तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग 3

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग 3

कथेचे आधीचे भाग:

श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 1 येथे वाचा.
तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग 2 येथे वाचा.

——————————————————————————————————————–

भाग 9

आजची सकाळ निराळीच होती. एकदम उत्साही आणि टवटवीत!! कानात एअरफोन्सचे बोळे कोंबून गुणगुणत आपल्याच तंद्रीत श्रुती पार्कमध्ये जॉगिंग करत होती. गुलाबी रंगाचा स्पोर्ट्स टी शर्ट,काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, केसांचा हाय पोनी, स्पोर्ट्स शूज ह्या तिला सर्वात आरामदायी वाटणाऱ्या पोशाखात एकदम हलकं हलकं वाटत होतं. सकाळच्या गार हवेत फिरताना तिचं मन उल्हसित झालं होतं. स्पोर्ट्स तिचा आवडता प्रांत होता. त्यामुळे व्यायाम करायला ती कधी चुकायची नाही. चांगला, वाईट कसाही मूड असला तरी व्यायाम तिला त्यातनं बाहेर पडायला मदत करत असे. जॉगिंग ट्रॅकवर चकरा मारता मारता आदित्यचे विचार श्रुतीच्या मनात रुंजी घालत होते. त्याच्यासोबत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता.

कालचा दिवस स्वप्नवत पार पडला होता. आदित्यबरोबर पूर्ण दिवस वेळ व्यतीत केला असल्यामुळे तिला एकसुरी आयुष्यात आनंदाचे विविध रंग भरल्यासारखं वाटत होतं. पहिलं प्रेम खुप कमी जणांना दुसरी संधी देतं. तिला सुदैवाने ती संधी मिळाली होती. आदित्य तिच्या प्रेमात आहे हे तो आतासुद्धा उघडपणे बोलला होता. शिवाय त्याच्या नजरेत तर ते केव्हापासून दिसत होतंच. श्रुतीलाही आता त्याच्याजवळ मन मोकळं करावंसं वाटत होतं. पण आदित्यने तिला अजून बोलूच दिलं नव्हतं. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आज काहीही करून त्याच्याशी बोलायचं, व्यक्त व्हायचं असा ती विचार करत होती. त्याच्याशी आज बोलायचंय या जाणिवेने ती स्वतःशीच खुदकन हसली. पुढच्याच क्षणी नेमकं काय बोलू, कसं बोलू, कोणत्या शब्दात मी माझ्या चुकीच्या वागण्याचं समर्थन करू अशा विचारांनी तिला घेरले.

“कुठे लक्ष आहे श्रु, केव्हापासून हाक मारतोय. एवढा कसला विचार करते आहेस?”
“तुझा”
अचानक समोर आलेल्या आदित्यला पाहून श्रुती भांबावली आणि खरं बोलून गेली.
“काय?”
“तुझा विचार म्हणजे, तू इकडे कसा असं विचारत आहे मी”
श्रुती मघासचा गोंधळ सावरून घेत म्हणाली असली तरी आदित्यला तिची गडबड झालेली बघून थट्टा करायची लहर आली. तो म्हणाला,
“अगं, काय झालं माहितेय का, सकाळी एकदम जमीन हादरण्याचे आवाज येत होते. मी घाबरून उठलो. पाहतो तर काय! भूकंप झाल्यासारखी जमीन हादरत होती. हादऱ्याचा केंद्रबिंदू शोधत शोधत निघालो तर तुझ्यापर्यंत येऊन पोचलो. बघ आता, तूच सांग काय उपाय करावा. तुझ्या अशा जोरजोरात पळण्यामुळे घरापर्यंतच्या रस्त्याला तडे गेलेत. घरी चल माझ्याबरोबर, दाखवतो.”
श्रुती: “झाली का सकाळ तुझी? मला असं म्हणायचं होतं की आज तू एवढ्या लवकर कसा काय उठलास? तुला असं कधी व्यायाम करताना इतक्या सकाळी पार्कमध्ये पाहिलं नाही ना म्हणून माझा गोंधळ झाला. आज काय विशेष?”
आदित्य: “विशेष काही नाही, तुझ्यामुळे मलासुद्धा इथे यावं लागलं. तुला एवढी काय गरज असते दररोज लवकर उठून व्यायाम करण्याची? आई ओरडली मला, म्हणाली, जा जाऊन श्रुतीबरोबर रनिंग कर. इथे येऊन बघतो तर तुझं लक्ष भलतीकडेच आहे. बरी आहेस ना?”
श्रुती: “हो रे, मी काय म्हणते ते ऐक ना. मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. निवांत गप्पा मारायच्या आहेत. कधी भेटशील?”
आदित्य: “गप्पा मारायला तर मी आता पण तयार आहे, पण तू मुद्द्याचं बोलणार आहेस का?”
श्रुती: “आदित्य प्लीज टाळू नकोस. मी आल्यापासून तुला म्हणतेय काहीतरी बोलायचं आहे, तू भावच देत नाहीयेस मला.असं कसं चालेल.”
आदित्य: “आधी घरी चल. बोलणं काय होतच राहील. मला हार्डडिस्क देणार होतीस ना, ती दे लगेच. कामं खोळंबली आहेत.”
श्रुती: “हार्डडिस्क सुनंदा मावशीकडे दिली होती. तिने कालच तुझ्या टेबलवर ठेवली.”
आदित्य: “आईपण ना, सांगायचं राहून जातं तिच्याकडून. ठीक आहे, बघतो. थँक्स यार.”
घरी आल्यावर श्रुती आणि आदित्य आपापल्या रूम मध्ये गेले. आदित्यने हार्डडिस्क लॅपटॉपला जोडली. पण पासवर्ड टाकल्याशिवाय वापरता येणं शक्य नव्हतं. त्याने श्रुतीला हाक मारली आणि पासवर्ड विचारला.


