तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग ४

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग ४

कथेचे आधीचे भाग:

श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 3 येथे वाचा.

———————————————————————————————————-

भाग ११

श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता. श्रुती जागेवरून उभी राहिली. हातातला मग बाजूला ठेवला. आदित्य बसला होता तिथून थोडंसं दूर गेली आणि खिडकीकडे पाहत उभी राहिली.
असं तिने आयुष्यात कधी कोणाला म्हटलं नव्हतं ते तिला आता बोलायचं होतं. अशीच शांततेत काही मिनिटं गेली. मनाचा हिय्या करून श्रुती मागे वळली आणि म्हणाली, ” हे म्हणायला मी पात्र आहे की नाही ते माहिती नाही. पण, मोठ्या मनाने माफ कर मला.

मी मान्य करते की असं तुला सोडून जायला नको होतं. माझ्या अशा वागण्याने तुझा, तुझ्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि मैत्रीचाही अपमान झाला.  तरीही तू माझ्यावर विश्वास दाखवलास. प्रेम करत राहिलास. तुझ्या डोळ्यांत स्पष्ट दिसतं ते. पण म्हणून तू माझ्यावर रागावू नये असं मात्र नाही हा. तुझा हक्क आहे तो. किंबहुना तू माझ्यावर चिडायला हवंस आणि जाब विचारायला हवास की का अशी सगळं अर्धवट टाकून सोडून गेलीस ?

………

बोल ना रे आदित्य. तुझी ह्या बाबींवरील शांतताच छळते मला. इतका समजूतदारपणा काय कामाचा? ठीके, एवढं छान छान वागत आला आहेस तर तसंच माफ पण करशील ना रे? I am really very sorry”.

सॉरी म्हणताना श्रुतीचा आवाज जड झाला असला तरी मन हलकं झालं होतं. इतके दिवस बाळगलेलं मनावरचं अपराधीपणाचं मणभर ओझं दूर झालं ह्याचं नक्कीच तिला समाधान लाभलं होतं.

आदित्यला मात्र तिचं सॉरी अपेक्षित नव्हतं. तिने माफी मागावी अशी त्याची इच्छाही कधीच नव्हती. त्यामुळे तो थोडासा गडबडला. पण आज तिच्या मनातल्या भावना व्यक्त होताहेत, तिची बाजू ऐकली गेलीये  आणि ती जरी अचानक गेली असली तरी श्रुती वाईट, गर्विष्ठ नाहीये ह्यावर त्याच्या मनात शिक्कामोर्तब झालं. आदित्य जेवढा तिला ओळखत होता त्यानुसार ती घडाघडा बोलणारी नाहीये हे त्याला माहित होतं. आज ती एवढं मनमोकळं बोलत आहे म्हणजे ती खरंच मनापासून बोलतेय, जे घडलं त्याबद्दल तिलाही वाईट वाटत आहे, हे जाणून आदित्यला एवढे तरी कळले की मुलगी प्रेमाच्या जवळ येत आहे. आता हे माणुसकी व मैत्रीखातर बोलतेय की खरंच प्रेमात आहे हे काही अजून स्पष्ट झालं नव्हतं. एक मात्र नक्की की, श्रुती आणि आदित्य ह्या उभयतांमध्ये मैत्रीचा बंध जरूर होता.  असा विचार करत असताना काहीही न बोलता शांतपणे आदित्य जागेवरून उठला. दोघांचे मग घेऊन त्याने ते सिंकमध्ये नेऊन ठेवले.

तो काय बोलतो ह्याच्या विचाराने श्रुतीला इकडे धडधडू लागलं होतं. त्याने आपल्याला माफ केलं नाही तर काय होईल अशी वेडी शंकाही तिच्या मनात डोकावून गेली  ती अधीरतेने त्याच्याकडे पाहत होती. तो काही मिनिटांचा पॉझ तिला असह्य होत होता. तिची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.

आदित्य पाण्याचे ग्लास भरत होता. ते ग्लास ट्रे वर ठेऊन त्याने तो ट्रे श्रुतीसमोर धरला. “हे घे पाणी पी श्रु, कॉफी घेऊन बराच वेळ झालाय ना. तहान लागली असेल. किती बोलतेस तू, पाणी प्यायला सुद्धा वेळ दिला नाहीस.”

