खुर्ची _ भयकथा

खुर्ची _ भयकथा

खुर्ची ही भयकथा किल्ली सहर्ष पोस्ट करत आहे. अस्मादिकांच्या मित्रमंडळात चाललेल्या “माझे भुताचे अनुभव” ह्या चर्चेतून कथाबीज आलेले असून थोड्याफार प्रमाणात सत्यकथा म्हंणता येईल.
त्याबद्दल मी माझी मैत्रीण गायत्री आणि तिचे पती ओंकार ह्यांची आभारी आहे. कथेचा नायक मिलींद आहे असे म्हणता येईल. अर्थात वाचत असताना नायक कोण आणि खलनायक कोण हे चाणाक्ष वाचक ओळखतीलच.
सादरीकरणाचे लेखनस्वातंत्र्य घेऊन घटनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखिकेच हेतू नाही.मनोरंजनासाठी ह्या कथेचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती.खुर्चीला तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मंडळ आभारी आहे.
————————————————————————————
मिलींदची नुकतीच ह्या आडगावात बदली झाली होती. प्रथमदर्शनी तरी त्याला गाव बरे वाटले होते. साधारण एक आठवडा मुख्य गावाच्या भागात राहून, गावकर्यांबरोबर गप्पा मारून ,बोलून आणि सोबत काम करणाऱ्या नोकरदारांची मते ऐकून त्याच्या मनात गावाबद्दल निरीक्षणे नोंदवणे सुरु झालं होत. गाव तसं फार मोठं नव्हतं. पण नुकत्याच झालेल्या झालेला औद्योगिक विकासामुळे बाहेरच्या लोकांचा वावर वाढला होता. मुळ गाव तसं ह्या उद्योगनगरी पासून अलिप्तच असायचं. कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये काम करायला येणारी लोकं त्याच परिसरात राहणं पसंत करायची. म्हणून तिथे आता नवीन इमारती बांधणे आणि भाड्यावर देणे किंवा सदनिका विकणे असा स्थानिकांसाठी नवा उद्योग सुरु झाला होता. बहुतेक मंडळी भाड्याने घर घेऊन राहणं योग्य समजायची. कारण ह्या आडगावात कोण स्थायिक होणार! काही वर्षं इथे नोकरी करून बदली करून घेता येईल ह्या उद्देशाने बहुतेक लोक इथे येत. गावाला समुद्रकिनारा लाभला होता. त्याचे पर्यटन स्थळासारखे रूप विकसित होत होते , हा आणखी एक फायदा! त्यामुळे सुरुवातीला ह्या विकासाबद्दल नाखूष असणारे स्थानिक लोक मिळणाऱ्या नव्या रोजगारामुळे supportive झाले होते. ह्या उद्योग नगरीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व प्रकारच्या कंपन्या आणि कारखाने होते. त्यात manufacturing , chemical , packaging , आणि थोड्याफार माहिती तंत्रज्ञान आधारित कंपन्या होत्या. त्यामुळे सर्व वयोगटातील आणि शैक्षणिक पात्रता असलेले लोक तिथे नौकरी करू शकायचे. एक वेगळीच दुनिया गावाच्या बाजूला ह्या उद्योग नगरीच्या रूपाने वसली होती. गावकरी मात्र आपण भलं , आपला काम भलं , ह्या न्यायाने इकडे विनाकारण जास्त फिरकत नसत.

आता आपणही कंपनीजवळ राहण्यासाठी शिफ्ट व्हावे असा विचार मिलींदच्या मनात बळावत चालला होता. त्याला बरीच सबळ कारणे सुद्धा होती. कंपनी जवळ राहिलो तर येणं जण सोपं होईल. थोडंफार गरजेपुरता सामान तिथेही मिळत होतच. अगदी आवश्यक कशाची गरज पडली तर गाव फार दूरही नव्हतं. शिवाय आता कंपनी मध्ये बऱ्यापैकी ओळखी झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर बाहेरून येऊन इथे काम करणाऱ्या त्याच्यासारख्याच मुलांचा एक छान कंपू तयार झाला होता. ह्या भागात भाड्याने सदनिकाही मिळत असत. त्यामुळे रूम मिळायला काही अडचण नव्हतीच. लवकरच मिलींद आणि त्याचे दोन मित्र ह्यांनी एक बऱ्यापैकी स्वस्त आणि मस्त अशी रूम शोधायाचे ठरवले.

संध्याकाळी फेरफटका मारताना शैलेशला तो जिथे चहा प्यायचा त्या टपरीवाल्याकडून एक जागा रिकामी आहे असे समजले. ती खरेतर ३ खोल्यांची एक सदनिका होती. मुलभूत सोई होत्या. एकवार खोली बघून फार विचार न करता शैलेश ने तीच जागा घेऊ असे ठरवले आणि आगाऊ पैसे देऊन बाकीच्या कंपूला चांगली जागा मिळाली ही बातमी गरम गरम सामोसे आणि वाफाळत्या चहाबरोबर ऐकवली. आम्हाला न विचारात हीच रूम का ठरवली ह्यावरून मयूर ने थोडी कुरबुर केली. पण शैलेशने रूम शोधली नसती तर आपण तिघांनी खूप घोळ घातला असता ह्यावर त्यांचं एकमत झालं आणि त्यांनी चहाकडे मोर्चा वळवला.

शिफ्ट होण्याची तारीख ठरली आणि बाकीचे दोघे आपल्या सरप्राईझ खोलीवर राहायला जाण्याच्या तयारीला लागले. बाडबिस्तरा गुंडाळून एका सुट्टीच्या दिवशी तिघेही नवीन खोलीवर राहायला आले.
“अरे वा , बाल्कनी आहे की !! आरामखुर्ची पण आहे .जबरदस्त view दिसतो. इथे बसून मस्त वेळ जाईल. पण काय हे , रंग जरा काळपट वाटत आहे रे शैल्या, बघ ना ह्या भिंती, आणि काय रे चोथ्या मजल्यावर आहे हा फ्लॅट. लिफ्ट बंद पडली तर वांदे होणारेत आपले ” इति मयूर
“अबे टॅन झाल्यात त्या भिंती !! ही ही ” असा म्हणून आपल्याच जोक वर मिलींद फिदीफिदी हसत आणि मयूर कडे दुर्लक्ष करत इकडेतिकडे फिरत होता.
शैलेश मात्र गुणी बाळासारखा लगेच सगळं आवरण्यात आणि सामान लावण्यात व्यस्त झाला होता.त्याने स्वयंपाक घरात बेसिक भांडी ,उपकरणे ,थोडासा किराणा आणि सुके खाद्यपदार्थ अशी आवराआवर केली
मयूर आत आला. त्याने खाण्याचे डब्बे उघडले आणि सगळ्यांना जेवायला बोलावलं. अन्नाचा सुवास दरवळला आणि सगळेच पोटपूजेला लागले.संध्याकाळ पर्यंत सगळेच व्यवस्थित सेट झाले होते. पहिला दिवस अशा प्रकारे गडबडीत सरत आला होता.
पुढे काय होणार हे माहित असलेला तो टपरीवाला चहा देणारा मात्र भयाण रीतीने फ्लॅट कडे बघून हसत होता !!!!