श्रुतीने काहीही न बोलता लॅपटॉप पुढ्यात ओढला आणि पासवर्ड टाकून हार्डडिस्क ओपन करून दिली. श्रुतीने पासवर्ड सांगितला नाही. पण पुन्हा कधी गरज पडली तर लिहिलेला असावा म्हणून आदित्यने तिला पासवर्ड सांगण्याचा आग्रह केला. आढेवेढे घेतच तिने तो एका कागदाच्या चिटोऱ्यावर खरडला आणि तिथून निघून गेली. हिचा काय असा सीक्रेट पासवर्ड आहे ते तरी बघावं म्हणून आदित्य तो कागद हातात धरून वाचू लागला. थोडा वेळ त्याला काही संगती लागली नाही. तिने स्वतःच नाव लिहिलं होतं.
पण स्पेलिंग चुकल्यासारखं वाटत होतं. स्वतःच नाव पासवर्ड म्हणून कोणी ठेवत नाही. हा खरंच पासवर्ड आहे ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी आदित्य श्रुतीला हाक मारणार इतक्यात त्याची ट्यूब पेटली. स्पेलिंग चुकलं नव्हतं तर ते तसं तिने मुद्दाम लिहिलं होतं. पासवर्ड होता “ShruTya” ह्यातला Shrut हे श्रुतीच्या नावातली पहिली काही अक्षरं आणि Tya हे आदित्यच्या नावातली शेवटची अक्षरं होती. तिने स्वतःच पासवर्ड म्हणून दोघांचं कपल पेटनेम तयार केलं होतं.

श्रुतीच्या ह्या कृतीने आदित्यला खुप बरं वाटलं. आपण आता खरंच तिच्याशी बोलायला हवे, उगाचच तिला त्रास दिला असंही त्याला वाटलं. ह्या गोष्टीला जास्त फाटे फुटू नयेत आणि एकदाच काय ते बोलून टाकावं म्हणून त्याने सरळ तिला टेक्स्ट मेसेज केला.
“आज संध्याकाळी ५ वाजता भेटू, त्याच कॉफीशॉपमध्ये”
“सॉरी, पण मला आज संध्याकाळी यायला जमणार नाही, हर्षदासोबत शॉप्पिंगला जायचंय. तिच्या भावाचं लग्न आहे. एरवी आम्ही प्लॅन बदलला असता. पण आमचं आधीच ठरलं होतं. तिला ऐन वेळी मी धोका देऊ शकत नाही. माझ्यासाठी ती थांबलीय. आपण बघू कधी जमतंय ते.”
तिचा असा रिप्लाय वाचून आदित्यचा हिरमोड झाला. काय करावे त्याला समजेना. इतक्यात श्रुतीचा मेसेज आला.