श्रुती: “आदित्य, सांग ना माफ केलं की नाही ते “

छानशी आश्वासक स्माईल देत आदित्य म्हणाला, “माफी काय मागतेस श्रुती गुन्हेगार असल्यासारखी. खरं सांगायचं तर मी रागावलो नव्हतो तुझ्यावर. पण तुला खूप मिस केलं, मनातल्या भावना न सांगता गेलीस, जे आहे ते स्पष्ट बोललीस तरी चाललं असतं असं सारखं वाटायचं. पण तू काळजी करू नकोस. त्यावेळी तुझी मनस्थिती कशी होती, तू काय विचार केलास आणि का तशी वागलीस ह्याचं पुरेसं स्पष्टीकरण दिलंय तू. मनमोकळं बोललीस ह्याचा आनंद झालाय मला. तुझ्या आजच्या बोलण्यामुळे मला एवढं समजलं आहे की माझं तुझ्या मनात काहीतरी स्थान आहे.”

श्रुती: “हम्म”

आदित्य: “आणि मॅडम, तुमच्या माहितीसाठी मैत्रीच्या नात्यात माफी, धन्यवाद वगैरे औपचारिकतेला स्थान नसते. त्यामुळे तू माझी माफी मागण्याचा आणि मी तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही.”

श्रुती:  “सरळसरळ सांग ना, सॉरीने काही फरक पडत नाही. जे व्हायचं होतं ते झालं आता सुधारता येणार नाही म्हणून” रडवेली होऊन श्रुती म्हणाली.

आदित्य: “बरं बाई, मी चुकलो माफ कर मला”

श्रुती: “तुझा सॉरी म्हणायचा काय संबंध?”

आदित्य: “एवढ्या सुंदर मुलीला रडवल ना मी”

श्रुती: “मी रडत नाहीये”

आदित्य: “चेहऱ्यावर दिसतंय, बादली घेऊन येतो अश्रू भरून ठेवायला लागतील ना, ऐतिहासिक आहेत ते”

श्रुती: “चेष्टा पुरे ना आदित्य, खरं सांग, माफ केलं का नाही”

आदित्य: “तू तर पिच्छा पुरवत आहेस माझा”

श्रुती आता चिडायला लागली होती. तिचा मूड बिघडायला नको म्हणून आदित्य म्हणाला, “जा मुली, माफ केलं तुला. तू भी क्या याद करेगी”

श्रुती: ” खरंच ना?”

आदित्य: “हो गं , आता लिहून द्यावं लागेल का मला? 

असंही तुझा documentation वर फारच विश्वास आहे म्हणा, आठवतंय का? ऑफिस मध्ये तुझं रोज कसलंतरी document तयार असायचं. आज काय नोट्स उद्या काय मीटिंग चे मुद्दे , उद्या काय कोड कसा लिहावा ह्याच्या guidelines असायच्या juniors साठी!  तू पाठवलेल्या documents च्या मेल्स बघून पकलो होतो मी. तुला माहितेय का, तू सोडून गेल्यांनतर अशी शिस्त कुणीच पाळलीच नाही. करायची प्रोसेस म्हणून लोक काहीतरी करायचे बास! पण तुझं कामाप्रती असलेलं dedication जबरदस्त होतं. मानलं यार!”

श्रुती: “थँक्स. खूप बोर करते का रे मी ? पण सवयीचा भाग होता तो! गोष्टींची नोंद करायला, त्या डायरीत लिहून ठेवायला मला फार आवडतं. माझी डायरी माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे.”

आदित्य: “I know, you are an introvert!  त्यामुळे तुझ्याबद्दल ‘तू खडूस आहेस’ असा लोकांचा ग्रह होतो.”

श्रुती: “काय सांगतोस, हो का?”

आदित्य: “मग काय, सुरुवातीला किती फटकून वागायचीस तू. नंतर मात्र छान रूळलीस ऑफिस मध्ये. विशेषतः त्या पार्टी नंतर. खूप सुंदर दिसत होतीस तू. त्या दिवशीच तुला मनातलं सांगणार होतो. सगळे मला किती आग्रह करत होते माहितीये का,  आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून मुद्दाम सोडून जात होते.”

