तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

कथेचे आधीचे भाग:

श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा.


भाग ५

हर्षदाची कंपनी मिळाल्यामुळे श्रुतीला तसं बरंच मोकळं वाटत होतं. ती श्रुतीच्या अगदीच मोजक्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींपैकी एक होती. फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे राहावे असं जरी ठरलं असलं तरी श्रुतीला एकटीला फ्लॅटवर राहण्यास धाकधूक वाटत होती. बरं , फ्लॅट sharing बेसिस वर घ्यावा म्हटलं तरी जराश्या रिजिड स्वभावाच्या श्रुतीला नवीन मुलींमध्ये मिसळुन राहणे कठीण गेले असते. खूप विचार करून आणि वेगवेगळे पर्याय पाहून श्रुती नेहमीप्रमाणे गोंधळली. अशा वेळेस काय करायचं ते तिला माहित होतं. तिने सरळ आईला विचारायचं ठरवलं. आता आई म्हणेल तेच फायनल करूया असं फायनली ठरवून श्रुती निश्चित झाली. तिने रात्री आईला फोन केला आणि सगळं सांगितलं. आई अर्थातच तिचा स्वभाव आणि तिच्या प्रायॉरिटीज जाणून होती.
आईला सांगितलं असलं तरीही एकीकडे श्रुतीचं जागेचा शोध घेणं चालू होतं. २-३ दिवस असेच फ्लॅट शोधण्यात गेले. तिला कोणताही फ्लॅट अजून तरी पसंतीस उतरला नव्हता. त्यामुळे तीचा मूड जरा नाराजिचा झाला होता.

लवकर परतता यावे आणि श्रुतीबरोबर फ्लॅट पाहण्यासाठी जाता यावे म्हणून हर्षदा ऑफिसला आज लवकर गेली होती. नेमकं हर्षदाच्या घरी कोणीच नव्हतं. ती गेल्यावर अस्थिर वाटून श्रुतीला करमेनासे झाले होते. तिने एकटीनेच नाश्ता केला आणि स्वतःला चीअरअप करण्यासाठी गरमागरम जायफळयुक्त कॉफी तयार केली. कॉफीचा मग घेऊन श्रुती हॉलमध्ये येऊन बसली. इतक्यात तिचा फोन वाजला. फोनवर आई होती. आईचा फोन आला म्हणून श्रुती एकदम खुश झाली.
आई: “काय करतेस बाळा? झाला का नाश्ता?”
श्रुती: “हो आई, झाला नाश्ता. पण तू एवढ्या उशीरापर्यंत जागी कशी, का नाही झोपलीस ?”
आई: “अगं, झोप येत नव्हती मला. मघाशी एक डुलकी काढून झालीये, तू नको काळजी करू माझी. तुझं काय चालूये सांग. मिळाली का राहण्यासाठी योग्य जागा? काही कळवलं नाहीस नंतर काय ठरवलंस त्याबद्दल.”
श्रुती: “आई, ऐक ना, चांगला फ्लॅट मिळतच नाहीये गं. शोधते आहे अजून. त्यातल्या त्यात एक बरा वाटलाय. अजून बघते २-३ दिवस. नाहीच कुठे काही झालं तर तिकडे शिफ्ट होईन. तिथे मुली राहतात त्या जॉब करणाऱ्या आहेत. त्यामुळे मला दिवसा तरी हवी ती शांतता मिळेल.
बाकी स्वभावाने रूममेट्स कशा असतील काय माहिती? बाहेर राहायचं म्हणजे थोडीफार adjustment करावी लागतेच म्हणा! पण आता ना, डोकं पुरतं भंजाळून गेलंय. काय करू काही समजत नाहीये बघ. मी तुला सगळं सांगितलंय, तूच काय ते ठरव. तू म्हणशील ते मी करेन.”
आई: “अगं हो हो. आज किनई एक गंमतच झाली. तुला माझी मैत्रीण सुनंदा आठवते का? ती भेटली होती.”
श्रुती: “अय्या, सुनंदा मावशी! कशीये ती? किती वर्षे झाली ना, काय सुरुये तिचं?. तुला तिकडे कुठे भेटली ती?”