————————————————————————————————————————————————-

जेवणानंतर सगळ्यांनीच थोडीशी ताणून दिली. थोड्या वेळाने पसाऱ्याची आवराआवर करताना मिलींद म्हणाला, “वा यार, भारी जेवण झालंय. खानावळ असल्यामुळे आधीच्या रूम मध्ये जेवणाचा काही प्रॉब्लेम नव्हता. इथे मात्र उद्यापासून स्वतः शिजवून खायचं आहे, आहे ना लक्षात !! कधी तरी ,सुट्टीच्या दिवशी, गावात जाऊया जेवायला पण रोज आपआपल्या टर्न नुसार स्वयंपाक करायचा .”
“हो रे आधीच ठरलं आहे आपलं, आता पकवू नको. संध्याकाळ झालीये चक्कर मारून येऊ समुद्रावर, इथला सुर्यास्त बघण्यासारखा असतो असं ऐकलंय. आपला नेहमीचा टपरीवरचा चहावाला सुट्टीच्या दिवशी किनाऱ्यावर गाडी लावतो, आज त्याच्याकडे भेळ, चहा, कॉफी, मॅगी आणि इतर स्नॅक्स मिळतील . त्यामुळे रात्री येताना तिकडेच थोडंसं चटरफटर खाऊन येऊ.” असं शैलेश म्हणाला तेव्हा त्याची ही कल्पना सगळ्यानांच पटली आणि भटकंती करायला पोरं घराबाहेर पडली
मयूर: “अरे हे काय, ही लिफ्ट बंद आहे”
मिलींद: “लाईट गेले असतील ”
मयूर: “अरे नाही, आहेत लाईट तो बघ तिकडे दिवा”
मिलींद: “आता सोड ना, उतरायचं तर आहे आपल्याला, चल मूड खराब करू नको”
असं म्हणून सगळे खाली उतरले.
मयूर :”अरे शैलेश तू कुठे होतास? ”
शैलेश: “मी लिफ्ट ने आलो ”
मयूर:”अरे पण ती बंद आहे ”
शैलेश: “काय बोलतोस !! कुछ भी ”
मयूर:”हो , म्हणजे तू आमच्यासोबत उतरला नाहीस असं तुला म्हणायचं आहे का ”
शैलेश: “अर्थात!”
मयूर :”पण तू होतास, आम्ही बोलत होतो तुझ्याशी, ए मिल्या सांग ना ह्याला !”
शैलेश: “अरे खरंच सांगतो, मी मोबाईल विसरलो म्हणून परत आत गेलो आणि घेऊन आलो. मग मी तुमच्याबरोबर कसा असेन?”
मिलींद: “बास करा ना आता, आधी इथून निघूया. नसत्या शंका कुशंका काढून आजची सुट्टीची संध्याकाळ वाया नका घालवू यार, एकतर आधीच फ्लॅट मध्ये गुदमरायला होत होतं म्हणून बाहेर आलो भटकायला तर तुम्ही गावातल्या लोकांसारखं बोअर करत आहात. लेट्स गो!”
मयूर:”ठीके चल”
गप्पा मारत आणि हसत खिदळत सगळे किनाऱ्यावर आले. चहाटपरीवाला तिथे होताच. आज त्याचा व्यवसायात चांगला फायदा होत होता . त्यांच्याकडे पाहात चहाटपरीवाला भयाण हसला. त्याचे ते हसणे मयूर ने पाहिले आणि त्याच्या काळजात भीतीची एक लहर दाटून गेली पण त्याने दुर्लक्ष केले.
मनसोक्त भटकून झाल्यावर खाण्यासाठी कंपू टपरीकडे वळला. तिथे चटपटीत भेळ आणि इतर पदार्थ पोटभर हादडून पोरांनी मोर्चा घराकडे वळवला. एव्हाना अंधार पडला होता आणि सगळीकडे सामसूम झाली होती.
शैलेश: “तो टपरीवाला विचित्रच आहे ना जरा”
मयूर: “हो बे, माझ्याकडे चेटकिणीकडे बघितल्यासारखे डोळे करून पाहत होता आणि काय ते त्याचे प्रश्न! म्हणे घरात आधीची आराम खुर्ची आहे का, बसु नका त्यावर नाहीतर त्याची मजा येईल. आम्ही खुर्चीवर बसू नाहीतर भांगडा करू. ह्याला का करायच्या आहेत आगाऊ चौकशा आणि कोणाला मजा येईल विचारलं तर फिदीफिदी हसला. मी सांगतो आपल्या घराबद्दल लोकांना फारच कुतूहल आहे. खासकरून त्या आरामखुर्चीबद्दल! पण काहीही म्हणा ती खुर्ची मस्त आहे रे! एकदम आरामदायक आणि भारी झोप लागते त्यावर मी आल्याबरोबरच थोडा वेळ पहुडलो होतो. नंतर तुम्ही सगळे झोपला होतात तेव्हाही मी त्यावर बसून छान कॉफी घेतली, एक कविताही लिहिली! आपल्या बाल्कनीतुन दिसणाऱ्या निसर्गाची कमाल !! रूम वर गेल्यावर ऐकवतो. मला तर असं वाटत आहे की माझा निद्रानाशाचा त्रास आता कायमचा संपेल.”
“ती खुर्ची वापरलीस तर तूच कायमचा संपशील बेटा, राहू नका त्या घरात. एका माझं ”
अचानक कोणीतरी मागून येऊन म्हणाला.
शैलेश: “काय हो काका, घाबरावलंत ना. हे आपले चौकीदार काका, आपल्या इमारतीत खालच्या बाजूला राहतात. पण काका असं का म्हणत आहात?”
“नाही बोलणार, मी नाही बोलणार” असं म्हणत काका आले तसे निघून गेले.
मिलींद “काय यार किती अंधश्रद्धाळु लोक असतात एकेक. काकांचं पण वय झालाय आता. इकडे तिकडे लक्ष देऊ नका गाईझ, गावात अशा अफवा आणि समजुती असतातच. मी आधी गावात राहत होतो तेव्हा असं ऐकलं आहे, काही होत नाही.चला पाय उचला पटपट. झोप येत आहे. उद्या सकाळी उठून ऑफिसला जायचंय.”
सगळे गंभीर झाले होते. मिलींदच्या बोलण्याला रुकार देऊन शांततेत सगळे घरी परतले, अंथरुणं घातली आणि झोपायला गेले. लवकरच पोरांना गाढ झोप लागली. मध्यरात्र होत आली होती.
बरोबर १ वाजता घड्याळाने ठोका वाजवला. काहीतरी जळाल्यासारखा वास सगळीकडे पसरु लागला होता. वातावरण पाहता पाहता काळ्या धुराने भरून गेले.
कुणीतरी आवळून धरलंय अशी तीव्र भावना असह्य झाल्यामुळे मयूर किंचाळत उठला. आजूबाजूचं अभद्र, अमंगल वातावरण पाहून त्याची बोबडीच वळली. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. बाकीच्यांना हलवून जागं करण्याचा तो प्रयत्न करत होता. घड्याळ ठोक्याचं नसूनही त्याने ठोका का वाजवला ह्या प्रश्नानं त्याची भीती अजून वाढवली.
मनात त्याने देवाचा धावा सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण कसल्यातरी नकारात्मक शक्तीने मन ताब्यात घेतलं होतं आणि देवाचं नावही धड घेता येत नव्हतं. हाताला आत्यंतिक वेदना जाणवली तसे त्यांनी पाहिलं तर त्याचे दोन्ही हात………………………………………………………………………………………………………………………………..