आदित्यचं हे वाक्य ऐकून श्रुती आश्चर्याने जागेवरून उठली. हातातल्या ग्लासशी उगाचच चाळा करत जराशी लाजून आणि त्याला ते समजू नये म्हणून चेहरा जरासा वळवून म्हणाली, “म्हणजे सगळयांना माहिती होतं? मला वाटलं हे माझंच गुपित आहे आणि मला एकटीलाच माहितीये.”

आदित्य: “तू तुझ्याच जगात हरवलेली असायचीस ना, आमच्याकडे लक्ष नव्हतंच तुझं. मी तुला मनातलं सांगण्याआधी त्याबद्दल तुला हिंट द्यायचा सगळ्यांनी प्रयत्न केला होता. तरी तुला हिंट नाही समजल्या”.

आदित्यचं बोलणं मध्येच तोडत श्रुती म्हणाली, “क्काय, काहीही बोलतोयस आता तू. बरं एक सांग ना…”

आदित्य: “दोन सांगतो, पण काय?”

श्रुती:  “गप रे, मला बोलू तर दे. आणि अजून एक लक्षात ठेव, मी जास्त कुणाशी बोलत नसले तरी मला माझं बारीक लक्ष असायचं बरं का तुमच्या सगळ्यांकडे. तुमच्या सगळ्या बारीकसारीक गोष्टी माहिती आहेत मला.”

श्रुतीच्या या विधानावर आदित्य हसू लागला. “काही माहिती नाहीये तुला. किती काम करायचो आम्ही सगळे.“

श्रुती: “हो काम तर करावंच लागतं ऑफिसमध्ये. बरं ऐक ना, सगळे कसे आहेत? तुझ्या संपर्कात असतील ना. रोजच कंपनीत भेटत असशील सगळ्यांना. आणि काय म्हणते आपली कंपनी? काम भरपूर असतं का रे हल्ली? ”

आदित्य: ” सगळ्या आपल्या तेव्हाच्या ऑफिस कलिग्सबद्दल बोलत असशिल तर ते आता माझ्यासोबत कंपनीत काम करत नाहीत. सोडून गेले सगळे. सौम्या वगळता तू ओळखतेस अशी एकही व्यक्ती आता कंपनीत नाही. कामाचं म्हणशील तर सध्या प्रचंड लोड आहे . गेल्या काही दिवसात तू पाहत आहेसच न. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्यावरच सगळी जबाबदारी पडलीये. मला काही वैयक्तिक आयुष्य राहिलंच नाही असं वाटतंय. दिवस आणि रात्र कंपनीतच आणि कंपनीचा विचार करण्यातच जातात.”

श्रुती: “ नक्की काय प्रॉब्लेम्स आलेत ? लोड असेल तर resource hire कर ना. बजेट issues आहेत का? अखिलेश काकांना बोललास का त्याबद्दल? तुझे बाबा कंपनीचे MD आहेत ना, त्यांना genuine प्रॉब्लेम असेल तर तू सांगूच शकतोस. त्यांना ह्या क्षेत्रात खूप चांगला अनुभव आहे. ते नक्कीच मार्ग सुचवतील. ते गावावरून आले की विचार त्यांना”

“नाही गं श्रुती. ते अशा गावाला गेलेत, की जिथून परत येणं शक्य नाही. कधीच शक्य नाही”

हे बोलताना आदित्यचा आवाज रडवेला झाला होता. कंठ दाटून आला होता. डोळ्यातलं पाणी मोठ्या मुश्किलीने परतून लावत तो उठला आणि म्हणाला , “जाऊ देत, आता नको तो विषय. उशीर झालाय बाकीचं नंतर बोलू आपण. इतक्यात आई येईल. आपण जेवलो नाही हे पाहून ती रागवेल आणि मलाही खूप भूक लागलीये. खूप वेळ झाला ना, जेवून घेऊ. स्वयंपाक केलेला आहे बहुतेक.”