“आता वेळ आहे का? कॉफीशॉप विसर, घरीच गप्पा मारू. मी नाश्ता आणि कॉफी बनवते. चालेल का? माझी संध्याकाळी जाण्याची वेळ होईल तेव्हा मी जाईन. तोपर्यंत माझा दुसरा काहीच प्लॅन नाहीये.”
आदित्यचं आता आनंदाने नाचायचं बाकी राहिलं होतं. पुन्हा पुन्हा त्याने तो मेसेज वाचला. तिचाच मेसेज आहे ना ह्याची खात्री करून घेतली. त्याचा विश्वासच बसत नव्हता की श्रुतीने पुढाकार घेतलाय. त्याचं स्वप्न आता साकार होणार होतं. क्षणाचा विलंब न करता त्याने “ओके. डन. आलोच १५-२० मिनिटात आवरून.” असा रिप्लाय दिला. त्यावर श्रुतीचा हसणारा आणि थम्स अप वाला smiley रिप्लाय म्हणून आला. पटापट स्नान करून छानसा टी शर्ट घालून आदित्य घरातल्या घरात ‘डेट’वर जायला निघाला. स्वतःच्याच रूम मधून हॉलमध्ये जाताना त्याला धडधडत होतं. पण ह्या भावना त्याने चेहेऱ्यावर दिसू दिल्या नाहीत. अगदी सहजपणे तो सोफ्यावर जाऊन बसला.


श्रुतीने गरमागरम कांदेपोहे केले होते. सुनंदा मावशीने पोहे डिशमध्ये वाढून घेतले. तिघेजण नाश्ता करायला बसले. “आई पण आहे इथे, आता काय गप्पा मारणार.” असे मनात म्हणणाऱ्या आदित्यला नाराजी लपवता आली नाही. ते सुनंदा मावशीने अचूक टिपले.
सुनंदा मावशी: “बरं का वेद, मी आज कोथरूडला जाणार आहे. आज आम्ही कॉलेजमधल्या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटणार आहोत. तुला सुट्टी आहे ना आज, पण बघ ना आमचा अचानक प्लॅन ठरला. तुला फारसा वेळ देता येणार नाही मला. पण मी संध्याकाळी लवकर परत येईन. रागावू नकोस हा राजा”
आदित्य: “आई तू बिनधास्त जा. मी घरी निवांत राहतो.” नाराजीची जागा आता आनंदाने घेतली. ते बघून सुनंदा मावशी म्हणाली,
सुनंदा मावशी: “हो बेटा, मला वाटलं तू नेहमीसारखा रागावशील. पण माझ्या लक्षातच आलं नाही की आज तू एकटा नाहीस. श्रुती आहे ना! चालू दे तुमचं काय असेल ते.
आदित्य: “आई……”
सुनंदा मावशी: “अरे म्हणजे गप्पा मारा. तू नुसता त्रास देत असतोस तिला. चांगला वाग”
आदित्य: “आई मी लहान आहे का आता?”
सुनंदा मावशी: “गम्मत केली रे. पोहे छान झालेत गं श्रुती. चला मी निघते, मला उशीर होतोय”
श्रुती: “मावशी कॉफी पिऊन जा, थोडंच खाल्लंय तू.”
सुनंदा मावशी: “तिकडे होईल गं खाणं पिणं. तशी मी नाश्ता करणारच नव्हते. पण तू केलेस म्हणून खाल्लं. आता वाटतंय बरं झालं खाल्लं ते. चला बाय मुलांनो.”