आई: “भेटली म्हणजे, आपलं ते हे, विडीओ कॉलवर गं. आधी मला ती फेसबुकवर सापडली. मध्यंतरी तिच्याशी संपर्कच नव्हता काही. मागे एकदा असंच कधीतरी फोन वर बोलणं झालं होतं तितकंच. मग एके दिवशी people u may know मध्ये दिसली. मग काय, केलं तिला friend list मध्ये add! नुकतंच फेसबुकवर अकाउंट काढलंय तिने. खूप गप्पा झाल्या. मग विडीओ कॉलवर बोललो. तिचा मुलगा IT तच आहे. कसला handsome दिसतोय आता, लहानपणी एवढासा होता गं, तुझ्यापेक्षा ३-४ वर्ष मोठा असेल. नेमका किती ते आठवत नाही. खुप हुशार आहे तो. तुम्ही दोघे लहानपणी एकत्र खेळलात. तेव्हा तू बालवाडीत होतीस.”
जेव्हा आपली आई एखाद्या मुलाचं आपल्यासमोर कौतुक करते तेव्हा काय समजायला हवं ते समजून आईच बोलणं मध्येच तोडत श्रुती म्हणाली.
“आई, तू सुनंदा मावशीच्या मुलाचं स्थळ आणलं आहेस का माझ्यासाठी? त्याच्याविषयी काय सांगत बसलीयेस. गंमत काय ते सांग ना. का हीच गंमत होती?”
जरा गंभीर होऊन आई म्हणाली:
“आता मी काय सांगते ते नीट ऐक. सुनंदा पुण्यात राहते. तिचा तिथे बंगला आहे. मी तिला आधीच गप्पा मारताना सांगितलं होतं की तू पुण्यात आली आहेस आणि राहण्यासाठी फ्लॅट शोधत आहेस. मी तिला ओळखीचा कुणाचा फ्लॅट असेल तर सांग म्हणून विचारलं होतं. पण झालं काय की, 4-5 महिन्यापूर्वी तिचे यजमान वारले. त्यांच्या पश्चात एवढ्या मोठ्या घरात अगदी एकटी पडलीये ती. नाही म्हणजे तिचा मुलगा वेद असतो तिच्याबरोबर, पण तो दिवसभर कामात बुडालेला असतो. स्वतःला त्याने कामाच्या व्यापात बुडवून घेतलं आहे. त्यामुळे सोबत व्हावी म्हणून सुनंदा पेइंग गेस्ट ठेवण्याच्या विचारात आहे. पण त्याबाबतीत काही अडचणी आहेत. तिला अजून मनासारखं कोणी भेटलं नाही की जो तिच्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहू शकेल. तुला तर माहीतच आहे की सुनंदा प्राध्यापक असून तिचं संशोधन, लिखाण वगैरे चालू असतं. आता नौकरी करत नाही पण अधून मधून व्याख्याने द्यायला जात असते. तू तिच्या घरी राहायला जावंस अशी तिची इच्छा आहे.”
श्रुती: “मग तुझं काय म्हणणं आहे आई, तुला तर माहित आहे मला कोणा नातेवाईकाच्या घरी राहायला आवडत नाही. विचित्र वाटतं ते. “
आई: “एक तर सुनंदा तुझी नातेवाईक नाही. ती माझी मैत्रीण आहे. तू तिला भेटून खूप वर्षं झाली आहेत त्यामुळे तुझी फक्त ऐकून ओळख आहे. तिथे तुला राहायला काही हरकत नाही. माझं मत विचारशील तर ते असं आहे की, तू तिथे जा. घरी जाऊन सुनंदा मावशीला भेटून ये. घर बघ. तिच्याशी बोल आणि ठरव काय ते. एक मात्र जरूर सांगेन की, ती माणसं मनाने खुप साधी आणि चांगली आहेत. तुला आवडेल तिथे राहायला. बाकी विचार करून निर्णय तू घेशीलच याची मला खात्री आहे.
महत्वाची बाब म्हणजे आता हे जागेचं भिजत घोंगडं फार वेळ ठेवू नकोस. लवकरात लवकर राहायला जागा शोध आणि तुझं संशोधनाचं काम सुरु कर “
श्रुती: “ठीक आहे माते. हर्षदा आज लवकर येणारे. ती आली की जातो आम्ही घर बघायला. मावशीचा नंबर पाठवून ठेव आणि तिला सांग की मी आज येणार आहे. मग तर झालं?”
आई: “that’s like my good girl, चल ठेवते आता फोन. झोपायचं आहे. बाय.”
श्रुती: “बाय, गुड नाईट. मिस यू आई.”
——————————————————————————————————————
ठरल्याप्रमाणे श्रुती आणि हर्षदा सुनंदा मावशीला भेटून आल्या. पहिल्यांदाच दोघींचं एकमत होऊन त्यांना पाहताक्षणी घर आवडलं. श्रुतीला तिला देण्यात आलेली खोली खुपच आवडली होती. पुण्याच्या मध्यवर्ती भागात असूनही हवा तसा एकांत, शांतता आणि निसर्गरम्य वातावरण असलेला, मोकळा हवेशीर, प्रसन्न असा तो बंगला पाहून श्रुतीच्या मनात कुठल्याही शंका आल्या नाहीत. अगदी उद्याच राहायला येते असं सुनंदा मावशीला सांगून श्रुती हर्षदासोबत बाहेर पडली.
—————————————————————————————————————
नव्या घरात श्रुतीला राहायला येऊन ५-६ दिवस झाले होते. इकडे ती छान रुळली होती. मावशीचा मुलगा गावाला गेला होता. तो मध्ये एकदा येऊन गेला तेव्हा श्रुती घरी नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. श्रुती फारशी बंगल्यात इकडे तिकडे फिरकत नसे. तिची खोली, जेवणाचं टेबल आणि बगीचा एवढ्याच ठिकाणी तिचा वावर असे. इथले कुक दादा एकदम चवदार स्वयंपाक बनवत असत. त्यामुळे तर ती भलतीच खुश होती. तिचं संशोधनाचं कामही मस्त सुरु झालं होतं.
वेद गावावरून परत आला होता. त्याला मुळात आपल्या घरी कोणीतरी मुलगी येऊन राहतेय ही कल्पना फारशी पटली नव्हती. त्याने श्रुतीसमोर जाणे टाळले होते. तिच्याबद्दल काही बोललेलं त्याला आवडत नसे. एवढंच नाही तर तिच्याविषयी सुनंदा मावशी बोलत असेल तर तो दुर्लक्ष करत असे.
आईने पेयिंग गेस्टला हाकलून द्यावे असे त्याला वाटत होते. अर्थात तो हे सुनंदा मावशीला बोलला नव्हता. तिला बरं वाटतंय ना, मग राहू दे त्या मुलीला इथे! काय फरक पडतोय असे म्हणून त्याने तो विषय सोडून दिला होता.
—————————————————————————————————————
आज आदित्यला सौम्याकडून श्रुती पुण्यात आलीये असं ओझरतं समजलं होतं. त्यामुळे श्रुतीची खूप आठवण येत होती. तिला भेटावंसं वाटत होतंच शिवाय अर्धवट राहिलेल्या गोष्टींचा जाब विचारायचा होता. पण तिला पाहिल्यावर जाब वगैरे विचारणं जमणार का हाही प्रश्नच होता. संध्याकाळच्या कातर वेळी तो तिच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. ऑफिसचं काम संपवून घरी जाण्याऐवजी आदित्य त्याच्या आवडत्या कॅफेमध्ये गेला. हा तोच कॅफे होता जिथे त्याने श्रुतीला प्रपोझ केलं होतं. कॉफी मागवण्याची गरज नव्हतीच. तिथला काम करणारा मुलगा ओळखीचा होता. तो आदित्यला आवडणारी स्पेशल फिल्टर कॉफी घेऊन थोड्याच वेळात हजर झाला. शांतपणे कॉफीचे घुटके घेत श्रुतीच्या आठवणीत रममाण झालेला आदित्य कॅफेच्या काचेच्या बाहेर पाहताच आश्चर्याने थबकला. कारण त्याची बाईक कॅफे समोरच्या पिझ्झा हाऊस समोर लावली होती.
“माझी बाइक घेऊन इथे कोण आलं असेल? चावी तर घरी आहे, मी कार घेऊन आलोय. चोरीला तर गेली नसेल. एकदा नंबर तोच आहे ना ह्याची खात्री करूया” असे म्हणून आदित्य बाहेर येत होता तोच हेल्मेट, bikers जॅकेट, ग्लोव्हस , स्पोर्ट्स शूज असा पेहेराव केलेली एक व्यक्ती पिझ्झा हाऊस मधून येऊन त्याच्या डोळ्यासमोर गाडी घेऊन निघून गेली.
आदित्य : “नंबर तर तोच आहे, माझीच गाडी आहे ही”
पळत कॅफेमधून बाहेर येऊन आदित्यने कार काढली आणि तो बाईक गेली त्या दिशेने गेला. कार वेगाने पळवत तो बाईकचा पाठलाग करत होता. शेवटी ती बाईक एका बंगल्यासमोर थांबली.
आदित्य: “इथे घरी नक्की कोण आलंय माझी बाईक घेऊन? असं म्हणून तो घरात घुसला.”
पाहतो तर काय, घरात डायनींग टेबलवर पिझ्झाचे बॉक्स ठेवले होते. तिथे कोणीच नव्हतं. तो आत गेला.

बाजूच्या व्हरांड्यात जॅकेटवाली व्यक्ती पाठमोरी उभी होती.

आदित्य: “कोण आहेस तू? माझ्या बाईकला माझ्या परवानगी शिवाय हात का लावलास?”
आदित्यने रागात बोललेलं हे वाक्य ऐकून दचकून ती व्यक्ती मागे वळली.
एकमेकांचा चेहरा पाहताच दोघे आश्चर्याने बघतच राहिले. जणू ते शॉक झाले होते. काय बोलावे, कोणाला काही सुचेना.
इतक्यात सुनंदा मावशी तिथे आली आणि हसून म्हणाली. “अरे वेद, आज लवकर कसा काय आलास?.

——————————————————————————————————————-

भाग ६

बाजूच्या व्हरांड्यात जॅकेटवाली व्यक्ती पाठमोरी उभी होती.
आदित्य: “कोण आहेस तू? माझ्या बाईकला माझ्या परवानगी शिवाय हात का लावलास?”
आदित्यने रागात बोललेलं हे वाक्य ऐकून दचकून ती व्यक्ती मागे वळली.
एकमेकांचा चेहरा पाहताच दोघे आश्चर्याने बघतच राहिले. जणू ते शॉक झाले होते. काय बोलावे, कोणाला काही सुचेना.

इतक्यात सुनंदा मावशी तिथे आली आणि हसून म्हणाली, “अरे वेद, आज लवकर कसा काय आलास आणि काय रे, असा आश्चर्याने काय पाहतोस? मी जस्ट घरी आलेय. आज मला बाहेर बरीच कामं होती. थोड्या वेळापूर्वी मेसेज आला की कुक दादा येणार नाहीयेत. असंही माझा मस्त पिझ्झा खाण्याचा मूड झाला होता म्हणून मीच बाईक घेऊन जायला परवानगी दिली. मी पण किती वेंधळी आहे. तुमची दोघांची ओळख करून दयायची राहिलीच की.”

सुनंदा मावशी मघासच्या जॅकेटधारी व्यक्तीला उद्देशून म्हणाल्या, “हा माझा मुलगा वेद, म्हणजे ह्याच खरं/official नाव आदित्य. पण आम्ही घरी वेद ह्या नावाने हाक मारतो. तू त्याला ह्यापैकी हवं त्या नावाने हाक मार आणि बरं का वेद, ही आहे श्रुती. आपल्याकडे राहायला आलीये. IT मध्ये आहे, computational algorithms च्या क्षेत्रात संशोधन करतेय. नुकतीच अमेरिकेहून उच्च शिक्षण घेऊन आलीये. हिची आई माझी बालमैत्रीण आहे. तुला सांगितलं होतं ना तिच्याबद्दल, तीच ही. श्रुतीला बाईक चालवण्याची आवड आहे. म्हणूनच तुझी बाईक चटकन घेऊन गेली आणि पिझ्झा घेऊन आली. चला आपण पटापट खाऊन घेऊ. गार झाल्यावर पिझ्झा खायला मजा येत नाही.”
वेद हे आदित्यचं दुसरं नाव आहे, आपण त्याच्याच घरात राहतोय, त्याला अजून भेटलो नव्हतो आणि तो आता अचानक समोर आलाय, ह्या धक्क्यातून श्रुतीला सावरायला वेळ लागणार होताच. मुख्य म्हणजे कसं रिऍक्ट व्हावं हे दोघांनाही समजत नव्हतं. आदित्य तर आश्चर्य आणि आनंद अशा दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवत होता. अर्थात श्रुतीलाही आनंद झाला होताच. पण तिला भयंकर अपराधी वाटत होतं. विचित्र परिस्थिती उद्भवली होती.

श्रुतीने स्पोर्ट्स जॅकेट, ग्लोव्हस उतरवून ठेवले व ती हात धुवायला गेली. आदित्यही फ्रेश होण्यासाठी आणि कपडे बदलण्यासाठी म्हणून रूममध्ये पळाला. त्याला आनंदाने उडी मारण्याची इच्छा होत होती. त्याने बाथरूममध्ये जाऊन श्रुती भेटलीये हे स्वप्न की सत्य ह्याची पडताळणी करण्यासाठी चेहऱ्यावर सपासप पाणी मारले. स्वप्न नव्हतेच ते! श्रुती आज त्याच्यासमोर त्याच्याच घरात होती. त्याच पहिलं आणि एकमेव प्रेम! इतक्या वर्षांच्या विरहानंतर आज अत्यंत आनंदाचा दिवस उजाडला होता. इकडे सुनंदा मावशीने पिझ्झे टेबलावर मांडून घेतले.
एकमेकांकडे हळूच पाहत दोघेही खात होते. सुनंदा मावशी आज खुश होती. तिचा आजचा दिवस छान गेला होता. शिवाय तिचा लाडका मुलगा वेद आज लवकर घरी आल्यामुळे विशेष आनंदी होती. तिचे अनुभव सांगत होती. एरवी श्रुतीने विशेष रस दाखवून हे सगळं ऐकलं असतं आणि गप्पा सुद्धा मारल्या असत्या. पण आज परिस्थिती वेगळी होती. श्रुती सुनंदा मावशी काय बोलतेय हे वरवर ऐकत होती. तीच लक्ष चांगलंच विचलित झालं होतं.
आदित्य आणि श्रुतीला एकमेकांशी बरंच काही बोलायचं होतं. एकाच घरात समोरासमोर असूनही ते दोघे एकमेकांना मोकळेपणाने बोलण्यासाठी चाचपडत होते. बोलण्याची सुरुवात कोणीतरी करायलाच हवी होती. त्याशिवाय हे अवघडलेपण दूर होणार नव्हते. खरे तर दोघेही शॉक मधून बाहेर आले नव्हते. पण एकमेकांना पाहून त्यांना खुप आनंद झाला होता. श्रुती मोबाईलवर उगीचच काहीतरी स्क्रोल करत होती. तिच्या मनात आदित्यला काय बोलावे, तो काय काय विचारेल, तो रागावला असेल का असे त्याच्याविषयीचे विचार सुरु झाले होते. इकडे आदित्यची परिस्थती सुद्धा वेगळी नव्हती. त्यामुळे सुनंदा मावशी काय सांगत होती ते दोघांनाही नीटसं कळत नव्हतं.
हा पिझ्झा सगळेजण मनापासून एन्जॉय करत होते, हे मात्र नक्की!

सुनंदा मावशी: “आज बऱ्याच दिवसांनी आपण असे एकत्र पिझ्झा खातोय, हो ना. अलीकडे असं अबरचबर खाणं बंदच झालं होतं आपलं. पण श्रुतीमुळे योग आला. पटकन बाईकवर जाऊन घेऊन आली. वेद, अरे लक्ष कुठेय तुझं? काय म्हणतेय मी?”
आदित्य: “काय म्हणालीस गं? मी वेगळ्या विचारात होतो. “
सुनंदा मावशी: “अरे, मी म्हटलं, कसा गेला तुझा आजचा दिवस?”
आदित्य: “मस्त गेला. आज काम भराभर उरकलं. बऱ्याच गोष्टींची उकल होईल असं वाटत आहे. काही गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या त्या पूर्ण होतील. काही प्रश्न पडले होते. मी जवळपास आशा सोडून दिली होती पण अचानक आज त्यांची उत्तरे मिळण्याची आज शक्यता निर्माण झालीये.”
ही वाक्य बोलताना आदित्यने श्रुतीकडे एक कटाक्ष टाकला होताच. तो तिच्याबद्दलच्या बोलतोय हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते. आपण त्याला दुखावले आहे, खरंच मोठी चूक करून बसलोय ही जाणीव तिच्या मनात अधिकाधिक प्रखर होत होती.
श्रुती मनात म्हणाली “मला तुला खुप काही सांगायचंय आदित्य, तुझी मनापासून क्षमा मागायची आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या प्रामाणिक आणि सुंदर भावनेची कबुली द्यायची आहे. प्लीज रागावू नकोस असा. तुझं सगळं ऐकायला मी तयार आहे. पण हे काय, शब्दच फुटत नाहीयेत. कधी बोलू मी तुझ्याशी? एकांत आणि योग्य वेळ बघून नक्कीच बोलेन. हो, ह्यावेळेस नक्की! आता तू असा समोर असताना धीर धरवणार नाहीच मुळी मला!
सुनंदा मावशी: “अरे वा, छान. लवकर मिळव उत्तरे. पण एक सांगू तुला, उत्तर मिळत नसेल तर जास्त वाट पाहू नये. काही गोष्टी अनुत्तरित राहतात. त्या पूर्ण करण्याची जिद्द असेल तर मात्र तुला त्यांच्या मागे लागून त्या पूर्ण कराव्या लागतील. तुला नक्कीच यश मिळेल. प्रयत्न सोडू नकोस.”
आदित्य: “हो, प्रयत्न करून झालेत आई. आता फक्त वाट पाहतोय”
सुनंदा मावशी: “मग होईल तुझं काम. प्रामाणिक प्रयत्न नेहमीच फळाला येतात.श्रुती तू काही बोलत नाहीयेस, आज एकदम शांत आहेस.”
“पिझ्झा कसा आहे मावशी, आवडला का तुला?” श्रुतीने चालाखीने विषय बदलला
सुनंदा मावशी: “हो गं, मस्त आहे. पण तू app वरून ऑर्डर का नाही केलास? स्वतः गेलीस आणायला? आजकाल आणून देतात ना ते घरी?”
श्रुती: “हो, पण मला बाईक वर एक चक्कर मारायची होती. म्हणून पिझ्झा आणायचा बहाणा केला. शिवाय ते पिझ्झा आउटलेट माझ्यासाठी नवीन होतं. म्हटलं बघावं कसं आहे ते, म्हणून गेले स्वतः बाहेर. येताना तुझ्यासाठी हे पुस्तक आणलंय ग्रंथालयातून, तुला हवं होतं ना? “
“बरं झालं आणलंस पुस्तक, पुढच्या लेक्चरसाठी नोट्स काढायच्या आहेत. आता मी तेच करत बसणार आहे. तुम्ही दोघं बोलत बसा.
एव्हाना सगळ्यांचं खाणं झालं होतं.
काय रे वेद, काम आहे म्हणू नकोस, बोल तिच्याशी जरा. आपल्याकडे आलीये ना ती. तुमचं फील्ड सुद्धा सारखं आहे. भरपूर विषय मिळतील. IT, कॉम्पुटर, सॉफ्टवेअरच्या गप्पा मारत बसा. बाय. गुड नाईट”

असं हसत म्हणून सुनंदा मावशीने त्यांना हवा असलेला एकांत देऊ केला होता आणि ती तिच्या कामासाठी तिच्या खोलीत निघून गेली होती.
सुनंदा मावशी तिथून जाताच एक विचित्र शांतता तिथे पसरली. ती असल्यामुळे एव्हढा वेळ काहीतरी बोलणं होत होतं. पण आता ह्या दोघांपैकी काही वेळ कोणीच काही बोललं नाही. एकमेकांना निरखत राहिले फक्त ते अभागी जीव! थोड्या वेळाने शांततेचा ताण असह्य होऊन श्रुती तिथून उठली. आदित्य चुपचाप तिच्या हालचाली पाहत होता. तिची अस्वस्थता त्याला समजली होती. पण तो आज बोलणार नव्हता. त्याचा निश्चल चेहरा पाहून श्रुती पुन्हा तिथे आदित्यच्या समोर सोफ्यावर बसली. कुठून सुरुवात करावी हे तिला कळेना. शेवटी ती अबोल शांतता तिनेच भंग केली.
श्रुती: “कसा आहेस आदित्य?, तुझं नाव वेद आहे हे माहित नव्हतं. नाहीतर..”.
आदित्य: “नाहीतर काय? हे माझं घर आहे हे समजलं असतं तर तू इथे राहायला आलीच नसतीस. हो ना?”
श्रुती: “तुझे माझ्याविषयी बरेच गैरसमज झाले असतील. मला मान्य आहे, मी असं न कळवता जायला नको होतं. पण… “
आदित्य: “मला त्या विषयावर बोलायचं नाहीये. ते जाऊ दे, तू सांग कशी आहेस? अमेरिकेला असतेस ना आता. भारीच. मला ऐकायला आवडतील तुझे तिथले अनुभव. तिकडे सॉफ्टवेअरमध्ये काय ट्रेंडिंग आहे आणि त्यांची कामाची पद्धत वगैरे. बोलू आपण डीटेलमध्ये. पण ऐक ना, आता नको, नंतर कधीतरी. तू इथेच आहेस ना, सुट्टीच्या दिवशी निवांत बोलूया आपण. काय आहे ना, सगळ्या भूमिका मलाच वठवाव्या लागतात. सगळं सांभाळता सांभाळता आणि मनाला समजावून मी थकलोय. मला विश्रांती हवीये. कामही आहेच. ते थांबणार नाहीच ना, काही झालं तरी. तुही आराम कर. will you excuse me, ms Shruti?”
श्रुती: “ya sure”
आदित्य: “थँक्स, बाय, गुड नाईट.”
श्रुती: “गुड नाईट.”
आदित्य खोलीत जाताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून श्रुतीला रडू कोसळण्याच्या बेतात होतं.
आदित्य त्याच्या खोलीत लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत असला तरी कामाकडे अजिबातच लक्ष नव्हतं. कारण खिडकीतून इतक्या दिवसांनी भेटलेल्या प्रिय श्रुतीचा चेहरा पाहून भावनांचा वेग अनावर झाल्यामुळे त्याच्याही डोळ्यात पाणी आलं आलं होतं.
ह्या वैरीण भासणाऱ्या रात्रीचा वेळ जाता जात नव्हता. घड्याळाचे काटे आळसावल्यासारखे पुढे सरकत होते. दोन एकमेकांच्या प्रेमात असलेले जीव कुशीवर तळमळत रात्र जागून काढत होते आणि काही केल्या आज लवकर पहाट उजाडत नव्हती.
नकळत सुट्टीच्या दिवशी बोलूया असे बोलून गेल्यामुळे आदित्यला अजून २ दिवस श्रुतीबरोबर मनातलं बोलण्यासाठी, ती काय म्हणते, तिला त्याच्याबद्दल काय वाटतं, इतक्या वर्षात काय झालं, हे जाणून घेण्यासाठी वाट पाहावी लागणार होती.
श्रुती मात्र हे २ दिवस कसे काढणार होती, ते तिला आणि परमेश्वरालाच माहित!

——————————————————————————————————————

भाग ७

ह्या वैरीण भासणाऱ्या रात्रीचा वेळ जाता जात नव्हता. घड्याळाचे काटे आळसावल्यासारखे पुढे सरकत होते. दोन एकमेकांच्या प्रेमात असलेले जीव कुशीवर तळमळत रात्र जागून काढत होते आणि काही केल्या आज लवकर पहाट उजाडत नव्हती.
मध्यरात्रीनंतर कधीतरी श्रुतीचा डोळा लागला. आदित्यच्या तेही नशिबात नव्हते. अचानक त्याला ऑफिसचं काम आलं. कस्टमरला डिलिव्हर केलेल्या कोडमध्ये ऐनवेळी issue आला असल्यामुळे त्याला रात्री जागून काम करावे लागणार होते. थोडा वेळ घरीच काम केल्यानंतर त्याला ऑफिसला जाणे भाग पडले. त्याची टीम आधीच येऊन पोचली होती. अमेरिकेचा क्लायंट असल्यामुळे रात्रभरात issue resolve करून कोड production ला चेक-इन करायचं होतं. अगदीच high- priority module मध्ये issue आल्यामुळे युद्धपातळीवर तो आणि त्याचे सहकारी काम करत होते. त्यांना आवश्यक त्या सूचना देऊन, issue fixing चे काम पूर्ण करून, कोड चेक-इन करायला पहाट झाली.


ह्या सगळ्या गडबडीत आदित्यच्या मनावर खूप ताण आला होता. कालचा दिवसभराचा थकवा, दिवसभरातल्या नाट्यमय घडामोडी, श्रुतीची अचानक झालेली भेट, रात्री जागून केलेल्या कामाचा ताण हे सगळं त्याला आता असह्य झालं होतं. त्याचं डोकं पुरतं भंजाळून गेलं होतं. काम पूर्ण झाल्यानंतर त्याला जरा बरं वाटलं. एव्हढ्या सगळ्या गोष्टींमध्ये एक तरी पार पडली होती. आज त्याला दिवसा विशेष काम नसणार होतं. क्लायंटला मेल पाठवून झाल्यांनतर तो रिलॅक्स झाला. अजून काही बारीक सारीक गोष्टी राहिल्या होत्या. त्या करूनच घरी जावे असं ठरवून तो काम करायला लागला. पण शरीराच्या अव्याहत काम करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतातच ना! झोपेने तिचे काम अचूक केले आणि काम संपवू पाहणाऱ्या आदित्यचा काम करता करताच डोळा लागला. कधी नव्हे ते आदित्य चक्क ऑफिसमध्येच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपून गेला होता.
——————————————————————————————–
श्रुतीला उशीरा झोप लागल्यामुळे उठायला नेहमीपेक्षा थोडासा उशीरच झाला होता. रात्री तिने आदित्यच्या गाडीचा आवाज ऐकला होता. “कुठे जातोयस, का जातोयस, कोडिंगचं काम असेल तर मी काही मदत करू का”, असं तिला विचारावंस वाटलं होतं. पण ती पार्किंगमध्ये पोहोचेपर्यंत आदित्य तिथून निघून गेला होता.तो घरी परत कधी येईल ह्याबद्दल घरी कोणाला काहीही कल्पना नव्हती. सुनंदा मावशी केव्हाच उठली होती. श्रुतीचा सकाळचा व्यायाम झाला तेव्हा सुनंदा मावशी छानपैकी जरीची साडी नेसून तयार होऊन बाहेर जाण्यास निघाली होती. ती आज तिच्या एका नातेवाईकाकडे लग्न असल्यामुळे तिकडे जाणार होती. थोडेसेच जरीकाम आणि नाजुक बुट्टे असलेल्या त्या फिकट पिवळ्या साडीमध्ये मुळचीच सुरेख असणारी सुनंदा मावशी सुंदर दिसत होती.आदित्य अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे पसंत करत नसल्यामुळे मावशीने त्याचा लग्नाला येण्यासाठी नकार गृहीत धरून त्याला येण्यासाठी विचारले नव्हते. आदित्यला काहीतरी अर्जंट काम आले असणार व त्याशिवाय तो असा अचानक न सांगता बाहेर जायचा नाही हे तिला माहित होते. त्यामुळे असाही तिचा विशेष आग्रह नव्हताच. उलट बोअर होतय अशी भुणभुण करणारं सोबत कोणी नसल्यामुळे तिचा वेळ मजेत जाणार होता. आज संध्याकाळी ती आणि आदित्य बाहेर जाणार होते. म्हणून माझा मुलगा मला वेळ देत नाही वगैरे तक्रार न करणारी सुनंदा मावशी आणि तिने काहीही न म्हणताही आईसाठी विशेष वेळ राखून ठेवणारा आदित्य, असे दोघे मायलेक आपापली स्पेस जपत एकमेकांना सांभाळून राहत होते.

आज श्रुती घरीच थांबणार होती. तिला काही assignments आणि experiments पूर्ण करायचे होते. सुनंदा मावशीला बाय करून श्रुतीने घराचे दार आतून लावून घेतले. मूड चांगला व्हावा आणि उत्साह यावा म्हणून तिने मंद सुरामध्ये गाणी लावली. सकाळी बागेतली फुले तिने आणून ठेवलेलीच होती. त्यांचा सुंदर गुच्छ तयार करून फुलदाणीमध्ये ठेवून दिला. तिने तिची रूम आवरली. पुस्तके रचून ठेवली. लॅपटॉप, notepad, पेन असे अभ्यासाचे साहित्य टेबलवर सेट करून ठेवले. आज मनसोक्त आणि अजिबात घाई न करता ती आंघोळ करणार होती. गरम पाण्याने आंघोळ केली की कसे ताजेतवाने वाटते आणि मूड चांगला होतो. ठरवल्याप्रमाणे तिने आरामात आंघोळ केली आणि मघाशीच लावलेल्या गाण्याबरोबर गुणगुणत तिने स्वतःचे आवरायला सुरुवात केली.
——————————————————————————————————————
आदित्यला जाग आली तेव्हा तो त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसून टेबलवर डोकं ठेवून झोपलेला होता. त्याला प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. एकतर आपण ऑफिसात झोपलोय, तेही असं काम पूर्ण न करता ह्याचं त्याला वैषम्य वाटलं. त्याने घड्याळात पाहिलं. अजून ऑफिसची एम्प्लॉईज कामावर येण्याची ठराविक वेळ झाली नव्हती. इतर लोक येण्याच्या आत घरी जायला हवं ह्याची त्याला जाणीव झाली. असही थोडंसच काम उरलं आहे, ते घरी बसूनच करूया असं मनाशी ठरवून त्याने लॅपटॉप उचलला. इतर सर्व gadgets बॅगेत कोंबून तो बेसिनकडे गेला. तोंडावर पाण्याचे हबकारे मारले तेव्हा जरा तरतरी आली. हे करणं गरजेचं होतं. कारण त्याला गाडी घेऊन घरापर्यंत ड्राइव करत जायचं होतं. आता जर झोप लागली असती तर मात्र खरंच वाट लागली असती. मात्र घरी गेल्याबरोबर दुसर्‍या कशाचाही विचार न करता थेट झोपायचं हे त्याचं पक्क ठरलं होतं.

आदित्य घरी पोचला तेव्हा बाहेर मस्त ऊन पडलं होतं. माळीकाकांनी नुकतेच बागेतील झाडांना पाणी दिले होते. झाडांवर टवटवीत रंगीबेरंगी फुलं उमलली होती. एक टपोरा लाल गुलाब दिमाखात डोलत होता. आजवर आदित्यचे बागेकडे एवढ्या बारकाईने काडीचा लक्ष गेले नव्हते. आज मात्र त्याला तो गुलाब श्रुतीला देण्याची तीव्र इच्छा होत होती. कसेबसे स्वतःला सावरून तो दरवाज्यासमोर आला व बेल वाजवली. दार उघडले गेले नाही. मग त्याने लॅचच्या चावीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दाराला आतून कडी लावली होती. २-३ वेळा बेल वाजवूनही दार उघडले गेले नाही तेव्हा आदित्य हैराण झाला. नको नको त्या शंका त्याच्या मनात येऊ लागल्या. त्याची आई बाहेर गेलीये हे त्याला माहीतच नव्हतं. कामाच्या गडबडीत फोन पाहायचा राहून गेला होता. त्याने कॉल करावा म्हणून फोन हातात घेतला, त्यावर आईचा message आला होता. तिने ती बाहेर जाते आहे हे कळवले होते. आदित्य फोन बघतच होता आणि इतक्यात दार उघडले गेले.