“हो , कुक दादा येऊन गेले मघाशीच, आपण बोलत होतो म्हणून काही न बोलता गेले ते. मी पानं वाढून घेते.” असं म्हणून श्रुती किचनमध्ये ताटे, वाट्या घेऊन जेवण वाढून घेऊ लागली. तिच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. “एवढी मोठी घटना घडली आणि मला काहीच माहित नाही. आदित्य, सुनंदा मावशी दोघेही त्याबद्दल बोलले नाहीत. आईने सुद्धा काही सांगितलं नाही. तिला माहित नसेल का? मला कसं समजेल? आदित्यला विचारावं का? मी जर आता हा विषय काढला तर जखमेवरची खपली निघेल आणि वेदनेचं रक्त भळाभळा वाहायला लागेल. नकोच त्याला त्रास द्यायला. त्यानी स्वतःहून सांगितलं तर सांगू देत. बोलल्याने दुःख हलकं होईल कदाचित. नाही बोलला तर नको विचारायला”

इकडे आदित्यला त्याच्या बाबांची आठवण आली होती. त्यांचं अचानक जग सोडून जाण्याने तो पुरता खचला होता. कसंबसं त्याने स्वतःला,  कंपनी business ला आणि आईला सावरलं होतं. आता पुन्हा दुखरा विषय निघाल्यामुळे तो हळवा झाला होता. जेवायला वाढ असं तो श्रुतीला म्हणाला कारण त्याला चेहऱ्यावर दुःख दिसू द्यायचं नव्हतं आणि काही क्षण एकटे हवे होते. पुन्हा एकदा सावरून बसण्यासाठी! भूक तर त्याला नव्हतीच आता, पण श्रुतीसाठी आणि आईला वाईट वाटू नये म्हणून तो अश्रुंचे कढ लपवत दोन घास खाणार होता.

कसं असतं ना, मुलांना सहजतेनं दुःख व्यक्त करायला, मनमोकळं रडायला मिळत नाही. बिचारे आतल्या आत कुढत, दुःख सहन करत राहतात. जबाबदारी असते ना आणि मुळूमुळू रडून चालत नाही. मनस्थिती अशावेळी कठीण होते. जवळचं कुणी असेल समजून घेणारं तर त्याच्याजवळ बोलून मन शांत करून घेता येतं. आदित्यचं तसं झालं नव्हतं. समजूतदार असण्याचे दुष्परिणाम असतात ते असे.

—————————————————————————————————-

भाग १२

शांतपणे दोघांनी जेवण केलं. कुणीच कोणाशी काही बोललं नाही.
सगळ्या घटनांचा अर्थ हळूहळू श्रुतीला समजू लागला होता. आदित्य आणि सुनंदा मावशी ह्या दोघांचच घरात राहणं, सुनंदा मावशीचं स्वतःला कामात आणि व्याखानांमध्ये बुडवून घेणं, मध्येच हळवं होणं, कधीकधी एकटीनेच खोलीत तासनतास बसणं, जास्त कार्यक्रमांना कुठे बाहेर न जाणं वगैरे. तिने एकदोनदा सुनंदा मावशीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलं होतं. पण घरात आदित्यच्या बाबांचा एकही फोटो कसा नाही ह्याचं तिला आश्चर्य वाटलं.

श्रुती विचारात हरवली होती. तिला असं विचारात गढलेलं पाहून आदित्यला जणू काही ती पुढे काय विचारणार ह्याची कल्पना आली होती. तरीही तो शांत होता. एकदम बाबांचा विषय निघाल्यामुळे भावना अनावर होतील, रडू कोसळेल ह्या भीतीने त्याला आता त्याची स्वतःची space हवी होती. पण असं एकदम उठून गेलो तर तिचा गैरसमज होईल म्हणून तो हातातील पाण्याच्या पेल्याशी चाळा करत चुळबुळत एकाच जागी बसून राहिला.

दारावरची बेल वाजली. श्रुती उठलीच होती पण तिच्या आधी आदित्यने दार उघडले. सुनंदा मावशी आली होती.
“कसं झालं गेट-टुगेदर आई? मजा आली का?”
“हो रे, धमाल केली आम्ही! किती दिवसांनी भेटलो सगळ्याजणी! खूप गप्पा झाल्या.”
हातातली पर्स समोरच्या सेंटर टेबलवर ठेवून सुनंदा मावशी किचन मध्ये पाणी प्यायला गेली. आदित्य तिच्या मागोमाग गेला.
“मी चहा करू तुझ्यासाठी? की कॉफी घेणारेस ?”
पाण्याचा एक घोट घेऊन आदित्यची आई म्हणाली,
“काहीही नको रे. मी आता मस्त ताणून देणार आहे. अरे, तिथे निरनिराळे खेळ खेळलो आम्ही. दंगा घातला. ह्या वयात शोभत नसला तरी! त्यामुळे दमायला झालंय. पण शरीर दमलं असलं तरी मनाला ताजंतवानं वाटतंय.”
सोफयावर बसत श्रुतीकडे बघून सुनंदा मावशी पुढे म्हणाली,
“मला ना श्रुती, खूप हलकं फुलकं वाटत आहे. मनावरचा ताण गेल्यासारखं.
खरंच आपले मित्रमैत्रिणी स्ट्रेसबस्टर असतात आपल्यासाठी! भेटत राहिलं पाहिजे. बोलत राहिलं पाहिजे. हो ना?”
“हो मावशी, खरंय तुझं. भेटलो, बोललो नाही तर एकमेकांच्या आयुष्यात काय चालूये हे कसं समजणार?”

श्रुतीचे वाक्यातील विरोधाभास जाणवून जरासं चिडून आदित्य म्हणाला, “अगदी बरोबर.
पण आई मला सांग, तुझ्या मित्रमंडळात अशी लोकं आहेत का, जी कोणाला न सांगता सवरता अचानक गायब होतात, संपर्क ठेवत नाहीत आणि मित्र म्हणवतात ? अशा लोकांपासून सावध राहा बरं.. नुसत्या बडबडीचे धनी असतात असे लोक.”

“असं कोणी करत नाही रे आणि जरी असं झालं तर आपण त्रास नाही करून घ्यायचा. वेद, तू का चिडतोयस पण? काय झालंय ? ”

“कुठे काय, काही नाही” असे म्हणून आदित्य तडक त्याच्या खोलीत निघून गेला.

“हल्ली जरा जास्तच चिडचिड करतो. ऑफिसचं कामही खूप वाढलंय ना त्यामुळे असेल. पण आज जरा वेगळाच वागला.काय झालंय असेल गं ह्याला?” आदित्यच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सुनंदा मावशी म्हणाली.

“जाऊ दे गं मावशी. चहा हवा असेल तेव्हा येईल परत तो. तूही आराम करणार होतीस ना. आत जाऊन झोप, मीही एक assignment पूर्ण करते. खूप दिवसांपासून अपूर्ण राहिलीये आणि आता मला ती पूर्ण केलीच पाहिजे.”
असं म्हणून श्रुतीने तिथले पाण्याचे ग्लास उचलले. जागेवर नेऊन ठेवले. एक तांब्या पाण्याने भरून पेल्यासहीत सुनंदा मावशीच्या खोलीत नेऊन ठेवला.
तिला आजवर कधीच न दिसलेला एक छोटासा फॅमिली फोटो मावशीच्या बेडशेजारी लॅम्पजवळ ठेवलेला होता. त्यात सुनंदा मावशी, आदित्य आणि त्याचे बाबा ह्या तिघांची बागेतली प्रसन्न छबी टिपली होती.


श्रुती चटकन तिथून निघून स्वतःच्या खोलीत गेली आणि पुन्हा एकदा पश्चातापाच्या आगीत होरपळू लागली. जेव्हा जवळची मैत्रीण म्हणून आदित्यला सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी त्याची साथ देऊ शकले नाही, ह्या गोष्टीमुळे खूप अपराधी वाटत होतं. विमनस्क अवस्थेत ती खुर्चीवर बसली. assignment तर पूर्ण करावीच लागणार होती. तिने लॅपटॉप उघडला, on केला. जरा फ्रेश वाटावं आणि assignment करण्यात लक्ष लागावं म्हणून शांत स्वरातली गाणी लावली. हार्डडिस्क मधला काही डेटा लागणार होता. म्हणून तीही तिने लॅपटॉपला जोडली.