हातांची अशी अवस्था बघून तो मनातल्या मनात आक्रोश करायला लागला.एका भयाण नाट्याची सुरुवात झाली होती आणि कमकुवत मनाचा मयूर खुर्चीचा पहिला बळी ठरला होता !!

————————————————————————————————————————————————-

हाताला आत्यंतिक वेदना जाणवली तसे त्यांनी पाहिलं तर त्याचे दोन्ही हात खांद्यापासून पंज्यापर्यंत पुर्ण रक्ताळले होते. काही क्षणांनंतर आपोआप ते रक्त नाहीसे झाले आणि दोन्ही हातावर एक विचित्र चिन्हे असलेली नक्षी उमटली होती. त्या नक्षीला काहीतरी अर्थ असावा इतपत ती सुबक होती पण त्यावरचे आकार आणि एकंदरीत प्रकारावरून ती काहीतरी अमानवीय प्रकारचा खेळ असावा अशी उमटली होती हातांची अशी अवस्था बघून तो मनातल्या मनात आक्रोश करायला लागला.
एका भयाण नाट्याची सुरुवात झाली होती आणि कमकुवत मनाचा मयूर खुर्चीचा पहिला बळी ठरला होता!!

दुसऱ्या दिवशी सकाळी मयूरने झालेला प्रकार इतरांना सांगितला. त्याची हकीकत ऐकून सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले.
मिलींद: “तुझ्या हातावर डिझाईन उमटली होती? ही ही.. काहीही सांगतो का बे ”
मयूर: “खरंच सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. भयानक आहे ही जागा! ती खुर्ची भारलेली आहे. आपल्याला धोका आहे गाईझ, जाऊया आपण इथून.”
शैलेश: “दाखव मग ती नक्षी. बघु तुझे हात.”
मयूर ने हात दाखवले, पण रात्री घडलेल्या प्रकारचे कोणतेही चिन्ह नव्हते.
शैलेश: “हे बघ काहीच नाहीये. तुला भास झाला असेल किंवा स्वप्न पडलं असेल. लोकांचं ऐकून ऐकून मनावर परिणाम करून घेतला आहेस तू पोरा! सांगितलं होतं लक्ष देऊ नकोस म्हणून”.
मिलींद: “मी तुझी स्क्रीन पाहिली होती. किती रहस्यकथा वाचशील मायबोलीवर? भुतांच्या कथा वाचतोस,त्यावर विचार करतोस. असे भास होणारच मग! सध्या ब्युटी पार्लर नावाची भयकथा वाचत आहेस ना. ब्युटी पार्लरमध्ये मेहंदी वाली ची entry झाली की काय? तिनेच उमटवली असेल ही नक्षी!! ही ही..”
मयूर: “हो मी वाचतो भयकथा. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ब्युटी पार्लर रहस्यकथा एकदम उत्तम चालु आहे. मेहंदी, मेकअप असं काही नाही त्यात, कथेच्या नावावर जाऊ नको. लेखिकेने कथेत खरा भयरस ओतलेला आहे. पण तुला काय कळतं त्यातलं. गप्प बैस. तू म्हणतोस तस काही नसतं रे. माझ्या वाचनाचा काहीही संबंध नाहीये. विषय भरकटवू नकोस. मी सांगतो ते खरं आहे.”
शैलेश:”ठीक आहे. खरं असेलही. तुझा हात सुद्धा नीट आहे. काहीच खुणा नाहीयेत. म्हणून आम्ही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास ठेवू शकत नाही. एक काम करूया. आज रात्री सगळे जागे राहूया. आज काही नाही घडलं तर उद्या, परवा, संपूर्ण आठवडा बघू काय होतं ते. काही घडलंच नाही तर उत्तम. तू म्हणतोस ते खरं असेल आणि काही विचित्र घडलंच तर उपाय शोधू.”
मयूर: “उपाय वगैरे काही नाही. ही जागा सोडायची. बास!”

सगळे कामाला गेले. आजचा दिवस नेहमीप्रमाणे पार पडला. सोमवार असल्यामुळे कामाचा डोंगर होता. त्यामुळे सकाळचं संभाषण बऱ्यापैकी विसरल्यासारखं झालं होतं. कंपू घरी परतला. रात्रीची जेवणे पार पडली. जरा पाय मोकळे करून येऊ आणि थोडं फिरून येऊ असा विचार करून कंपू भटकायला सज्ज झाला. किनारा जणू त्यांना साद घालत होता. समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवून सगळे रूमवर परातले. आराम करण्यासाठी सगळे आडवे झाले. मयूरने आज जागी राहायचं आहे ह्या गोष्टीची आठवण करून दिली तसे सगळे उठले आणि पत्ते खेळायला बसले.