आणि आदित्यला मघाशी गुलाबाचे फुल नाही तोडले तेच बरे केले असं वाटलं. दरवाजा उघडण्यासाठी धावत आलेली आदित्यची प्रियतमा नुकत्याच उमलेल्या टवटवीत गुलाबासारखी दिसत होती!
हो ना, दारात श्रुती उभी होती. नुकतीच न्हायली असल्यामुळे ओल्या केसांतून जराजरासे पाणी ठिबकत होते. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. पांढरीशुभ्र ओढणी खांद्यावरून घसरू पाहत होती. पिटुकले मोत्याचे डूल तिच्या चेहऱ्याबरोबर हेलकावे खात होते. तिच्या येण्याने जणू आसमंतात सुगंध भरून राहिला होता. आधीच तिच्या प्रेमात असणाऱ्या आदित्यची तिच्या ह्या रूपाकडे पाहून पुन्हा एकदा झोप उडाली होती.
श्रुती: “आदित्य तू, आता ? मला वाटलं तू आज येणार नाहीस घरी “
आदित्य: “घरात घेतेस ना मला? रात्रभर कामामुळे झोपलो नाही गं !”
श्रुती: “ओह सॉरी, ये ना. मावशी लग्नाला गेलीये. संध्याकाळपर्यंत येईल घरी.”
आदित्य: “आलाय मला तिचा message तसा.”
आदित्यला तिला सांगायचं होतं खरं तर, की श्रुती तू खूप सुंदर दिसते आहेस. तुला बघून दिवसाची सुरुवात छान झाली वगैरे. नेमकं काय बोलावं ह्यासाठी तो मनात वाक्य जुळवत होता. पण प्रत्यक्ष काहीतरी वेगळच गुळमुळीत आणि रुक्ष बोलत होता. त्याचंही बरोबर होतं म्हणा. २४ तासात किती आघाडयांवर धक्के सहन करावेत माणसाने!

पण श्रुतीच बोलली.
श्रुती: “आदित्य, एक विचारायचं होतं. तू थकलेला आहेस, रात्रभर जागरण झालंय तुझं. पण तरीही माझ्यासाठी एक गोष्ट करशील?”
आदित्यचं काळीज धडधडू लागलं. खूप दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे आणि मागे झालेल्या प्रसंगामुळे दोघांमध्ये आधीच एक वेगळाच awkwardness आला होता. अजून ते एकमेकांशी थेट साधं सुद्धा काही बोलले नव्हते. त्यात आज दोघेच घरी होते. मनात आदित्य म्हणत होता, ” नाही, आता नको श्रु, मी खरंच थकलोय गं. तुझ्याकडून ते जादुई ३ शब्द मला ऐकायचे आहेत. पण आता खरंच मनस्थिती फार वेगळी आहे.” पण त्याला हे असले विचार फार वेळ करावे लागले नाहीत.
श्रुती म्हणाली, “जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. एवढंच विचारायचं होतं की, ………………..
…………………………………………………………………

भाग ८

श्रुती म्हणाली, “जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. एवढंच विचारायचं होतं की काल रात्री तू आणि तुझी टीम जे महत्वाचं काम करत होता, त्या टीममध्ये सौम्या होती का? रात्रभर काम करत तीही जागलीये का? “
आदित्य: “हो, सौम्याचं module involved होतं ना, तीही bug fixing करत होती. पण मी तिला म्हटलं की, ऑफिसला येऊ नको. घरून काम कर. ती घरून connect झाली होती, तेव्हढी काळजी घेतो मी माझ्या employees ची”
“ओह! खरंच काळजी घेतोस तू त्यांची? वाटत नाही तसं ” श्रुती तिरकसपणे म्हणाली.
आदित्य: “तुला नेमकं काय म्हणायचं आहे श्रुती? का चिडली आहेस सकाळी सकाळी माझ्यावर?”
श्रुती: “मला काय म्हणायचं आहे हे अजून समजलं नाही तुला आदित्य. आज सौम्याचा साखरपुडा आहे. तू हे पूर्णपणे विसरून गेलास आणि तिला काम करायला लावलस. आज तिला फ्रेश राहणं गरजेचं आहे. खूप मोठा दिवस आहे तिच्या आयुष्यातला आणि ज्या दिवशी तिचे लाड होणं अपेक्षित आहे त्यादिवशी तिची झोपेची किमान गरज पूर्ण झालेली नाहीये. Thanks to her employee friendly boss! “
“ओह नो, मी खरंच विसरलो गं. असं कसं वागलो मी हेच समाजात नाहीये मला. एक तर कामाचं खूप टेन्शन होतं. त्यात अचानक तू भेटलीस. ह्या सगळ्या गडबडीमुळे माझा कालचा दिवस किती विचित्र गेला माहितेय ना तुला. मला खरंच सौम्याबद्दल वाईट वाटत आहे. “
श्रुती: “आदित्य निष्काळजीपणाची हद्द केलीस तू. तुला माहितेय ना की तुझ्या कुठल्याही production issue पेक्षा महत्वाच्या लग्न, साखरपुडा ह्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असतात. त्यात सौम्याचा प्रेमविवाह आहे. मोठ्या मुश्किलीने त्यांनी घरच्यांना लग्नासाठी होकार द्यायला तयार केलं होतं. समजा काही झालं असतं, तर तिच्या सासरचे लोक किती आणि काय काय बोलले असते? त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हे क्षण ती परत जगणार नाहीये. आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर वेळ घालवतानाचे हे खुप हळवे, सुंदर आणि तरल दिवस असतात. आयुष्यात एकदाच होतं असतं असं. “
“प्रेमही आयुष्यात एकदाच होत असतं श्रुती, त्यानंतर फक्त व्यवहारी संसार उरतो.” आदित्य पुटपुटला
श्रुती: “काय?”
आदित्य: “काही नाही मी म्हणत होतो, तिने माझी तक्रार केली का तुझ्याकडे? तुला कसं कळलं सौम्याच्या साखरपुड्याचं?”
श्रुती: “काल तिने मला तिच्या साखरपुड्याचं निमंत्रण द्यायला फोन केला होता. तिने आग्रहाने बोलवलंय.
सौम्या गोड मुलगी आहे, तिने तक्रार तर केली नाहीच. शिवाय ती मला म्हणाली की आदित्य सरांबरोबर काम करताना खुप शिकायला मिळतंय. कोडिंगची मजा येते म्हणे.”
खरं तर आयुष्यात एकदाच होणाऱ्या पहिल्या प्रेमाला वाट पाहायला लावून आपणही त्रासदायक वागलोय हे लक्षात न येता श्रुती भडाभडा बोलत होती. आदित्यच्या मनात तिची बोलणी खाताना तिच्याबद्दल असं काही आलं नाही. मात्र इतक्या दिवसांनी तिच्याबरोबर आपल्या प्रेयसीबरोबर झालेल्या ह्या मोठ्या संवादामध्ये अशा विषयावर स्पष्टीकरण द्यावे लागतेय आणि अपेक्षित असलेले गोड बोलणे किंवा किमान सहज साधा संवाद न होता भांडणच होतेय म्हणून त्याला वाईट वाटत होते. अजून किती मानसिक अवस्थांच्या चढउताराला सामोरे जायचे आहे हे त्याला कळेना. हे सगळे सहन न होऊन तो म्हणाला, “मी सौम्याची माफी मागेन. श्रुती मी तुझा चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. आता तुझं चिडचिड करून झाल असेल तर मी झोपायला जाईन म्हणतो. I am physically and mentally tired. I need to take a rest very badly.”
“काय केलं मी हे, बिचाऱ्याची दिवसाची सुरुवात बिघडवली मी. शेवटी त्याला परत एकदा बोलून दाखवावं लागलं की मला झोपू दे. मी दरवेळेला अशीच माती खाते. तो तर काहीच बोलत नाही. सांगायला गेले एक आणि झालं भलतंच. त्याची माफी मागितली पाहिजे. आता जर हे नाही केलं तर उशीर होईल आणि गोष्टी अजून कठीण होत जातील.”
श्रुती असा विचार करून त्याला बोलेपर्यंत आदित्य रूममध्ये गेला होता. खरंच उशीर झाला होता. जे नातं परत फुलणार होतं ते पुन्हा एकदा कोमेजलं होतं.”