आज जुन्या आठवणी जाग्या करण्यासाठी म्हणून की काय सुनंदा मावशी रिक्षाने कोथरूडला गेली. एरवी घरात २ गाड्या असताना रिक्षाने जाण्याची तिला कधी वेळ आली नव्हती. पण आजचा दिवस जणू नातं जपण्याचा होता. तिकडे मावशी मैत्रिणीबरोबर जुनी नाती अनुभवणार होती, पुन्हा तरुण उत्साही अशी कॉलेजगर्ल होणार होती आणि इकडे घरी आदित्य आणि श्रुती आपलं हरवलेलं नातं शोधून ते जोपासण्याची धडपड करणार होते.
सगळा योगायोग अगदी प्लॅन केल्यासारखा जुळून आला होता. आईला बाय करून आदित्य घरात शिरला.
आदित्य: “तिकडे बागेत बसुया का? मी स्पीकर घेऊन येतो”
श्रुती: “नको, घरातच बसू, इकडे काय वाईट आहे?”
आदित्य: “जशी आज्ञा मॅडम.”
श्रुती: “आलेच मी कॉफी घेऊन”
आदित्य: “मला पण हवीये”
श्रुती: “अरे हो, घेऊन म्हणजे मग मध्ये ओतून आणते. काय तू पण शब्दात पकडतोस मला.“
असे म्हणून श्रुती किचनमध्ये गेली. पाठोपाठ आदित्यही गेला.
“हे घे तुझ्यासाठी, आज कॉफी ह्यात पी.”
असं म्हणून आदित्यने तिच्यासाठी आणलेला नवीन कॉफी मग तिच्यासमोर धरला.
तो नवाकोरा मग पाहून श्रुती म्हणाली. . . . . . .

…………………………………………………………………………………………………..

भाग १०

श्रुती: “हे काय, नवीन मग? छान आहे, पण नको मला”

आदित्य: “अगं वेडे गिफ्ट आहे ते. तुझ्यासाठी आणलाय. नीट बघ तरी”

श्रुती: “अरे व्वा, ह्यावर माझा फोटो आहे. हा फोटो तर  माझ्याकडे सुद्धा नाही. तुला कुठे मिळाला?”

आदित्य:  “मीच क्लिक केलाय, तुझ्या नकळत. :)”

श्रुती: “भलताच हुशार आहेस की. खरंच छान आहे. आवडलं मला तू दिलेलं पहिलं गिफ्ट!”

आदित्य मनात विचार करत होता, “चला, म्हणजे बाईसाहेबांनी काही आढेवेढे न घेता गिफ्ट स्वीकारले हे बरं झालं. आज सगळया सकारात्मक गोष्टी घडत आहेत. असंच चालू राहू दे देवा!”

इकडे श्रुतीच्या मनात काय बोलू आणि कसं सुरुवात करू ह्या विचारांनी थैमान घातलं होतं. पण तरीही प्रेमातलं पहिलं गिफ्ट स्वीकारत श्रुती मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी सज्ज झाली होती!!

आल्हाददायक गारवा असलेलं वातावरण, सुट्टीचा दिवस, निवांत वेळ, इतर कुठेही जायचं नाही, फक्त आरामात बसून गप्पा मारायचा प्लॅन असे स्वप्नवत भासणारे क्षण श्रुती जगत होती. इतके दिवस, नव्हे वर्ष दिवस ज्याची वाट पाहीली तो तिचा हृदयाचा राजा समोरच बसलेला असताना त्याला आज ती मीही तुझ्यावर तितकंच किंबहुना जास्त आणि जीवापाड प्रेम करते असं सांगण्यासाठी शब्द जुळवित होती.

पण असं नसतं ना, इतकं सोपं असतं तर ह्या दोघांमध्ये इतके दिवस दुरावा राहिलाच नसता. त्यामुळे थेट विषयाला हात घालण्याआधी दोघांमधील अवघडलेपण आणि ताण नाहीसा करणे आवश्यक होतं. त्यामुळे रिलॅक्स वाटतं आणि मनमोकळेपणाने बोलता येतं हे जाणून ते दोघे बोलणार होते. वरकरणी मात्र आपण फक्त सहज गप्पा मारायला बसलो आहोत असे दाखवत होते.

आदित्यचा मुळचा स्वभाव लाघवी आणि बोलका होता. कोणत्याही ग्रुपमध्ये एकमेकांशी बोलताना वातावरणात कोणत्या कारणाने कितीही अवघडलेपण असलं तरी त्याच्या बोलण्याने चुटकीसरशी दूर व्हायचं. पण आज परिस्थिती वेगळी होती. थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.

आपणच आदित्यला आग्रह केला होता हे आठवून श्रुतीने सुरुवात केली.

“आपली बाग छान फुललीये ना.”