आवश्यक तो डेटा कॉपी केल्यानंतर तिची नजर हार्डडिस्क मधल्या एका फोल्डरवर पडली. त्या फोल्डरचं नाव होतं, “मिशन आदित्य “.
श्रुतीला वाटलं आदित्यने हार्डडिस्क वापरली व तो त्याचा डेटा डिलीट करायला विसरला. असू देत, आपणच डीलीट करूया असं म्हणून तिने फोल्डर आयकॉन वर right क्लिक केलं. पण त्या फोल्डर मध्ये काय डेटा असेल ह्याची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती.काही महत्वाचं असू शकतं असा विचार करत तिने तो फोल्डर उघडण्यासाठी enter मारला. पण हाय रे किस्मत! फोल्डरला पासवर्ड होता. बरीच खटपट केल्यानंतर श्रुतीला तो फोल्डर उघडण्यात यश मिळालं.

त्यातल्या फाइल्स ती वाचू लागली. सुमारे ४-५ तास ब्रेक न घेता अतीव उत्साहाने श्रुती त्या फोल्डर मधल्या माहितीचा अभ्यास करत होती. नोट्स काढत होती. जेव्हा सगळं मनाप्रमाणे झालं तेव्हा ती खोलीच्या बाहेर आली. आदित्य आणि सुनंदा मावशी जेवून झोपायला गेले होते. बाहेर रात्र झाली होती पण तिला मात्र आशेचा किरण दिसू लागला होता. “मिशन आदित्य” काय आहे हे तिला समजलं होतं आणि आदित्य उर्फ वेदला आता ती एक मैत्रीण आणि त्यावर प्रेम करणारी प्रेयसी ह्या दोन्ही नात्यांनी मदत करणार होती.

श्रुतीने ठरवलं होतं की आता आपण स्वतःहून आदित्यला प्रपोझ करायचं. तो अजूनही प्रेम करतो का हे स्पष्टपणे विचारायचं. हि बैचैनी, अस्वस्थता तिला आता नकोशी झाली होती. प्रेमात हिशोब नसले तरी आव्हान असतेच. एकमेकांसाठी खूप काही कारवाई लागते, तेही निरपेक्षपणे! शिवाय प्रेमाची वाट सरळ साधी नसते. प्रेम मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. मन जिंकावे लागते. प्रेम टिकवावे लागते, निभवावे लागते. ह्या गोष्टींची श्रुतीला जाणीव होत होती. तिचे प्रेम ती परत मिळवणार होतीच. at any cost !!

पण श्रुतीला कुठे माहित होतं ती मिळवण्यापुरते प्रयत्न करून थांबणार नव्हतीच मुळी! कारण नशीब तिला पुन्हा एका नवीन वळणावर आणणार होतं. तिलाच नाही तर आदित्यला सुद्धा! शेवटी ह्या जन्मी केलेल्या कर्माची फळं ह्या जन्मीच भोगावी लागतात नाही का? सगळे हिशोब चुकते करावे लागतात.

———————————————–

आज आदित्यला ऑफिसला पोचायला जरा उशिरच झाला होता. गेले ४-५ दिवस कामाचा लोड उपसून आणि रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये थांबून तो थकून गेला होता. त्यामुळे आज उठायला उशीर झाला. वीकएंडला श्रुतीबरोबर झालेल्या गप्पा, त्यानंतर अचानक बाबांचा निघालेला विषय ह्यामुळे त्याच्या मनात मिश्र विचारांचं वादळ उठलं होतं. त्याला मानसिकरीत्या ताण आला होता. त्यात हे कामाचं टेन्शन! आदित्य पुरता वैतागून गेला होता. भरीस भर म्हणजे श्रुती ‘त्या’ दिवसानंतर त्याला भेटलीच नव्हती. ती गावाला गेली असं त्याला आईकडून समजलं. त्यामुळे थोडाफार विरंगुळा किंवा आनंद सुद्धा मिळत नव्हता. तो आतुरतेने तिची वाट पाहत होता. ह्यावेळेस त्रोटक msg पाठवून श्रुती गायब झाली होती. मैत्रीणीच्या लग्नासाठी बाहेरगावी जातेय एवढाच तिने त्यात लिहिलं होतं. कधी परत येणार वगैरे काहीच उल्लेख नव्हता. आदित्यने न राहवून कॉल केला तर महत्वाचं काम आहे ते पण करायचं आहे असं फोनवर म्हणाली आणि जास्त न बोलता कॉल कट केला. त्यामुळे आदित्य तिच्यावर जरा चिडलाच होता. “नीट सांगता येत नाहीच हिला काही. सतत सस्पेन्स create करते. मी मात्र अंदाज लावत बसायचं.” असं स्वतःशी पुटपुटत त्याने लॅपटॉप on केला. भराभर मेल्स पाहिल्या, त्यांना उत्तरे दिली. एक मेल पाहून तो चरकलाच! अखिलेश काका म्हणजे त्याच्या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापक, संचालक हयांनी ती मेल पाठवली होती. त्यात असं स्पष्ट लिहिलं होत की आदित्य ह्यापुढे research lab आणि product engineering हे युनिट संभाळणार नाही. त्याच्याऐवजी एक नवीन व्यक्ती हे काम बघणार आहे. हा निर्णय काकांनी परस्पर कसा घेतला ह्याचं त्याला आश्चर्य वाटलं. बाबा गेल्यापासून पहिल्यांदाच काकांनी त्याला न कळवता निर्णय घेतला होता. महत्वाचं म्हणजे research lab आणि product engineering मध्ये त्याला विशेष रस होता. त्याने त्यावर खूप मेहनत घेतली होती. पण त्याला आतापर्यंत म्हणावे तसे यश आले नव्हते. कदाचित हेच कारण असावे काकांनी मला पदावरून दूर करण्याचे! पण असं कसं होईल? नवीन recruitment मला न विचारात किंवा विश्वासात न घेता झालीच कशी? आदित्यचं डोकं काम करेनासं झालं. ह्या बाबतीत त्यांनी काकांशी बोलायचं ठरवलं. त्यांना कॉल केला. त्यांना आदित्यचा कॉल अपेक्षित होताच असं म्हणून त्यांनी प्रत्यक्ष भेटून सगळी explanations देईन. तू काळजी करू नको असं सांगितलं. काका अजून १० दिवसांनी पुण्यात उतरणार होते तोपर्यंत आदित्यच्या डोक्यात हा गुंता कायम राहणार होता. वैतागून तो डेस्क वरून उठला आणि कॉफी घ्यायला कॅफेटेरिया मध्ये गेला. कॉफीचे घोट घेताना विचारचक्र सुरु होतंच. शेवटी आपल्याला ब्रेक हवा आहे हे त्याला प्रकर्षाने जाणवू लागले. काकांनी केलं ते योग्यच असेल अशी मनाची समजूत घालून तो डेस्कवर परतला आणि यांत्रिकपणे कामं उरकू लागला. आवडतं काम हातातून गेल्यामुळे तो दुःखी झाला होता. कसाबसा त्याने आज ऑफिसमध्ये दिवसाचा वेळ काढला. आज मनस्थिती ठीक नव्हती. फोन पाहण्याची पण त्याची इच्छा होत नव्हती. शेवटी कंटाळून तो घरी निघून गेला.

घरी जाऊन सहज फोन पाहतो तर काय!
४ missed calls होते!
त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पुन्हा कॉल येऊ लागला. स्क्रीनवर फ्लॅश होणारं नाव पाहून आदित्यचा मूड गुलाबी झाला. त्याने कॉल उचलला आणि म्हणाला,

“Hi श्रुती, कशी आहेस? काय म्हणते तुझी बंगळुरू ट्रिप? एवढं busy schedule असताना तुला कशी काय आठवण आली ह्या पामराची?” “अरे हो हो, बोलू देत मला. किती प्रश्न विचारशील?”

“आज मुद्दामच कॉल केला तुला, वेळ होता, म्हटलं, निवांत गप्पा मारूयात”

“Oh, is it? मला वाटलं तिकडे मजेत असताना मला कशाला कॉल करशील, म्हणून मीही नाही केला”

“मस्करी पुरे हा आदित्य, msg वर बोलतोय ना आपण रोज, तू तर असं म्हणतोयस की मी अज्ञातवासात गेले”

“तुझा काही भरवसा नाही गं.”