“आपण त्याला साधा चहा सुद्धा विचारला नाही. आता नाश्त्याची वेळ होतेय खरं तर. घरात दोघे असताना आता मी एकटीच खाणार आहे. श्रुती खूप स्वार्थी आहेस गं तू. “
अशा विचाराने श्रुतीच मन खाऊ लागलं. आदित्य उठल्यानंतर त्याच्यासोबतच खाऊया, मग तो जेव्हा उठेल तेव्हा खाणं झालं तरी चालेल. असं ठरवलं तेव्हा कुठे श्रुतीला बरं वाटलं. तिने किचन मध्ये जाऊन एक कडक कॉफी बनवायचे ठरवले. पण कॉफी बनवायला घेतली आणि पुन्हा आदित्यबरोबरच्या सकाळी घडलेल्या तिच्या वाईट वागणुकीची आठवण येऊन रडू येऊ लागलं.
एक गोष्ट तिला समजली नव्हती की, तिचा मुद्दा नेहमी बरोबर असतो. ती योग्य वेळी एखाद्या व्यक्तीसमोर तो मुद्दा मांडते सुद्धा. पण ती ज्या प्रकारे मांडते तिथे काहीतरी चुकतं आणि माणसं दुरावतात. ह्याला फटकळपणा म्हणावं कि स्पष्टवक्तेपणा ह्याचा थोडासा गोंधळच आहे. पण गोष्टी थोड्या सौम्य करून सांगितल्या आणि त्या सांगण्याची पद्धत बदलली तर श्रुतीसारखी चांगल्या स्वभावाची मुलगी नाही कोणी. एखादा चारी बाजूंनी तीव्र कोपरे असलेला ठोकळाजर त्वचेवरून सरकत गेला तर लागतं, वेदना होतात. पण त्याचे कोपरे घासून गुळगुळीत केले, त्या ठोकळ्याचा चेंडूसारखा गोल आकार बनवला तर तो कुठेही आघात न करता अलगद घरंगळत जातो. श्रुतीच्या बाबतीत नेमकं हेच करण्याची गरज होती. तिच्या स्वभावातले फटकळपणाचे कोपरे काढून टाकण्याची!


नेमकी तिच्या स्वभावाची ही बाजू तिला माहित नसल्यामुळे तिच्या स्वभावात काहीही फरक पडला नव्हता. जे जवळचं मित्रमंडळ होतं त्यांना तिचा हा गुण माहीतच नव्हता कारण त्यांच्याबरोबर ती व्यवस्थित वागायची. आता आदित्यनेच तिला ही गोष्ट समजवून सांगायला हवी होती. पण गम्मत अशी की लवकरच ती वेळ येणार होती हे त्यालाही माहित नव्हतं.
आदित्य दमला असल्यामुळे पडल्या पडल्या लगेच झोपला. सुमारे ४-५ तास झोपल्यानंतर त्याला जाग आली. फ्रेश होऊन तो बाहेर आला तेव्हा त्याला श्रुती घरात दिसली नाही. आदित्य किचनमध्ये डोकावला. तिथे जेवण बनवून तयार होतं. कुक दादा येऊन गेले वाटतं असं मनाशी म्हणत त्याने जेवण वाढून घेतले. जेवण्यापूर्वी एकदा श्रुतीला विचारावे जेवलीस का म्हणून त्याने तिला घरभर शोधले. तिच्या रूमच्या दरवाजा बंद होता. त्याने हाका मारल्या पण उत्तर आले नाही. त्याला समजेना ही कुठे गेली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. श्रुती बागेत होती. तिथे ती फोनवर बोलत होती. आदित्य हळूच तिच्या मागे गेला आणि तिच्या डोक्यावर टपली मारली. त्याच्या ह्या कृतीमुळे त्याला सकाळच्या घटनेमुळे राग नाही आला, त्याने ते खेळीमेळीने घेतले हे श्रुतीला एका क्षणात समजले. एकेकाळी रोज सोबत राहिले होते ते दोघे! एव्हढं तर एकमेकांना नक्कीच ओळखत होते.


मघासपासून श्रुतीच्या मनावर जो ताण होता तो नाहीसा झाला. आदित्यचा स्वभाव होताच तसा! पटकन मन जिंकून घेणारा! श्रुतीचं बोलणं संपलं तसं तिने फोन ठेवला व ते दोघे घरात आले.
आदित्य: “चल जेवूया, खूप भूक लागलीये. मुख्य म्हणजे झोप झालीये. जेवणही गरम आहे. आपले कुक दादा एकदम भारी आहेत बरं का., पण तुला एव्हाना लक्षात आला असेलच की ते चवदार स्वयंपाक करतात ते. आज तर माझ्या आवडीचं जेवण आहे. खमंग वास दरवळतोय. घेऊ का तुझं ताट?”
श्रुती: “कित्ती वेळ झोपलास तू आदित्य, पण बरं झालं आराम केलास ते. आता फ्रेश दिसतोयस. सकाळी चेहऱ्यावरून एकदम दुःखीकष्टी वाटत होतास.”
आदित्य: “चला, म्हणजे फायनली तुला माझ्याकडे बघायला वेळ मिळाला. बरोबर आहे, सकाळी उपदेशाचे डोस पाजून झाले आहेत. आता गोड बोलते आहेस. हो ना?”
श्रुती: “तुला खरंच असं वाटतं?”
“गम्मत करतोय गं बाई, कुठल्या गोष्टी कधी गंभीरपणे घ्यावात हे तुला कधी समजणार आहे काय माहित.” आदित्य श्रुतीसाठी वाढून घेत म्हणाला.
ऐक ना, मला ती वांग्याची भाजी नको वाढूस. आवडत नाही. बाकी सगळं चालेल.
आदित्य: “काय? भरली वांगी आवडत नाहीत? अगं एकदा खाऊन तर बघ, मूड चेंज होईल. “
श्रुती: “नको रे, मी जास्त मसालेदार खात नाही. साधं जेवण आवडतं”
आदित्य: “अमेरिकेत जाऊन आलीस तरीही आवड बदलली नाही म्हणायची. मग स्वभाव पण तसाच आहे का, कोणालाही सोबत न घेता, न सांगता-सवरता, आपापल्या विश्वात राहण्याचा?”
श्रुती: “फार त्रास दिला का रे तुला मी? मला खरंच तसं करायचं नव्हतं रे. मला तुला सगळं खुप सांगायचं आहे”
आदित्य: “हा विषय आता नको श्रुती. मला व्यवस्थित जेवण करायचं आहे. सांगता सांगता मध्येच तुझा मूड बदलला तर भांडण करशील आणि जेवण राहून जाईल. दुसऱ्या विषयावर बोलू आपण.”
“मी तुला एवढी त्रास देत असेल तर का बोलतोयस माझ्याशी, राहू दे. नाही सांगणार” श्रुती पोळीचा घास चिवडत म्हणाली.
आदित्य: “अगं वेडे, बघ पुन्हा सिरिअसली घेतलंस. आता आपण बोलत बसलो तर उशीर होईल आणि सौम्याच्या साखरपुड्याला जायचंय ना तुला. अजून तयार झाली नाहीयेस. त्यामुळे आता नको बोलूया एवढच म्हटलं मी. माझं जेवण फास्ट होतं. बघ, तू अजूनही पोळीच खात आहेस” आदित्य वरण-भात बोटांनी कालवत म्हणाला.
श्रुती: What do youn mean by मला साखरपुड्याला जायचंय, तुही येतो आहेस ना? तू यायलाच हवस. सगळे जुने लोक भेटतील पुन्हा कंपनीतले, गप्पा होतील. मुख्य म्हणजे सौम्या किती आनंदी होईल? हे सगळं खुप मिस केलं रे गेल्या काही वर्षात.”
“म्हण ना श्रुती की तू मला मिस करत होतीस, पण नाही, तू असं बोलणार नाहीस. मलाच बोलावं लागणार आहे.” आदित्य मनात विचार करत होता.
“ठीके येतो चल, पण तुला चालेल ना माझ्यासोबत यायला? आणखी एक गोष्ट मघासपासून विचारीन म्हणतो, तू माझ्या बाईकला का हात लावलास? मला आवडत नाही हा. आज मी त्याच बाइकवरून जाणार आहे कार्यक्रमाला. बघ येतेस का सोबत?” आदित्य डोळे मिचकावत म्हणाला.
“जा तू बाईकने मी येईल माझी माझी”
चिडणार नाही ती श्रुती कसली. तिने ताट सिंकजवळ नेऊन ठेवले, हात धुतला आणि फणकाऱ्याने रूममध्ये जायला निघाली. आदित्य हसतच होता. त्यामुळे ती जास्तच चिडली.