आदित्य: “हो ना, माळीकाका रोज येतात. तरीही आईसुद्धा स्वतः बागेकडे आणि झाडांकडे लक्ष देते. कशी हिरवीकंच पानं आहेत बघ ना, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुलांच्या सानिध्यात जीव रमतो. तिथे आपण झाडांजवळ निवांत बसता यावे लाकडी बाके लावून घेतली आहेत. छान वाटतं तिथे बसायला. म्हणून म्हणत होतो बाहेर बसू. पण तू नाही म्हणालीस.”

श्रुती: “नको जाऊ दे, बरंय इथेच. पूर्ण कर ना, तू काहीतरी बोलत होतास”

जरासं हसून आदित्य म्हणाला, “कसं असतं बघ ना, कोणत्याही गोष्टीवर माया लावली, प्रेमाने काळजी घेतली की ती आपली होऊन जाते. मग ती झाडं असोत, पाळीव प्राणी असोत किंवा माणसं असोत. जिव्हाळा असेल तरच नाती जोपासली जातात. एकमेकांना सुखदुःखात साथ द्यायला हवी. मिळून मिसळून राहायला हवं. ह्या बागेकडून आणि निसर्गाकडून हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. जाऊ दे सोड, तुला नाही कळणार ह्या गोष्टी”

श्रुती: अरे असं का म्हणतोस, मला नाही समजणार म्हणून? असंही तुझं बरोबर आहे म्हणा, तुला मी फटकळ, चिडकी, लाडावलेली मुलगी वाटत असेल ना?  पण तुला सांगू? गेल्या काही वर्षांत खूप काही शिकले रे मी ह्या बाबतीत. एकटं राहावं लागलं की माणसांची, नात्यांची, मित्रांची किंमत कळते. काही दिवस तर असे होते की मी खूप मिस केलं भारताला, इथल्या माझ्या मित्रांना, नातेवाईकांना. मी बडबड करत नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी माणूसघाणी आहे. एव्हढंच की कुछ पाने के लिये कुछ खोंना पडता है बॉस!!

श्रुती: “अरे असं का म्हणतोस, मला नाही समजणार म्हणून? असंही तुझं बरोबर आहे म्हणा, तुला मी फटकळ, चिडकी, लाडावलेली मुलगी वाटत असेल ना?  पण तुला सांगू? गेल्या काही वर्षांत खूप काही शिकले रे मी ह्या बाबतीत. एकटं राहावं लागलं की माणसांची, नात्यांची, मित्रांची किंमत कळते. काही दिवस तर असे होते की मी भारताला, इथल्या माझ्या मित्रांना, नातेवाईकांना खूप मिस केलं. मी बडबड करत नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी माणूसघाणी आहे. एव्हढंच की कुछ पाने के लिये कुछ खोंना पडता है बॉस!!”

आदित्य: “अत्यंत चुकीची समजून आहे ही !! ह्या तुझ्या खुळचट समजुतीपायी माझ्याशी एक अक्षरही न बोलता तू निघून गेलीस. निदान मैत्रीच्या नात्याला जागली असतीस तर बरं झालं असतं. बरं माझं जाऊ दे, असं समजूया की तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं. अज्ञात कारणाने माझ्यावर रागावली होतीस वगैरे, समजू शकतो मी, मुली ज्या मुलाने प्रपोझ केलं आहे त्याच्याविषयी विचित्र गैरसमज करून घेतात. पण इतर मित्रमंडळींचं काय? कोणाच्याही संपर्कात नव्हतीस तू! तू काय करते आहेस, कुठे गेलीयेस, तुझं सगळं व्यवस्थित आहे ना, ह्याबद्दल कुणालाच अवाक्षरही ठाऊक नाही. असं का वागलीस श्रुती? “

श्रुती: “मी खूप गोंधळात पडले होते आदित्य. मनाची अवस्था फारच बिकट होती. मला असं वाटत होतं की मी जर रिलेशनशिपमध्ये राहिले तर माझं उच्च शिक्षण, संशोधन, करिअर सगळंच अर्धवट राहील. प्रेम किंवा करिअर ह्यांपैकी काहीतरी एक निवडायचं होतं मला.

आदित्य: मी तुझ्या करिअर मध्ये अडथळा थोडीच बनणार होतो! उलट तुला मदत केली असती. माझे बरेच कॉन्टॅक्टस आहेत तिकडे. “

श्रुती: “पण मुद्दा मदतीचा किंवा अडथळा बनण्याचा नाहीये आदित्य. प्रॉब्लेम माझ्या घोळ घालणाऱ्या स्वभावाचा आहे. मला तेव्हा एका वेळी दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या नसत्या. मला माझा स्वभाव माहित आहे रे.”

