मिश्रण हळूहळू घाला आणि पिठलं घोटतो तसे घोटा /हटवा.
८) ह्याला दणदणीत वाफ येऊ द्या.
९) वाफ आल्यावर त्यात तीळ घाला.
१०) हे मिश्रण थंड होऊ द्या .
११) चमच्याने किंवा हाताने (हाताला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही)हे मिश्रण थोडे थोडे करून जाड प्लास्टिक पेपरवर घाला.
उन्हात वाळवायला ठेवून द्या.
१२) चांगले खडखडीत वाळू द्या.

ह्या प्रमाणात ताटभरुन खारोड्या होतील, एवढ्या तर एखादी चिंगी सहज फस्त करेल, जास्त प्रमाणात करा बरं का..
टिपा:
– ह्या खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे.
– मराठवाड्यात उन्हाळ्यात वर्षभराच्या खारोड्या करतात.
– गच्चीवर/अंगंणात खारोड्या घालणे हा प्रोग्राम प्रत्येक घरी पाहवयास मिळतो.
ही माझ्या आईची पद्धत आहे, सोपी आहे. लोकं अजुन वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवतात.