तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! सीझन दुसरा – भाग १

तू….तूच ती!! (एक हलकीफुलकी प्रेमकथा) – सीझन दुसरा – भाग १

श्रुती आणि आदित्य ह्या दोघांच्या प्रेमकहाणीचा पहिला सीझन येथे वाचा.

भाग १

आदित्य आपल्या आलिशान ऑडी a४ गाडीमध्ये बसून एकटाच भरधाव वेगाने हायवरून जात होता. ही त्याची आवडती कार होती. जेव्हा त्याच्या अथक प्रयत्नानंतर कंपनीला नफा झाला तेव्हा त्याच्या बाबांनी ही कार बक्षीस दिली होती. आता तर अगदीच सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी नव्हतीच. एरवी भरगच्च रहदारी असणारा हिंजवडीला जाणारा रस्ता ह्यावेळी सुना सुना वाटत होता. खरे तर त्याने ह्याच कारणामुळे कामावर जाण्यासाठी ही वेळ निवडली होती. नाहीतर हिंजवडीचं ट्रॅफिक म्हणजे महाभयानकच! सकाळी लवकर निघून संध्याकाळी इतर लोकांची ऑफिस सुटण्याची वेळ होण्याच्या आत घरी परतणे हे त्याचं उद्दिष्ट असायचं. असंही वेळेबद्दल त्याला कोण टोकणार होतं म्हणा. पण कंपनीचा मालक ह्या नात्याने शिस्त पाळणं गरजेचं होतं आणि असंही बेशिस्तपणा त्याच्या स्वभावात आणि तत्त्वात नव्हताच.

आज काय काम आटपायची आहेत ह्याची मनात उजळणी करून झाल्यानंतर त्याने आवडती गाणी लावली. ‘हाल ए दिल’ हे गाणं चालू होताच त्याला तिची तिची आठवण आली. तसंही आठवण यायला तो तिला विसरलाच कुठे होता! पण ह्या गाण्याच्या सुरावटीबरोबर तिला प्रकर्षाने भेटावेसे वाटू लागले. आज का कोण जाणे पण त्याचे मन बैचैन होते. कसलीतरी अनामिक हुरहूर दाटून आली होती. सर्वार्थाने “eligible bachelor” असलेल्या आदित्यने एका मुलीवर मनापासून प्रेम केले होते. ती तेव्हा त्याला भेटली नाही आणि त्याने नंतर दुसऱ्या मुलीचा विचारही केला नाही. स्वतःला कामामध्ये झोकून दिले, यशाची शिखरे गाठली.

पण ह्या प्रवासात जिची साथ त्याला हवी होती ती मात्र त्याच्या प्रेमाला काहीही उत्तर न देता अचानकपणे त्याच्या आयुष्यातून आणि संपर्कातून निघून गेली होती. ती कोठे आहे, काय करतीये कोणालाच काहीही माहित नव्हते. आदित्यने तिला शोधलेही, पण ती सापडली नाही. जणू एका वावटळीसारखी आयुष्यात आली आणि तशीच गायब झाली. एखादं सुंदर स्वप्न पडावं आणि अचानक जाग यावी तसं आदित्यच्या आयुष्यात घडलं होतं. पण त्याचं मन अजूनही ग्वाही देत होतं की, ती परत येईल.


विचाराच्या तंद्रीतच तो ऑफिसला पोचला. आज शुक्रवार असल्यामुळे बरीचशी कामं संपवायची होती. ह्या वेळेत असंही डिस्टर्ब करायला कोणी नसल्यामुळे तो पटापट काम उरकत असे. पण आज त्याचा मूड वेगळाच होता. सैरभैर मनाने कामं उरकता येत नाहीत हेच खरे! थोडा वेळ काम करून नाश्ता करण्यासाठी तो कॅफेटेरिया कडे वळला, तिकडे काही खाण्याची इच्छाच झाली नाही त्याची! तसाच तो ऑफिसच्या ईमारतीच्या बाहेर पडला. तिथे भैयाकडे मिळणाऱ्या पोह्यांच्या खमंग वासाने त्याला तिकडे खेचले आणि तोही मस्त गरमागरम खमंग कांदेपोहे चापु लागला. तिला फार आवडत असत इथले पोहे. त्याला पुन्हा तीच आठवली. आज त्याचं मन तिच्याकडेच धाव घेत होतं. कसाबसा नाश्ता संपवून तो केबिन मध्ये परत आला.