आदित्य: “नाही माहिती तुला तुझा स्वभाव श्रुती, तू म्हणतीयेस तो तुझा न्यूनगंड असेल. असं नसतं. उलट मित्रांच्या सान्निध्यात कठीण गोष्टी  सोप्या होतात. आणि रिलेशनशिप बद्दल म्हणशील तर माझ्या प्रेमाचा स्वीकार कर असा आग्रह मी कधीच केला नव्हता.”

श्रुती: ” तेच तर चुकलं माझं!!
काही गोष्टी वेळेवर समजल्याच नाहीत मला! खूप एकटे पडले रे मी. सोबत माझं कुटुंब होत पण मित्रमैत्रिणी नव्हत्या. मी परिस्थितीला सामोरं न जाता, पळून गेले ह्याची आयुष्यभर खंत वाटत राहील. मला अजूनही कल्पना नाही, की या एका चुकीच्या निर्णयामुळे मी काय काय गमावलंय. खरं तर ह्या प्रश्नाला आता किती अर्थ आहे माहिती नाही तरीही विचारते, ‘कसा आहेस आदित्य? तुला खूप राग आला असेल ना माझा तेव्हा. कशी हाताळलीस तू परिस्थिती?’ ”

तिच्या अशा मनमोकळ्या मनाने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे आदित्यला कळेना. एवढं मात्र त्याला नक्की कळलं होतं की. श्रुतीला आपली चूक झालीये हे समजलंय. त्याचा तिला पश्चात्तापही झालाय. ती आपणहून हे सगळं बोलतीये. तिच्या शेवटच्या प्रश्नाचा अर्थ म्हणजे she cares for Aditya! म्हणजे तिचंही त्याच्यावर प्रेम होतंच. ते आता आहे की फक्त मैत्री जपण्यासाठी ती हे बोलतीये ह्या गोष्टीची मात्र खातरजमा करावी लागेल हे आदित्यने ताडले. जरासा पॉझ घेऊन तो म्हणाला, “मी खूप अस्वस्थ झालो होतो. सुरुवातीचे एक – दोन दिवस असं वाटलं की काही emergency असेल, तू करशील संपर्क आणि सांगशील काय ते! पण असं झालं नाही. मी वाट पाहत राहिलो. तू काही आलीच नाहीस, तुझ्याबद्दल कोणाला काही माहित नसल्यामुळे माहिती मिळत नव्हती. तू अमेरिकेला आहेस हे मला काही महिन्यांनी कळलं. तिथून तुझी माहिती काढणं मला कठीण नव्हतं. पण मी तसं केलं नाही. खूपदा वाटलं, तडक यावं तिकडे, भेटावं तुला आणि जाब विचारावा. पण … “

श्रुती: “पण तू असं केलं नाहीस, का ?”
आदित्य: “कारण मला खात्री नव्हती की मला जाब विचारायचा हक्क आहे की नाही ते! सगळंच अर्ध्यावर सोडून दूरदेशी गेलीस तू. म्हणून मी मनाला समजावलं की वाट पाहायची. तुला तिळमात्र जरी काळजी असेल तरी तू परत येशील. मला तेवढा विश्वास होता तुझ्यावर.”
श्रुती: ”माझ्या जाण्याने तुला फरक पडला, तुला त्रास झाला, तू मला मिस केलंस ह्या बाबींचा अंदाज होताच मला, पण खात्री नव्हती. कारण एकच! Communication gap!! जो माझ्यामुळेच तयार झाला होता. पण खरं खरं सांगते आदि, तुला सोडून जाण्याने मला मात्र खूप त्रास झाला. माझं मन सतत मला खात होतं. सहजासहजी मिळालेल्या गोष्टींची किंमत करता आली नाही ह्याचंच सतत वैषम्य वाटत राहिलं. माझ्या एकांगी विचारामुळे सगळीच गणितं चुकली का रे?”
आदित्य: “सगळ्याच गोष्टीना गणितासारखं calculate करता येत नाही श्रुती! प्रत्येक गोष्टीला, भावनेला विविध कंगोरे असतात. पैलू असतात. अमुक असं झालं तर तमुक होईल ह्या गोष्टीचा अर्थ व्यक्ती आणि प्रसंगानुरूप बदलतो. तुला हे सगळं समजतं पण मांडता येत नसेल. कारण तुझा स्वभाव वेगळा आहे, अगदी साधासरळ! त्यामुळे ह्या गोष्टी आज मला तुला सांगाव्या लागत आहेत.”

आता आदित्य आणि श्रुती खरंच मनातलं बोलायला लागले होते. श्रुतीने प्रांजळपणे सगळं कबूल करून टाकलं होतं. दुसरं कोणी असतं तर तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नसता. पण अशा कोणाही माणसाला ती एवढं मनातलं बोलेल ही गोष्टच मुळात अशक्य होती. ती हे सगळं बोलली कारण तिला माहित होत की आदित्य तिला समजून घेईल. तिला वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की, हा त्याचा समजूतदारपणा माहिती असतानाही ती त्याच्याशी कठोर वागली. वागण्यातली प्रगल्भतेचा अभाव, दुसरं काय! पण आता तिने ठरवलंच होतं की, त्याची माफी मागायची आणि त्याची पूर्ण बाजू ऐकून घ्यायची. त्याला काय वाटतं, त्याला अजूनही आपल्याबद्दल फीलिंग्स आहेत का हे जाणून घेऊन त्यानुसार वागायचं, पळून जायचं नाही. बोलायचं आणि जिथल्या तिथे क्लिअर करायचं असं तिने ठरवलं. शेवटी अनुभवातून आलेलं शहाणपण म्हणतात ते हेच!
श्रुती: “खरंय तुझं आदि. एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे सांगते, मला तुझी ओढ वाटत होती. आपली शेवटची भेट कॅफेमध्ये झाली होती, तो प्रसंग सतत माझ्या डोळ्यासमोर चित्रपटासारख्या येत होता. पण स्वतःच्या वागणुकीमुळे शरम व भीतीसुद्धा वाटत होती. असं वाटलं की मी स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतली आणि आयुष्यातलं पहिलं प्रेम गमावलं. मग ठरवलं, पुण्यात यायचं. तुला भेटायचंच. त्यानुसार माझं शिक्षण संपवून मी पुण्यात आले देखील.
येथे आल्यावर मी जमेल तशी तुझी माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. योगायोगाने तुला शोधण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नाहीत मला. दैवाने आपल्याला पुन्हा एकदा भेटवले. सुनंदा मावशी आईची मैत्रीण आहे एवढंच मला माहित होत. पण ह्यापलीकडे कुठलेच डीटेल्स नव्हते. ती तुझी आई आहे हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.

तुझ्या माझ्यावर असलेल्या विश्वासात किती ताकद आहे बघ. आलेच मी परत. नुसतीच परत नाही तर थेट तुझ्या घरात. तुला भेटले आणि असं वाटलं की झालेल्या चुका सुधारता येतील. ……..मी काहीही बोलतेय आता. कॉफी थंड झालीये. दोघांनीही घेतली नाही. दुसरी करून आणू का?”
आदित्य: “कॉफीचं राहू दे, तू जे काही बोलत होतीस ते बोल श्रुती, तुझ्या मनात काय आहे ते कळू देत मला. लक्षात ठेव, ह्याबाबतीत आता नाही तर कधीच नाही!”
श्रुतीने दीर्घ श्वास घेतला. कपाळावर आलेली केसांची चुकार बट कानामागे सारली. काही क्षण इकडे तिकडे पाहिले. ती काय म्हणते ते ऐकायला आदित्य अधीर झाला होता. श्रुती जागेवरून उभी राहिली. हातातला मग बाजूला ठेवला. आदित्य बसला होता तिथून थोडंसं दूर गेली आणि खिडकीकडे पाहत उभी राहिली.
असं तिने आयुष्यात कधी कोणाला म्हटलं नव्हतं ते तिला आता बोलायचं होतं. अशीच शांततेत काही मिनिटं गेली. मनाचा हिय्या करून श्रुती मागे वळली आणि म्हणाली, ” हे म्हणायला मी पात्र आहे की नाही ते माहिती नाही. पण………………….

…………………………………………………..

(क्रमशः )
————————————————————-

11 thoughts on “तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!