“जरा बरे कपडे घालून लवकर तयार हो श्रुती, वाट पाहतोय” हे आदित्यचे शब्द ऐकतच ती रूममध्ये शिरली आणि दरवाजा लावून घेतला. आदित्यही खरकटा हात धुवून तयार होण्यास गेला. थोड्याच वेळात आदित्य तयार झाला. तिला तयार व्हायला अजून वेळ असेल असं गृहीत धरून तो लॅपटॉपवर काहीतरी फुटकळ काम करत बसला. त्याला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हार्ड डिस्क लागणार होती. त्याची हार्डडिस्क त्याने मित्राला दिली होती. श्रुतीकडे असेल तर तिला विचारावं म्हणून तो तिच्या रूमच्या दरवाज्यावर नॉक करू लागला. श्रुतीचं आवरलं होतं. दरवाजा उघडून ती बाहेर आली. आज आदित्यचा बहुतेक श्रुतीला पाहून घायाळ होण्याचा दिवस होता. अबोली रंगाचा फ्लोर लेंग्थ अनारकली कुर्ता, त्यावर मॅचिंग झुळझुळती ओढणी असा ड्रेस तिला खुलून दिसत होता. हलकासा मेकअप, गळ्यातली नाजूक साखळी आणि त्यावर सूट होणारे कानातले, एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात नेहमीच घड्याळ अशा पेहेरावात श्रुती गोड दिसत होती. तिच्या कपड्यांचा अबोली रंग जणू गालावर सांडला होता. त्यामुळे तिच्या लुकची खुमारी अजूनच वाढली होती. आदित्य तिच्याकडे स्तिमित होऊन पाहतच राहिला.

“आवरलं माझं, ठीक आहे ना?” श्रुती कॉम्पलिमेन्टच्या अपेक्षेने म्हणाली. कसं असतं ना, मुळात जिथे मुलींना प्रशंसेची अपेक्षा असते किंवा तू छान दिसतेस असं साधं वाक्य का असेना, ते त्या खास व्यक्तीकडून ऐकायचं असतं, तिथेच मुलांना appreciation देता येत नाही. एरवी बरीच बडबड करतील, पण मुलगी जेव्हा कॉम्पलिमेन्टची अपेक्षा करते तेव्हा नेमक्या त्याच क्षणी ही मुलं माती खातात.

“लाट उचंबळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे |
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळोनी लावण्य वर वहावे ||”
लहानपणी पाठ केलेल्या ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ त्याला समजत होता. ह्या ओळी तिला बघून त्याच्या मनात रुंजी घालू लागल्या . पण बोलण्याचे धाडस होईना. काय बोलावे त्याला सुचेना. नुसताच वेंधळ्यासारखा पाहत राहिला. त्याची उडालेली धांदल पाहून श्रुतीला हसू आलं.
आदित्यचंही असंच झालं. काय बोलावे त्याला सुचेना. नुसताच वेंधळ्यासारखा पाहत राहिला. त्याची उडालेली धांदल पाहून श्रुतीला हसू आलं.

“आदित्य, निघूया, उशीर होतोय. त्या बाजूला किती ट्रॅफिक असेल ते माहित नाही. आताच निघालो तर वेळेवर पोहोचू, चल.” असं म्हणून श्रुतीने पायात सॅंडल घातले. घराची चावी, पर्स, फोन वगैरे सोबत घेतलं आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ जाऊन थांबली.
मघाशी राहून गेलेलं वाक्य आता बोलावं म्हणून आदित्य चाचरत बोलला, “श्रुती, ऐक ना.”
“काय रे”
“आपलं ते हे. मला तुला असं सांगायचं होतं की”
“बोल पटकन, उशीर होतोय रे”
“मला actually विचारायचं आहे तुला”
“हम्म, विचार”
“हार्डडिस्क आहे का तुझ्याकडे, दे ना,काम आहे थोडं, उद्या परत करतो”
“हे सांगायचं होतं का, काय रे, देईन आल्यावर. आता चल पण”
“मला जे सांगायचं होतं ते मी केव्हाच सांगितलंय श्रुती, आता तुझी उत्तर देण्याची टर्न आहे. वाट पाहायला लावून माझी वाट लावलीयेस.” आदित्य श्रुतीकडे रोखून बघत म्हणाला.
“मी मी, … ,
पार्किंग मध्ये थांबतेय. ये तू.”
पुन्हा एकदा उत्तर टाळून श्रुती आदित्यसमोरून निघून गेली होती. महत्प्रयासाने हवं ते नेमकं त्याने विचारलं होतं आणि त्याची निराशा झाली होती.

पण त्याला कुठे माहित होतं की आशा निराशेच्या ह्या खेळाची उजवी बाजू त्याला दिसणार होती. आदित्यपासून दूर राहून त्याच्या खऱ्या प्रेमाला समजून घेणारी श्रुती लवकरच मनातली गोष्ट तिच्या हटके style मध्ये त्याला सांगणार होती!!!!

(क्रमशः )

—————————————————————————————
**किल्ली**
—————————————————————————————

3 thoughts on “तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!