केबिनचा दरवाज्यावर टकटक करून सौम्या आत शिरली. ऑफिसमध्ये जुन्या टीम मधली हीच एक मुलगी राहिली होती. बाकीची मंडळी कुठे ना कुठे तरी पांगली होती. काही जणांना परफॉर्मन्स कमी असल्यामुळे काढलं होतं, काही जण स्वतः कंपनी सोडून गेले होते, काही लोक कंपनीच्या दुसऱ्या लोकेशनला ट्रान्सफर झाले होते. “सौम्याला नक्कीच माहित असणार “ती” कुठेय ते, विचारावं का? पण “ती” गेल्यापासून कंपनीत कोणाबरोबरही कामाव्यतिरिक्त आपण काही बोलत नाही. आज अचानक अशी चौकशी केली तर विचित्र वाटेल. हल्ली मला सगळेच बिचकून असतात. आधीचा खेळकर आणि गप्पिष्ट आदित्य जणू कुठेतरी हरवलाय! ही सौम्या पण आधी किती गप्पा मारायची, आता दबकत दबकत आत शिरतेय. ऑफिसमध्ये वातावरण खेळीमेळीचं असायचं. पूर्वीसारखं काहीच नाही राहिलं आता! खरंच इतका पकाऊ झालोय का मी? लोकांना कंपनीत काम करणं बोअरिंग तर वाटत नसेल ना?” आदित्यचे विचारचक्र फिरत होते.


“आदित्य, मी कोड चेक इन केलंय. जरा review करतोस का?”
सौम्याच्या ह्या प्रश्नासरशी आदित्यचं विचारचक्र थांबलं.
आदित्य: “हो करतो, आज कोणी सिनिअर्स आले नाहीत का? कोड review करण्यासाठी?”
सौम्या: “अरे, तूच म्हणालास ना, ह्या module मध्ये interest आहे मी करतो, म्हणून सांगायला आहे मी, तूला वेळ नसेल तर असू देत. “
आदित्य: “ओह सॉरी, करतो, मेल पाठवलास का तसा?”
सौम्या: “हो, बघून घे, त्यात सगळे डिटेल्स आहेत.”
“हे काय होतंय आज मला, सरळ घरी जातो आणि उरलेलं काम तिकडेच करतो.” असं ठरवून आदित्यने लॅपटॉप बॅगेत टाकला. इतर लोकांना आवश्यक त्या सूचना देऊन तो घरी निघाला.
त्याने कुठलही गाणं न लावता गाडी रस्त्यावर पळवायला सुरुवात केली. घरी पोचून आराम करावा आणि मग काम, असं काहीसं डोक्यात चालू होतं. दुपारची वेळ असल्यामुळे रहदारी फारशी नव्हती. हायवेवर पोचल्यानंतर तर गाडीने चांगलाच वेग पकडला होता. इतक्यात एका वळणावर एक स्पोर्ट्स बाईक वाला भरधाव वेगाने पुढे गेला. आदित्यलाही चेव चढला. त्याने कारचा वेग अजून वाढवला. बाईकस्वाराने हेल्मेट घातल्यामुळे तो कोण हे दिसू शकत नव्हतं. शिवाय स्पोर्ट्स जॅकेट,शूज असा पेहराव होताच. ह्या अघोषित आणि अनियंत्रित स्पर्धेत पुढच्या एका वळणावर बाईकस्वार आणि आदित्य एकमेकांवर आदळणार असं वाटत असतानाच..
कर्णकर्कश आवाज झाला…………………………..