वास्तवीक पाहता सगळे थकले होते. पण मयूर च्या अनुभवाची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे होते. प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती आणि दडपण होते. कोणी वरकरणी घाबरल्याचे दाखवत नव्हते. इतक्यात वीज गेली. मेणबत्त्या लावून सगळीकडे कामापुरता प्रकाश करण्यात आला. जशी रात्र चढत गेली तसा काळोख जास्तच भयावह जाणवत होता. मेणबत्त्या असूनही तो प्रकाश केविलवाणा वाटत होता. पोरांनी चहा पिऊन डोळ्यांची झापड कशीबशी उघडी ठेवली होती. आता तर वारा पडला होता. वातावरण कोंदट झालं होतं. हळू हळू धूर सगळीकडे पसरू लागला. कालच्या घटनेप्रमाणे एक वाजता बरोबर घड्याळाचा टोला ऐकू आला. मयूर चे बोलणे खरे आहे ह्यावर बाकी दोघांचा विश्वास आता बसू लागला होता. एका अभद्र सावटाने घर भारून टाकलं होतं. कालचीच घटना आज पुन्हा जशीच्या तशी घडत होती. फरक इतकाच की आज कंपूतील प्रत्येक जण घाबरला होता आणि मयूर च्या रक्ताळलेल्या हातावरची ती रहस्यपूर्ण नक्षी पाहत होता. मिलींदने त्या परिस्थितीत हिम्मतीने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. त्या पवित्र शब्दांमुळे ते अमंगल सावट मावळलं. पण मयूरच्या हातावरची नक्षी मात्र तशीच राहिली. सगळे सुन्न झाल्यामुळे शांत बसून राहिले होते. त्या नक्षी चा अर्थ आणि त्याचं काय करावं हे समजत नव्हतं. शैलेशने त्या नक्षीचा फोटो मोबाईलमध्ये काढला. कोणालातरी त्याचा अर्थ विचारावा म्हणून त्याने असे केले. पहाट झाली. सूर्याचा पहिला किरण धरतीवर पडताच मयूरच्या हातावरची नक्षी आपोआप गायब झाली.
जागरणामुळे सगळ्यांनाच थकवा जाणवत होता. शिवाय त्या प्रसंगाचा मानसिक ताण होताच. पण कामावर जाणे भाग होते. आवरून कंपू घराबाहेर पडला आणि कामावर सगळे रुजू झाले. कंपनीतील काम संपल्यानंतर शैलेशने गावात जाऊन कोणालातरी विचारावे ह्या हेतूने मोबाइलला मधली photo gallary उघडली. तो folder बघताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे पाहिले ते अविश्वसनीय होते…………………………………………….

