छोटीसी आशा

छोटीसी आशा

माझी ना, खूप दिवसांपासूनची तमन्ना(हो, तमन्नाच!) आहे. मस्त निवांत दिवस असावा. कसलीही घाई, गडबड, गोंधळ नसावा. सकाळी ११-१२ वाजेपर्यन्त जाग आली तरी लोळत पडून राहावे. मग धांगडधिंगा वाली आधी, नंतर रोमँटिक गाणी लावून माहोल बनवावा. ही गाणी ऐकतच आन्हिकं उरकावी. एक तासभर अंघोळ करावी. महत्वाचं म्हणजे मी घरात एकटी असावी. कांदेपोहे करण्याचा सुद्धा कंटाळा आलेला असावा. मग loose loose comfy कपडे (जे लोकांच्या लेखी जुना -पुराना कळकट, बळकट असतात. एरवी मी घातले तर काय मेलं दरिद्री लक्षण असे तु. क. येतात) अंगावर असूनसुद्धा कसलीही तमा न बाळगता खाली टपरीवर जाऊन इडली सांबार, पोहे वगैरे ऐवज चापावा. मग तिथल्या भैयाला सांगून अद्रक वेलची वाली कडक पेशल चाय (चहा नाही!) घोट घोट हातात काचेचा पेला धरून प्यावी.

तिथल्याच किराणा दुकानात जाऊन चिप्स, मुरमुरे, भेळ,कुरकुरे , सोया स्टिकस वगैरे गोष्टी पिशवीभरून घ्याव्यात. त्यात ते मसालावाले तिखट चीझ बॉल , आचारी त्रिकोण आणि असंच काहीबाही असलंच पाहिजे. इच्छा झालीच तर readymade इमली चटणीचे पाकीट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे maazaa ची मोठी बाटली. हे सगळं घेऊन घरात बेडरूमध्ये यावे. खाऊची पिशवी बेडवरच ठेवावी. मोबाइल, चार्जेर , खाऊ ओतायला काचेचाच बाउल वगैरे सगळं घेऊन बसावे. इअरफोन्स भिरकावून द्यावे. थोडा वेळ नुसतेच लोळावे.

मग मोबाईलवर एखादा कितीतरी वेळा पाहिलेला टुकार कॉमेडी किंवा भन्नाट कॉमेडी कौटुंबिक असा कुठलाही स्टोरी माहिती असलेला सिनेमा लावावा. संबंध दुपार लोळत चिप्स, गोड गोड माझा किंवा फ्रुटीचे घोट(ते orange pulp असलेलं एक ड्रिंक असतं, आठवलं मिनिट मेड ते मिळालं तर उत्तम ) घेत आणि इतर खाऊ खात, सिनेमा , वेब सिरीस , influencers चे विडिओ पाहत घालवावी. इतके रममाण होऊन जावे की अंधार पडलेला सुद्धा लक्षात येऊ नये. मग कंटाळून उठून दिवा लावावा.

जरा उड्या माराव्या , कोचावर, गादीवर वगैरे, वेडेवाकडे नाचावे आणि फिरायला मोबाइलला घरी चार्जिंगला लावून बाहेर पडावे. काही चकरा मारून झाल्या की उगीच बसून राहावे दिवास्वप्न पाहत! मग घरी जावे. जरा रात्र झाली की पिझ्झा, बर्गर वगैरे मंडळींना आवताण द्यावे, त्यांचा समाचार घेऊन नागीण सिरीयल बघत बघत निद्रादेवीच्या अधीन व्हावे!!

बस इतनासा ख्वाब है!

हे स्वप्न मी तुकड्या तुकड्यात सुद्धा जगायला तयार आहे.

आणखी अशी बरीच स्टुपिड ‘आशाए’ आहेत. पुन्हा कधीतरी लिहीन.

तुम्हीही लिहा तुमचे कुठली अशी स्टुपिड तरी हवीहवीशी इच्छा आहे?
येऊ द्या! कदाचित लिहूनही बरंच बरं वाटेल. जसं मला आता वाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!