डालगोना ताक

डालगोना ताक

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली कोणती रेसिपी असेल तर ती आहे उपरिनिर्दिष्ट डालगोना(ज्या शब्दाचा नेमका उच्चार मला माहित नाही तो शीर्षकातला शब्द) कॉफी.

पण भारताच्या भर उन्हाळ्यात ही कोल्ड कॉफी थंडावा देईल हे काही मनाला पटेना.
(फेटायचा कंटाळा हे खरे कारण, शिवाय कुठलाही ट्रेंड आला की आम्ही त्यात सामील न होता आपले वेगळेपण दाखवून देतो. असो. )
मग आमची स्वारी अस्सल देशी ताकाकडे वळली. त्यात नावीन्य आणायचा प्रयत्न केला आहे. नेहमीच काहीतरी आगळे वेगळे, खास आणि कुणीही आतापर्यंत न बनवलेले पदार्थ बनवण्याकडे अस्मादिकांचा :फिदी: कल असतो हे सुजाण वाचकांना / मायबोलीकरांना माहिती आहेच.
तर मंडळी, lockdown आणि कोरोनाची शपथ घेऊन सादर करत आहे अत्यंत आरोग्यदायी पाककृती जिचे नाव आहे डालगोना ताक!!

मनुष्यबळ:
किमान ३ कुशल व्यक्ती, कामाची विभागणी खालील प्रमाणे असेल:

  • ताक बनवणे
  • ताक पिणे आणि छान झालंय असं सांगणे
  • ताकामुळे खराब झालेली भांडी घुवून पुसून जागच्या जागी ठेवणे

पूर्वतयारी:
चांगल्या डेअरीचे दूध आपल्याला मिळेल अशी व्यवस्था करावी. (येथे दूध चांगले असणे अपेक्षित आहे, डेअरी नाही). दुधावर सायीचा छान जाड थर येणे अपेक्षित आहे. दूध तापवून ते कोमट होऊ द्यावे आणि निगुतीने दही लावावे. दही कसे लावावे हे समजत नसेल तर ह्याची डीटेल कृती आणि चर्चा इंटरनेटवर आहे, ती माहिती शोधावी, वाचावी आणि अंमलात आणावी.

साहित्यः

पूर्वतयारी केली असेल असे गृहीत धरून ही स्टेप सांगत आहे. पूर्वतयारी फार महत्वाची हे विसरू नये.
१. पूर्वतयारीमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवलेले दही
घरातील ताक पिऊ इच्छिणाऱ्यांना व्यक्तींचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात दही किचन कट्ट्यावर आणून ठेवावे.
२. पिण्यायोग्य पाणी
RO फिल्टर चे पाणी वापरल्यास निराळी चव येते, आमच्याकडे पारंपरिक पद्धतीत हेच पाणी वापरतात
३. जिरे
घ्या चिमूटभर, एका पेल्यासाठी, जिऱ्याची पूड असेल तरी चालेल, पण ती feel देत नाही राव, दातात जिरा अडकला पाहिजे.
IT वाल्यानो हे atlassian Jira नव्हे , नाहीतर तिकीट शोधाल
४. काळं मीठ
एक चुटकी काले नमक की किमत तुम क्या जानो –(येथे स्वतःच्या नवऱ्याचे नाव ) बाबू

पाककृती:

१. मिक्सर च्या juicer / jar मध्ये (again , जावा वाल्यानो हे jar म्हणजे भांडं बरं का, नाहीतर jar अपलोड कराल ) दही, काळं मीठ, पाणी घाला.
प्रमाण विचारताय? एवढ्या special पाककृतीमध्ये आम्ही basics देत नसतो.
Fundamentals clear पाहिजेत. काय हे आजकालचे लोक..
२. मिक्सरचे भांडे /jar मिक्सरला लावा. पिन सॉकेट मध्ये जोडा. कळ दाबा. मिक्सरचे आकडेदर्शक चाकसमान बटण फिरवा. गुर्रर्रर्र आवाज येईल. घाबरू नका. काहीतरी भारी घडत असताना दंगा तर होणारच !
३. थोडा वेळ फिरवल्यानंतर तुम्हाला ताक घुसळल्याची दिव्य जाणीव होईल. ह्याचे प्रतीक म्हणजे ताकावरती लोणी जमा झालेले दिसेल .
४. आता सगळ्यात कठीण स्टेप, अगदी काळजीपूर्वक पार पाडायची आहे.
एक काचेचा पेला घ्या (तोडफोड नकोय, बरं ).
(ह्या पेल्यातून कुशल व्यक्ती क्र २ ताक पिणार आहे.)
दीर्घ श्वास घ्या.
५. जारमधले घुसळलेले लोणीयुक्त ताक पेल्यात ओतायचे आहे. पण लोणी पडू न देता फक्त ताक ओता.
६. पेल्यात पातळ ताक आले आहे. आता त्यावर लोणी ओता.
७. जिरे टाका.

इतके कठीण आणि महान प्रयास केल्यानंतर अत्यंत आरोग्यदायी आणि चवदार असे डालगोना ताक तयार झाले आहे.

कुशल व्यक्ती क्र २ आणि ३ ला त्यांचे काम करू देत. तुम्ही क्र १ वाले , तुमचे काम झाले आहे. ताकाचा फोटो काढून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची जबाबदारी पार पाडत किचनमधनं सटका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!