………………………………………………………………………………………………………………

भाग २

जोरदार कट मारून भरधाव वेग कायम राखत बाईकवाला पुढे निघून गेला. एक भयानक अपघात होता होता टळला, पण त्या गोंधळात त्याची बाईक कारला थोडी घासून गेली. आदित्य आपल्या आवडत्या आणि प्राणाहून प्रिय गाडीला ओरखडा उमटलेला बघून प्रचंड चिडला. बाईकचा क्रमांक त्याच्या चाणाक्ष बुद्धीने टिपून ठेवला होता , हाच काय तो दिलासा! पण मग तो आवाज कसला होता? आदित्यने मागे वळून पाहिलं तर एक बस करकचून ब्रेक मारत त्याच्या गाडीच्या मागे थांबली होती. तो पळत पळत गेला. गाडी आणि बस दोन्ही सुरक्षित होत्या. लोकांनी कल्ला करायच्या आत इथून निघायला हवं असा मनाशी विचार करत तो गाडीमध्ये शिरला. “आजचा दिवसच विचित्र आहे राव! काय होतंय मला? मी गाडी सेफ चालवतो, नेहमीच. मग आज एका बाईकमुळे का लक्ष विचलित झालं? चला लवकर घरी पोचायला हवं. आराम करायला हवा. म्हणजे डोकं ताळ्यावर येईल.” असा विचार करत आणि जरा सावधपणे गाडी चालवत आदित्य एकदाचा घरी पोचला.


घरी आल्यावर फ्रेश होऊन त्याने गरमागरम कॉफी बनवली. “Success is journey, not a destination” असं लिहिलेल्या डार्क ब्राउन आणि बारीकशी fluorescent पोपटी किनार असलेल्या मागात त्याने ती ओतली. एक सिप पिताच त्याला खूप बरं वाटलं. तसाच मग हातात घेऊन तो त्याच्या घरातल्या आवडत्या ठिकाणी जाऊन बसला. त्याच्या रूम मधली sitting area असलेली मोठी खिडकी! तिथून सोसायटीमधल्या बागेचं दृश्य दिसत असे. आज फार ऊन नसल्यामुळे वातावरण आल्हाददायक होतं. तिथे छान गार वाऱ्याची झुळूक अनुभवत कॉफीचे घुटके घेत गाणी ऐकणे आदित्यला फार आवडत असे. आज गाणी लावलीच नव्हती त्याने! डोक्यात विचारांचा कल्लोळ माजला होता. काही केल्या त्याला शांत वाटत नव्हते. कॉफी संपवून तो कामाकडे वळला. लॅपटॉप सुरु करून आजचे उर्वरित काम त्याने कसेबसे संपवले. काम करताना त्याला आठवले की सौम्या त्याला तिचा ठावठिकाणा सांगण्यास मदत करू शकते. साधारण ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती. लगेच असं फोन करणं त्याला योग्य वाटलं नाही. त्याने उद्या विचारूया तिला असं ठरवून तात्पुरता स्वतःसाठी विषय संपवला. पण मन मात्र सैरभैरच होतं. तशाच अवस्थेत कधी दिवस सरला, रात्र झाली आणि झोप कधी लागली हे आदित्यला समजलेच नाही. थोड्या वेळेपुरता का होईना तो शांत झोपला होता. उद्याची सकाळ कोणती मनस्थिती घेऊन येणार होती हे त्याचे त्याला सुद्धा माहित नव्हते.
——————————————————————————————————————–
अमेरिकेला एका नावाजलेल्या आणि मुळात भारतीय अशा कंपनीत तिच्या बाबांची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शक ह्या पदासाठी निवड झाली म्हणून त्यांचं कुटुंब तिकडेच शिफ्ट झालं होतं. दादा आणि वहिनी आधीच तिकडे राहत असल्यामुळे सगळं अगदी सहज आणि वेगात घडलं. श्रुतीलाही अमेरिकेत मास्टर्स करण्याची इच्छा होतीच. सगळं असं व्यवस्थित जुळून आलं आणि कोणालाही काहीही न सांगता श्रुती अमेरिकेला गेली. अभ्यास करायचा, रिसर्च करायचा हे डोक्यात असल्यामुळे तिने सगळे सोशल कॉन्टॅक्टस बंद केले होते. तिला तिच्या ध्येयाचा पाठलाग करण्याचा मार्ग सापडला होता. आयटी क्षेत्रात भारतीय लोक सर्व्हिस देण्यात माहीर आहेत, पण फार थोडे लोक संशोधनाकडे वळतात. तिला नवीन काहीतरी करून दाखवायचं होतं. scientist व्हायचं होतं. इंजिनीरिंग पूर्ण केल्यानंतर इंडस्ट्री मधील काम शिकावं म्हणून ती तुलनेने स्मॉल स्केल असलेल्या कंपनीत रुजू झाली होती. तिथे उत्कृष्ट काम करून एक बेंचमार्क प्रस्थापित केला होता तिने! तिकडे ती छान रुळली होती. पण तीच्या भावनिक विश्वात उलथापालथ करणारा “तो” प्रसंग घडला आणि तिला ती कंपनी सोडावीशी वाटली. सगळं इथेच भारतात जड मनाने मागे ठेवून एक नवीन आयुष्य जगण्यासाठी आणि आपल्या मूळ ध्येयाच्या पूर्तीसाठी तिने अमेरिकेला प्रस्थान केले.

मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या रिसर्चचं काम पुढे न्यायचं होतं. बऱ्याचशा गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. पण अमेरिकेला आणि रोजच्या रुटीनला श्रुती कंटाळून गेली होती. लगेच नोकरी करावी असही नव्हतं. जरा निवांतपणा, बदल आणि रिसर्च करण्यासाठी एकांत हवा म्हणून श्रुती प्रथमच एकटी पुण्यात परत आली होती. आई बाबानी त्यांचं राहतं घर आता अमेरिकेलाच सेटल व्हायचं म्हणून विकलं होतं. तसे तिचे नातेवाईक खूप होते पण तिकडे राहायला जाणं तिला फारसं आवडत नसे. म्हणून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आली होती. श्रुतीला पुण्यात येऊन २-३ दिवस झाले होते. पण पुण्यात येताच इथल्या सगळ्या आठवणी तिच्या मनात फेर धरून नाचू लागल्या. तिचं आवडतं शहर म्हणजे पुणे! पुणेकर म्हणून अभिमानाने मिरवणे तिला खूप आवडत असे. इथल्या प्रत्येक गल्लीत तिच्या काही ना काही आठवणी होत्या. शाळेतले मोरपंखी दिवस, कॉलेजचे मंतरलेले दिवस, मैत्रिणीबरोबर केलेली भटकंती, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग येथील घासाघीस करून केलेली खरेदी, रोड ट्रिप्स, अभ्यासासाठी शांत कोपरे धुंडाळत आणि खाऊगल्ली पालथी घालत केलेली मजामस्ती, पुण्यातला गणेशोत्सव सगळं सगळं तिला नॉस्टॅल्जिक करून जात होतं. एखाद्या चित्रपटाप्रमाणे सगळ्या घटना तिच्या मनःपटलावर अवतरित होत होत्या आणि तीही त्यांचा आस्वाद घेत मनमुराद सगळे क्षण पुन्हा वेचू पाहत होती.
आजच्या घडीला आदित्यची कंपनी सोडून श्रुतीला ३-३.५ वर्ष झाली होती.
कसे सरले दिवस कळलेच नाही जणू! त्याची आठवण तर नेहमीच येत असे तिला. पण ते तिचं सिक्रेट तिने मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून टाकलं होतं. पण आज आठवणींनी तिला भेट द्यायचीच असे ठरवले होते की काय असे वाटावे तसे जुने सगळे प्रसंग झरझर तिला आठवत होते. आज मनाची कवाडे सताड उघडली होती तिच्या!. “तो” प्रसंगअगदी कालच घडल्याप्रमाणे दिसत होता तिला!
——————————————————————————————————————–