—————————————————————————————————————————————————-
कंपनीतील काम संपल्यानंतर शैलेशने गावात जाऊन कोणालातरी विचारावे ह्या हेतूने मोबाइलला मधली photo gallary उघडली. तो folder बघताच त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. जे पाहिले ते अविश्वसनीय होते….
सर्व छायाचित्रे गायब होऊन त्यांच्या जागी काही काळ्या रंगाच्या आकृत्या दिसत होत्या. अर्थहीन आणि विचित्र आकृत्या पाहुन शैलेशची पाचावर धारण बसली. आता बघतो ते खरं की काल रात्री पाहिलं ते खरं अशा संभ्रमात तो घरी परतला. आज त्याने ठरवलं होतं की रात्री जे घडेल ते सगळ्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचं आणि लगेच मेलवर attach करून एकमेकांना पाठवायचं. म्हणजे पुन्हा त्या images corrupt होणार नाहीत आणि झाल्या तरी बॅकअप राहील. त्याला जाणवत होतं की हा काहीतरी वेगळा आणि अमानवी प्रकार आहे, पण तरी तो स्वतःच्या समाधानासाठी शक्य ते पूर्ण प्रयत्न करणार होता. काल त्या भयाण प्रसंगातुन मिलिंदने म्हटलेल्या हनुमान चालिसेने वाचवलं होतं. त्यामुळे हनुमान चालिसेचं छोटं पुस्तक खिशात ठेवूनच शैलेश रूमवर आला होता. मयूर घाबरलेलाच होता. आज उशीरा घरी जायचं म्हणजे सगळे असतील असं ठरवून तो ऑफिस मध्ये थांबला होता. मिलींद गावात आधी ज्यांच्या कडे राहत होता त्यांच्याशी ह्या प्रकरणावर फोन वर बोलला आणि त्यांना त्या घराचा इतिहास विचारला. पण झालं असं की हे घर नवीन भागात असल्यामुळे त्यांना काहीही माहिती नव्हती. मिलींदने असंही ठरवलं होतं की, तो चहावाल्याला विचारू शकतो कारण चहावाला त्याच भागात टपरी लावायचा. पण आज टपरीही दिसत नव्हती. त्याने मयूरला सोबत घेतले आणि निराशा लपवत ते दोघे घरी परतले.
घरी येऊन पाहतात तर काय! शैलेश आरामात जणू काही घडलेच नाही अशा थाटात ‘त्या’ खुर्चीवर बसला होता.
“अरे शैलेश, उठ त्या खुर्चीवरून”, मयूर करवादला. पण शैलेश ऐकताच नव्हता. इतर दोघे हाका मारून,गदागदा हलवून त्याला खुर्चीवरून बाजूला करत होते तरी तो ढिम्म बसून होता आणि भकासपणे गॅलरीत नजर लावून बघत होता. दोघांनाही ह्या शैलेशला खुर्चीतून कसे सोडवावे ते कळेनासं झालं होतं. मिलींदने पहिले की हनुमान चालिसेचं पुस्तक कोपऱ्यात पडलं होतं. त्याने ते उचलले आणि शैलेशच्या हातावर टेकवले. झटका लागल्यासारखा शैलेश खुर्चीवरून उठला.
प्रकरण तेवढं सोपं नाही हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. मयूर आणि शैलेश खूप जास्त घाबरले होते आणि मिलींद धीर देण्याचा प्रयत्न करत होता. तातडीने ही वास्तू सोडायला हवी ह्या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोचले होते. पण मिलींद चे असे म्हणणे होते की हनुमान चालीसा आपली रक्षा करत आहे. आपण तिचा ढाल म्हणून वापर करू आणि आज काय होते ते रेकॉर्ड करू. आजचा शेवटचा प्रयत्न. आज पुन्हा आपण काही करू शकलो नाही तर आहे त्या परिस्थितीत हे घर सोडू. त्या नक्षीचा अर्थ लावायचाच असे त्याच्या मनाने घेतले होते. त्याने हनुमान चालीसा पठण मनातल्या मनात सुरु ठेवले. पुस्तक दोघानाही दिले.
मिलिंद: “काहीही झालं तरी तुम्ही हे पुस्तक स्वतःपासून वेगळे ठेवू नका. जर वेगळे करायचेच असेल तर राम नामाचा जप सुरु ठेवा. हा नाममंत्रच आपलं रक्षण करत आहे. आपण त्या शक्तिला टक्कर देणार नाही आहोत. पण नेमकं काय आहे ह्याचा छडा लावण्यासाठी आपण आजचा दिवस प्रयत्न करू. मला माहित आहे आपण खूप सामान्य माणसं आहोत. पण मनाची शक्ती असे कठीण प्रसंग हाताळू शकते. त्यामुळे घाबरू नका. आज आपण सगळं रेकॉर्ड करू. मी गूगल वर वाचलं होत त्यानुसार अशा घटना थर्मल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड करता येतात. मी तो कॅमेरा मागवला आहे आणि तो आज आपण वापरणार आहोत. नक्कीच आपल्याला सुगावा लागेल. आणखी एक गोष्ट. मला त्या टपरीवाल्याचा शोध लावायचा आहे. का कोण जाणे, पण तो काहीतरी मदत करू शकेल असं वाटत आहे.”
मयूर: “आपण खूप मोठा धोका पत्करत आहोत. आपल्यापैकी कुणालाच असा प्रसंग हाताळण्याचा अनुभव किंवा ज्ञान नाहीये. केवळ एक कॅमेरा आणि नामजप हे तोकडं पडेल. समजा जर आपण घाबरलो आणि नामजप करू शकलो नाही तर काय? त्या शक्तीने मनाचा ताबा घेतल्यानंतर आपलं स्वतःवर नियंत्रण राहणार नाही. माझं ऐका मित्रांनो, आपण आताच्या आता इथून निघू. रहस्यभेद वगैरे सगळं आज आपण वाचलो तर शक्य आहे मिल्या”
मिलिंद: ” मला थोडासातरी प्रयत्न करू द्या मित्रांनो. मी एक काम करतो, आता ह्या घरात काही सापडते का बघतो. रात्री १० वाजेपर्यन्त माझं काम चालू ठेवतो. काहीही झालं तरी आपण १० वाजता इथून निघू. मग मला यश येवो अथवा न येवो. माझी मनोदेवता सांगत आहे की आज काहीतरी उत्तर सापडेल म्हणून मी इतका आग्रह करत आहे.”
शैलेश: “जशी तुझी इच्छा. पण १०च्या ठोक्याला खाली जायचंच. आता आम्हीही तुला मदत करतो. आपण एकत्रच राहू. सगळ्या गोष्टी मिळूनच करू म्हणजे धीर येईल. खरे तर आम्ही घाबरलो आहोत. पण तुझा आत्मविश्वास बघून तुला मदत करण्याची इच्छा होत आहे. न जाणो आपल्या ह्या प्रयत्नामुळे ही वास्तू मुक्त झाली तर.“
मयूर: “एक मात्र नक्की आहे की, जे काही अभद्र आहे त्याचं मूळ खुर्चीच्या सभोवती रेंगाळताना आढळलं. त्यामुळे त्या दिशेने शोध घेऊया.”
शैलेश: “बरोबर बोललास तू, चला एकएक कप्पा चेक करूया. जुनं furniture आहे , त्यात आधी बघू”
ह्या चर्चेनंतर प्रत्येकजण कामाला लागला. वातावरण अजून तरी नॉर्मल होतं. थर्मल कॅमेरा मिलिंदने चालू करून खुर्चीच्या जवळ ठेवला होता. इतक्यात लाईट गेले. मेणबत्त्यांच्या मिणमिणत्या उजेडात शोधकार्य करताना मुलांनी आतल्या खोलीतलं जुनं लाकडी कपाट उघडलं. त्याच्या एका कप्प्यात काही कागद आणि फोटो अल्बम सापडला. जास्तीच्या मेणबत्त्या आणि मोबाइल टॉर्च वापरून नीट वाचता येईल म्हणून सगळे बाहेरच्या खोलीत आले. त्यांनी तो कागद उघडला, ती त्या घराची कायदेशीर कागदपत्रांची विस्कळीत फाईल होती. त्यावर तर काही विशेष सापडलं नाही. मग अल्बम उघडण्यात आला. त्यात काही निसर्ग चित्रे आणि artwork चे फोटो होते. अल्बमची पानं उलटत असताना तिसऱ्या पानावरचा फोटो पाहाताच मयूर जोरात किंचाळला. इतर दोघेही तो फोटो पाहून हबकले होते.
अचानक सगळ्या मेणबत्त्या विझल्या आणि सगळीकडे मिट्ट काळोख पसरला. अल्बम उघडल्या गेल्याच्या क्षणापासून वातावरण बदललं होतं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार पसरला होता. टॉर्च चालत नव्हता. मेणबत्त्या टिकत नव्हत्या. हळूहळू धुराचा वास पसरायला लागला.
सगळी उर्जेवर चालणारी उपकरणे बंद असताना खोलीतला छतावरचा पंखा मात्र गरगर फिरत होता………………………………