“मारलास ना टोमणा पुन्हा, एक संधी सोडू नकोस”

“आयुष्यभर हेच ऐकवणार आता तुला मी’

“हे हे, तशी संधी मिळणार नाही तुला”

“म्हणजे?”

ह्यावेळी आदित्यच्या स्वरात झालेला बदल आणि गांभीर्य श्रुतीलाही लगेच जाणवून ती म्हणाली,

“अरे म्हणजे, मला गावी जायचं आहे. खूप दिवस तिकडे गेले नाही ना, वेळही आहे. त्यामुळे उद्या निघेन मी गावी जायला”

“अगं एवढंच ना, मग ह्यात मला बोलण्याची संधी देणार नाही म्हणालीस त्याचा काय संबंध?”

“अरे म्हणजे मला संपर्कात राहता येणार नाही आता”

“आताही तू बाहेर आहेसच, आपण फोन, msgs वर बोलत असतो. मग गावी जाऊन असा काय बदल होणार आहे?” अधिरतेने आदित्यने विचारले.

“अरे आमचं गाव एकदम दुर्गम भागात आहे. तिकडे कोणत्याच कंपनीच्या कार्डला धड range येत नाही. त्यामुळे net, phone वगैरे बंद राहणार.”

“ओह असं आहे का? कुठेतरी येत असेल न range?”

“हो टेकडीवरच्या देवळात येते, पण तिकडे फारसं जाणं होत नाही. अधून मधून जाईन तेव्हा बोलेन तुझ्याशी, ok?”

“आता काय, ok च. boar होतंय गं इकडे. त्यात माझं आवडतं कामही मी करणार नाही असं सांगितलंय काकांनी.”

“त्यांचा काहीतरी हेतू असेलच. तू सध्या जे आहे ते काम करण्यावर focus कर आणि विश्रांती घेत जा रे जरा. सुनंदा मावशी सांगून थकली पण तू काही ऐकत नाहीस.”

“आज ऐकणार आहे तुमचं. मला स्वतःला खूप थकवा जाणवत आहे, त्यामुळे आता मस्त ताणून देणार आहे. तू राहा संपर्कात. गायब होऊ नकोस.”

“हो रे, गावी जायच्या आधी एकदा कॉल करेन तुला, आता मात्र आराम कर हा तू. Bye”

“Bye”

कमाल आहे ह्या मुलीची. भरपूर गप्पा मारणार होती आणि एवढ्यात बोलणं संपलं देखील. जाऊ देत चला झोपुया असं स्वतःशी पुटपुटत आदित्यने फोन silent वर टाकला

घरी पोचायला आदित्यला आज असाही उशीर झाला होता. काही खाण्याची इच्छा नव्हतीच. शिवाय श्रुतीबरोबर बोलणं झाल्यामुळे मनही भरलं होतं. आत्यंतिक थकव्यामुळे तो झोपायला गेला.

इकडे श्रुतीने लॅपटॉप उघडला. तिला गावाला जाण्यासाठी तिकीट बुक करायचे होते. तिने तिकीट बुकिंगच्या संकेतस्थळावर जाऊन फ्रॉम मध्ये बंगलोर लिहिले आणि टु मध्ये पुणे !!!!

———————————————————————–

—————————————————————————-

46 thoughts on “तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग ४

  1. तू… तूच ती पुढचा भाग कधी प्रकाशित करणार मी तुमच्या कथेच्या प्रेमात पडली आहे . मला कथा खुप आवडली मनापासून, कृपया लवकरात लवकर प्रकाशित करा.

  2. Khup Chan story ahe … Maam plz lawkar next part post Kara plzzzz…. pratilipi war pn upload Kara becoz ithe pn khup lok 2mchya story chya next partcha w8 karat ahe Ani tyamadhe pn ahe

  3. Khup Chan Yaar lavkar post Kar next part…. Aani ho he pratilipi bar pan update karayala visaru nakos… Ashicha lihit raha

  4. किल्ली, यार अब ये अधूरापन बेहद हो गया है… बर्दाश्त के बाहर… लोकं माझ्या लिखाणाची फँन आणि मी तुझ्या लेखनावर जीव जडवून बसले… कधी मिळायची पुढची कथा वाचायला?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!