ऑफिसची पार्टी होती. सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. खूप दिवसांनी मनावरचा ताण हलका झाला होता. सगळे पार्टीची मजा घेत होते. आज श्रुतीही खुश होती. तिच्या कष्टाचे चीज झाले होते. त्याचबरोबर तिला कोणालाच माहित नसलेले आदित्य कंपनीचा मालक आहे हे गुपित समजले होते. त्याला ह्यापुढेही कंपनीच्या उत्कर्षासाठी मदत करायची हे तिने ठरवले होते. आज मनमोकळ्या मनाने ती सगळ्यांशी गप्पा मारत होती, दिलखुलास हसत होती. पण तिला काय माहित पुढच्या काही वेळात तिचं आयुष्य बदलून टाकणारी घटना घडणार आहे ते? आपल्या आयुष्याचे सुकाणू आपल्या हातात नसतात हेच खरं! मानून फक्त एक कळसूत्री बाहुला असतो ह्या जीवनाच्या पटावरचा! कळ फिरवणारी आणि आपल्याला हवे तसे नाचवणारी व्यक्ती तिसरीच असते. ती controller असते आपली नियती! कोणाला कुठे घेऊन जाईल काही सांगता येत नाही. तिच्यापुढे भलेभले हार मानतात. इथे तर श्रुती बिचारी एक निरागस, कष्टाळू, प्रामाणिक, स्वतंत्र विचारांची, स्वाभिमानी आणि ध्येयवादी मुलगी होती. तिचे काय चालणार ह्या नियतीपुढे! तिचेही आणि आदित्यचेही!!!

………………………………………………………………………………………………………………

भाग ३

पार्टी अगदी रंगात आली होती. एकापेक्षा एक उत्तम असे performances लोक देत होते. नाच, गाणी, विविध गेम्स, गप्पा हे सगळं चालू होतं. श्रुती सगळं मनापासून एन्जॉय करत होती. पण तिने आज कुठलीही कला सादर केली नव्हती. कशी करणार म्हणा, तिचे छंद ह्या पार्टीमध्ये सादर करण्यासारखे नव्हतेच मुळी! सगळ्यांचे performances झाल्यानंतर spot awards ची घोषणा होणार होती. सगळे आतुरतेने त्या सेगमेंटची वाट पाहत होते. श्रुतीची नजर मात्र आदित्यला शोधत होती. तो कुठे दिसत नव्हता. “Event organizing committee मध्ये होता ना तो, असेल कामात. पण एकदातरी बोलायचं ना, जास्तच मान लागतो त्याला.” श्रुती स्वतःशीच बोलत होती. तिच्याच नकळत तिच्या मनात आदित्य बद्दल एक खास कोपरा तयार झाला होता. पण आदित्य ह्या बाबतीत तिच्या जरा पुढेच होता. त्याने तिला आज propose करायचे ठरवले होते. पण तिला काय वाटेल? तिने नकार दिला तर? गैरसमज झाले तर काय करावे? असे विचार आणि प्रश्न डोक्यामध्ये सतत येत असल्यामुळे तो हैराण झाला होता. नर्व्हस का काय म्हणतात अगदी तसंच त्याला फील होत होतं. भरीस भर म्हणून त्याच्यावर पार्टीची जबाबदारी होतीच. awardsच्या कार्यक्रमाचं संचालन करायचं होतं. तूर्तास तिकडे लक्ष देऊया असं त्याने मनाला समजावलं आणि तो स्टेजवर येण्यास सज्ज झाला.