——————————————————————————————————————–

सगळी उर्जेवर चालणारी उपकरणे बंद असताना खोलीतला छतावरचा पंखा मात्र गरगर फिरत होता…
घड्याळाचा ठोका वाजला, घड्याळ १२ चे टोले देत होतं. तिघांचीही भीतीने गाळण उडाली होती.
ह्या सगळ्या विचित्र वातावरणामुळे जे व्हायचं तेच झालं. मुलं नामजप करायचा विसरले आणि नुसतेच स्तब्ध होऊन खुर्चीकडे आणि मयूरच्या अवताराकडे बघत बसले!! भारल्याप्रमाणे मयूर खुर्चीकडे झपाझप चालत जात होता.
इतर दोघांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही न जुमानता तो खुर्चीवर जाऊन बसला आणि जोरजोरात हसू लागला. ह्या वेळेस त्याच्या दोन्ही हातावरच नव्हे तर चेहेऱ्यावरही ती गुढ नक्षी उमटली होती. एकंदरीत मयूर अत्यंत भयावह दिसत होता. सगळीकडे अंधार आणि धूर ह्यामुळे कोंदट आणि कुबट वास भरून राहिला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. मयूर खुर्चीत बसून गडगडाटी हसत होता. तो स्वतः च्या नियंत्रणात राहिला नव्हताच. पण अजून त्याने कोणावर आक्रमण केले नव्हते आणि नुकसान पोचवण्याचा प्रयत्नही केला नव्हता.
शैलेश काहीतरी आठवल्यासारखं उठला आणि artwork चा अल्बम घेऊन आला. अल्बम पाहताक्षणी मयूरने हिसकावून घेतला आणि अधाशासारखं प्रत्येक पान निरखून पाहू लागला. अल्बम खोलीत येताच वातावरण अजून गडद झालं आणि कुणाचातरी मुळूमुळू रसण्याचा आवाज मयूरच्या हसण्यात मिसळू लागला. मयूर पूर्णपणे झपाटला गेला होता. त्याने आता अल्बमची पानं फाडायला सुरुवात केली.
मिलिंद भानावर आला. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्याने ओळखले की जी कोणती अमानवीय शक्ती आहे तिने मयूरच्या शरीरात प्रवेश केला आहे. त्याला हेही आठवले की आपण नामजपाने एकमेकांचं रक्षण करणार होतो. पण त्याला काही केल्या हनुमान चालीसेचे शब्द आठवेनात. जणू कोणीतरी मनावर बंधन घातले आहे असे वाटत होते त्याला!! त्याने प्रयत्न सुरु केले पण त्याची इच्छाशक्ती कमी पडत होती आणि त्याचा मेंदू काम करेनासा झाला होता. शैलेशची स्थिती ह्याहून वेगळी नव्हती. त्यालाही आपली प्रत्येक कृती कोणीतरी करवून घेत आहे असं वाटत होतं.
मिलिंदने बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्द घशातच अडकले होते. आवाजच निघेना! त्याने शैलेशकडे पाहिले. शैलेश तर रडवेला झाला होता. मिलींदच्या मनात सकारात्मक शक्ती आणि नकारात्मक शक्ती ह्या दोघींचं द्वंद्व सुरु झालं होतं. दोघींचा समान प्रभाव असल्यामुळे तो काहीच करू शकत नव्हता. त्याने प्रयत्नपूर्वक स्वतःच्या मनोदेवतेला साद घालायला सुरुवात केली. एका नेमक्या क्षणी सकारात्मक शक्ती प्रभावी ठरली आणि मिलींद राम नाम उच्चारू शकला. त्यामुळे झालं असं की त्याची शक्ती वाढली आणि त्याने मयूररूपी भुताला प्रश्न केला.
“कोण आहेस तू? सोड आमच्या मित्राला! काय बिघडवलंय आम्ही तुझं? आम्ही इथे राहावं अशी तुझी इच्छा नसेल तर आम्ही लगेच निघून जातो पण हे सगळं थांबव.”
हे ऐकताच मयूर भेसूर हसला. अल्बमची फाडलेली पानं त्याने भिरकावुन दिली आणि ओरडला
“का आलात माझ्या जगात? ही नक्षी तुम्ही पाहिली आहे. आता तुमची सुटका नाही”
त्याचे ते कर्कश ओरडणे ऐकून दोघेही दचकले. धीर एकवटून मिलींद हनुमान चालीसा म्हणायला लागला. आता त्याने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु केले. मिलींदला शैलेशने सुद्धा साथ द्यायला सुरुवात केली. ह्या मंगल पठणामुळे सावट मावळू लागलं आणि शेवटी सगळं वातावरण पूर्ववत सामान्य झालं. धोका मात्र अजूनही टळला नव्हता. कारण मयूरच्या संपूर्ण शरीरावर ती नक्षी कायम होती. तिथून निघून जाण्यासाठी आता कोणालाच आग्रह करण्याची गरज नव्हती. सगळे पटापट उठून हनुमान चालीसा पठण करतच घराबाहेर पडले. न जाणो, पुढे पुन्हा हल्ला झाला तर, म्हणून त्यांनी हनुमान चालीसेचं पुस्तक सोबत घेतलं होतं. बाहेर सगळीकडे अंधारच होता. मोबाईल फोनच्या बॅटरीचा वापर करत कसाबसे सगळे इमारतीच्या बाहेर जायला निघाले होते.
मयूरने हळूच artwork अल्बम खिशात टाकलेला मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही!
खाली पोचल्यानंतर त्यांना टपरीवाला भेटला. तो ह्या तिघांना पाहताच आनंदित झाला. ह्या तिघांनी सगळी इत्थंभूत हकीकत कथन केली. टपरीवाला भैया त्यांना त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच नाव शाम होतं.
“शाम”: तुम्ही जिवंत परत आलात हे तुमचं भाग्य! पण आता सुद्धा काहीही होऊ शकतं. मयूरच्या शरीरावर नक्षी मला पण दिसते आहे. म्हणजे आज नक्कीच कुठलीतरी विशेष तिथी असणार!
“शैलेश”: तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही समजलो नाही. ह्या घरात काय झालं होत हे तुम्हाला माहित आहे का? ही दुष्ट शक्ती मयूर च्या मनाचा ताबा घेऊ पाहते आहे. नक्षीचा, घराचा आणि मयूरला पछाडण्याचा काय संबंध आहे? आम्हाला ही नक्षी एका अल्बम मध्ये सुद्धा दिसली. पण आम्ही त्याचा छडा लावू शकलो नाही.
“शाम”: ह्या जन्मात तरी ते तुम्हाला जमणार नाही! मी प्रयत्न केला होता पण त्या नक्षीने माझाही घात केला. एक डोळा गमावून बसलो. त्यानंतर आजतागायत त्या घरात पाऊल टाकले नाही.
“शैलेश”: पण तिथे असं घडलं काय होतं की ज्यामुळे ते घर शापित झालं? आम्हाला आधी कोणीच काही कसं बोललं नाही ह्या बाबतीत?
“शाम”: “सांगतो. अगदी २-३ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. साधना नावाची एक स्त्री त्या घरात राहत असे. ती मनस्वी जगणारी आणि कलेला प्रमाण मानणारी होती. एकटीच राहताना त्या घरात तिला कविता सुचत, ती लिहून ठेवी आणि गुणगुणत असे. चित्र काढणे हा तिचा छंद होता. त्यातही विविध पानेफुले, प्राणी ह्यांना abstract रूपात कल्पून साधना designs काढत असे. तिचं त्याबाबतीत कसब वाखाणण्याजोगं होतं. माझी designs शस्त्र आहेत असं ती म्हणत असे. आपली कला नावारूपाला यावी असं तिला खूप वाटत असे. अनेक स्वप्ने रंगवली होती तिने!! पण तिचा स्वभाव स्वार्थी होता. तिच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे छळत असे. तिच्या ह्या अवगुणांमुळे ती माणसे जोडू शकली नाही. लोकांच्या मनातून उतरली आणि त्यामुळे कलेला फारसा वाव मिळाला नाही. नंतर हेही कळालं की ही साधना एका काळ्या शक्तीची साधना करत असे. की ज्यायोगे तिला लोकांना वश करता येईल. पण साधना पूर्ण होण्यापूर्वीच साधनाचा त्या घरातल्या आरामखुर्चीवर बसलेल्या अवस्थेत गूढ मृत्यू झाला. जुन्या, जाणत्या लोकांचं असं म्हणणं आहे की, तिचा दुष्ट हेतूमुळे साधना पूर्ण न होता तिच्यावरच उलटली. त्यानंतर तिच्या घरात कोणीच राहायला गेलं नाही. मूळ मालकाने कोणालातरी ती इस्टेट विकून टाकली. लोकांना तिच्या आत्म्याचा वावर जाणवला होता. पण प्रथमच तिने तिचे प्रयोग तुमच्यावर केलेत असं दिसतंय. हे गाव सोडून निघून जा. हाच उपाय आहे.”
“मिलिंद”: “तुमच्यावर तिने कधी हल्ला केला? आणि मयूरचं काय? तो कसा सुटेल ह्यातून?”
“शाम”: “तुम्ही तिघे राहायला आल्यावर मला तिचा वावर जाणवला होता. तेव्हाच एकदा तुमच्या नकळत मी एका साधू बाबाने दिलेला अंगारा घेऊन आलो होतो. तो तुमच्या वस्तूवर आणि घरात पाण्यात मिसळून शिंपडला. हे कार्य करताना माझया चेहेऱ्यावर नक्षी उमटली आणि डोळा अधू झाला. पण त्या अंगाऱ्याच्या आणि हनुमान चालीसा पठण ह्या एकत्रित परिणामामुळे तुम्ही आज जिवंत आहात.आपण त्या साधू कडे जाऊ. तेच मयूरच्या सुटकेचा उपाय सांगतील.”
“मिलिंद”: “तुमच्याकडे तो अंगारा शिल्लक आहे का? आपण तो मयूरच्या अंगाला चोळू आणि त्याच्या खिशात मी हनुमान चालीसा ठेवलीये. त्याला काही होणार नाही.”
“पण आता माझ्या खिशात अल्बम आहे पोरा!! माझी शक्ती!! सगळे मरणार!”
असं म्हणून डोळ्यातून आग ओकत मयूर भेसूर हसू लागला !!!

—————————————————————————————————————–
मयूरला साधनाच्या भुताने पूर्णपणे पछाडले होते.
“ए शाम्या, तू तर सगळ्यात आधी मरणार! माझ्या आत्म्याला मृत्युनंतर छळणारा नराधम आहेस तू! माझ्याशी दोन हात करताना तुला हे कसं समजलं नाही की माझी designs शस्त्र आहेत! ह्या पोराच्या हातात आता माझ्या designs चा अल्बम आहे! आता भोग आपल्या कुकर्माची फळं!”
मयूरच्या ह्या कर्कश्य आवाजात बोलण्याने सगळ्यांची बोबडी वळली. शाम मात्र धीराने बोलला, “गप्प बस दुष्टे, स्वतः जिवंत असताना त्या designs चा उपयोग करू शकली नाही आणि आता काय करणार आहेस? पूर्ण तयारीनिशी ह्या युद्धात उतरलो आहे मी! ही मुले म्हणजे माझे प्यादे आहेत. ह्याच्या शरीराचा उपयोग करून तू मला काही करू शकत नाहीस. तुझा स्वतः चा आत्मा पण मला बांधील आहे.”

शामचं हे शेवटचं वाक्य ऐकून मिलींद बुचकळ्यात पडला. तो विचार करू लागला,
“नक्की कोण दुष्ट आहे इथे, हा शाम आपल्याला फसवत तर नाही ना, असाही ह्याच्याकडे बघून कधीच प्रसन्न वाटत नाही. विचित्र आहे हा माणूस! ”
त्याच्याकडे बघून मयूरच्या शरीरातली साधना कडाडली, “बरोबर विचार करत आहेस तू पोरा, अरे हा शाम दुष्ट शक्तींची आराधना करणारा मांत्रिक आहे, त्याचं शाम हे नावसुद्धा खोटं आहे. माझी designs ह्याला हवी होती , त्यांचा तो गैरवापर करणार होता. माझ्या नक्षी मार्फत जगात त्याचे हस्तक पसरवून सगळीकडच्या ऊर्जेचा ताबा घ्यायचा होता. त्यासाठी हा माझी नक्षी हस्तगत करण्याच्या मागे लागला होता. त्याने designs मिळवळीसुद्धा! पण त्याचे तंत्र मला अवगत होते. योग्य तो आकृतिबंध झाल्याशिवाय designs सिद्ध होत नाहीत आणि हे रहस्य त्याला हवं होत. मी माझी कला त्याला दिली नाही. म्हणून त्याने माझा अत्यंत छळ केला. मी बधले नाही म्हणून तर ह्याने माझ्याविषयी चुकीची मते पसरवली. ज्या कीर्तीसाठी मी आयुष्यभर झटत राहिले ती मला मिळू नये ह्याची पुरेपूर व्यवस्था केली. माझी कला जगासमोर आणण्याची मला संधी मिळूच दिली नाही. ह्या माणसाच्या वाईट ध्येयासाठी काहीही गुन्हा नसताना मला अपकीर्तीचा कलंक लागला. ह्याने शेवटी माझा खून केला आणि काळ्या विद्येद्वारे माझ्या आत्म्याला बांधून ठेवलं. मी अजून पूर्णपणे ह्याच्या कह्यात नाहीये म्हणून एवढंतरी बोलू शकत आहे आणि हे स्वातंत्र्य मला मयूरमुळे मिळालं. तो खुर्चीवर बसला आणि मला व्यक्त होण्यासाठी माध्यम मिळालं. त्या खुर्चीवर बसून मी माझ्या कलेत रममाण होत असे. त्यामुळे तिथे माझी सुष्ट शक्ती सामावली आहे. बाकीचे प्रभाव ह्या मांत्रिकाने तयार केले होते आणि ते तुमच्या हनुमान चालीसा पठणामुळे निष्क्रिय होत असत. तुम्हाला ईजा करण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता. म्हणून देवाने मला त्या जागेवरून निष्प्रभ केले नाही. नाहीतर हनुमान चालीसेपुढे भल्या भल्या दुष्टांचा प्रभाव टिकत नाही. तुम्ही आज जिवंत आहात तो तुमच्या नामजपाचा प्रताप! तुम्हाला ह्या घरात आणण्याची योजना सुद्धा ह्याचीच होती! मयूर कमकुवत मनाचा आहे हे त्याने आधीच ताडले होते आणि त्यांच्याद्वारे त्याला दुष्ट शक्ती सिद्ध करून माझ्याकडून रहस्य वदवून घ्यायचं होतं. बाकी त्याने सांगितलेली अंगारा वगैरे सगळ्या भाकडकथा आहेत. खरं तर त्याने त्याच्या काळ्या विद्येद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि इथवर आणलं. इथे माझी शक्ती कमी होते कारण मी खुर्चीपुरती सीमित आहे. इथे ह्या राक्षसाचं राज्य आहे. पोरांनो , ह्याच्यावर विश्वास ठेवून चूक केलीत तुम्ही!! मी ह्याला केलेल्या प्रतिकाराचा ह्याचा डोळा गेला. पण ह्यापेक्षा मी ह्याचं नुकसान करू शकले नाही. ”
हे बोलत असताना मयूरचे डोळे शक्तीहीन होत चालले होते.

“माझे काही वाकडे तू करूही शकणार नाहीस! इथे ह्या पोरांना फसवून घेऊन आलो. ह्यांचं हनुमान चालीसेचं पुस्तक सुद्धा शिताफीनं रस्त्यात पडावं अशी मी व्यवस्था केली. इथे सर्वत्र मंतरलेली जमीन आहे. इथला वारासुद्धा माझ्या मर्जीने वाहतो. साधना मयुराच्या शरीरात फसली आहे. त्यामुळे २ बळी मला तिथेच मिळतील. साधनाचा तिच्या अल्बम सकट बळी दिला की मला शक्ती प्राप्त होईल आणि ह्या पोरांना मी सैतानाला खुश करण्यासाठी बळी देईल. मग मला कोणीच थांबवू शकणार नाही.” तेच नेहमीचे भयाण कुत्सित हास्य करत मांत्रिक करवादला.
थंड आणि संयमी डोक्याच्या मिलिंदने विचार करायला सुरुवात केली. “नामजप हेच सर्वात मोठे साधन आहे ह्या दुष्टाविरुद्ध लढण्यासाठी! रामरक्षा स्तोत्र! हे स्तोत्र अत्यंत प्रभावी, फलदायी, सिद्ध आणि रक्षण करणारे आहे. लहानपणी आईने पाठ करून घेतलंय, माऊलीची कृपा आणि रामरक्षा कवच वापरून आपण आपली, मित्रांची आणि निर्दोष साधना नामक कलाकार स्त्रीच्या आत्म्याची सुटका करायला हवी.” मनोबल गोळा करून एकाग्रतेने त्याने स्तोत्रांचा हाच हुकुमी एक्का वापरायचे ठरवले. मनात विचार आल्याबरोबर उशीर कसला! त्याने मंत्रोच्चारण मोठमोठ्याने सुरु केले. शैलेशला डोळ्यानेच सूचक अर्थाने खुणवले. त्यांच्या पुण्याचा म्हणा अथवा मैत्रीचा, प्रेमाचा सकारात्मक प्रभाव म्हणा, शैलेश ती नेत्रपल्लवी समजून गेला आणि स्तोत्र पाठ नव्हते पण मिलींद च्या उच्चारांकडे मन एकाग्र करून राम नामाचा जप शैलेश करू लागला.

मांत्रिकही कमी नव्हता त्याने मुलांच्या एकाग्रतेत अडथळा आणण्यास सुरुवात केली. जोरदार वारा वाहू लागला, काळा धूर पसरू लागला. श्वास गुदमरत होता. सगळीकडे वावटळ सुटलं आणि मुलांना भोवळ यायला लागली. विचित्र किंचाळ्या आणि अमंगल कुबट वासाने वातावरण भरून गेलं. नेटाने मिलींद आणि शैलेश स्तोत्र आराधन करत होते. हळूहळू रामरक्षा स्तोत्राचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली. धूर नाहीसा झाला, दुर्गंध जाऊन सुगंधी वारे वाहू लागले, वातावरणात पवित्रतेचे अनुभूती येत होती. मयूर बेशुद्ध होऊन कोसळला. साधनाचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडला. सर्वात वाईट अवस्था आता मांत्रिकाची झाली होती. तो दुर्बल झाला आणि त्याच्या सर्व शक्ती निष्प्रभ ठरल्या. तो पळू लागला, पण साधनाचा आत्माही बाहेर पडला होता. तीने मांत्रिकाला अडवले आणि त्यानेच पेटवलेल्या आगीत ढकलून दिले. मांत्रिक गुरासारखा ओरडत होता, पण त्याच्या कुकर्माचा परिणाम भोगत होता. मांत्रिक मरून पडला तशी वातावरणात एकदम प्रसन्नता आली. साधना आनंदाने हसू लागली. मुलेही विधात्याचे आणि सर्व पालनहार श्रीरामाचे आभार मानू लागली. रामरक्षेने सिद्ध केलेले तीर्थ शिंपडून मयूरला मिलींदने उठवले. ती जागा आणि साधना दोन्ही मुक्त झाल्या. साधनाने मुलांचे, विशेषतः मिलींदचे आभार मानले आणि ती अनंतात विलीन झाली. क्लान्त तरीही सुहास्य मुद्रेने मुले घरी परतली.

घरी येऊन पाहतात तो काय ?
खुर्चीवर गुलाबाच्या पाकळ्या पसरल्या होत्या आणि फुलांच्या सुवासाचा दरवळ सर्वत्र पसरला होता!
खुर्ची मुक्त झाली होती!
——————————————————————————————————-

भयकथा वाचायला आवडतात? येथे टिचकी मारा.

3 thoughts on “खुर्ची _ भयकथा

  1. मोठ्ठी आहे पण छान रंगवली आहे. रामनामाची व चालिसेची महती सांगितलीस म्हणून माझ्या कडून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!