कार्यक्रम सुरु झाला, आदित्य छान सूत्रसंचालन करत होता. एक एक करून पुरस्काराचे वाटप झाले. आता शेवटचा पुरस्कार बाकी होता.
“Star Performer of the Year” असं नाव असलेला हा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जात असे. ज्यांच्या कामामुळे कंपनीला tangible and intangible benefits झाले त्यांना देण्यात येई. बहुतकरून ह्या पुरस्काराचे मानकरी मॅनेजर किंवा लीड पदावरची वरिष्ठ मंडळी असत. अखिलेश सर स्वतः पुरस्कारप्रदान आणि घोषणा करण्यास स्टेजवर आले होते. त्यांनी award winner चं नाव असलेलं पाकीट उघडलं. नाव वाचताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. माईक सावरत ते म्हणाले “and this year’s Star Performer award goes to श्रुती and आदित्य both!!” आदित्यचं सत्यरूप माहित नसतं तर आपल्यासोबत त्याला हा पुरस्कार विभागून मिळाला ह्याच श्रुतीला दुःख झालं असतं. पण तो किती मेहनत घेतोय हे आता तिला माहित असल्यामुळे ती आनंदाने मंचावर गेली. एक बडे उद्योगपती प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या हातून पुरस्कार स्वीकारताना तिला धन्य झाल्यासारखे वाटत होते. आदित्य आणि श्रुती दोघांनी मिळून ती ट्रॉफी धरली होती. ट्रॉफी उंचावताना आदित्यच्या हाताचा झालेला स्पर्शाने श्रुती रोमांचित झाली. वेगळंच काहीतरी फील झालं, मनाच्या तारा छेडल्या गेल्या. चेहऱ्यावरचं हसू अधिक गुलाबी झालं. तिच्या गालावरच्या खळी मध्ये डोळ्यांच्या कोनातून पाहत असताना आदित्य पुन्हा एकदा मनोमन श्रुतीवर फिदा झाला.
छानपैकी कार्यक्रम उरकला, डिनर नंतर सगळे घरी जाण्यास निघाले. श्रुती आणि आदित्य कधी नव्हे ते गप्पा मारत थांबले होते. आदित्यने आग्रह केल्यामुळे एरवी लगोलग घरी जाणारी श्रुती थांबली होती. शेवटी त्यांच्या असे लक्षात आले की आता घरी गेलं पाहिजे, उशीर झालाय.
आदित्य: “तू गाडी इथेच लाव, मी सोडतो तुला घरी “
श्रुती: “नको रे, मी जाईन माझी माझी”

श्रुतीने सांगुनही आदित्य ऐकेचना! शेवटी श्रुतीने त्याचे म्हणने मान्य केले आणि ते दोघे घरी जाण्यास निघाले. इतका वेळ गप्पा मारणारे दोघेही आता प्रवासात मात्र शांत बसले होते. कुणीच काहीही बोलत नव्हतं. दोघेही एकमेकांचा सहवास अनुभवत होते. इतके ठरवूनही आदित्य आपल्या मनातील गोष्ट तिला सांगू शकला नाही. आता २ दिवस शनिवार – रविवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. हे दोन दिवस आदित्यने श्रुतीला खूप मिस केलं. तिच्या आठवणीत रममाण होऊन कसाबसा वेळ घालवत होता. इकडे श्रुतीची अवस्था ही वेगळी नव्हती. फरक एव्हढाच की, श्रुतीच्या मनाला हेच आपलं आदित्यवर असलेलं प्रेम आहे ह्या भावनेचा उलगडा झाला नव्हता. एक मात्र खरं होतं की दोघांनाही एकमेकांची ओढ वाटू लागली होती. सोमवारचा दिवस कामात आणि घाईगडबडीत गेला. मात्र ऑफिस संपल्यानंतर आदित्यने श्रुतीला कॉफीसाठी विचारले. अगदी सहज विचारतोय असं दाखवत असला तरी त्याच्या मनात तिला propose करणे हा हेतू होता. कॉफी शॉप मध्ये कॉफी पिता पिता गप्पा सुरु झाल्या. बराच वेळ झाला तरी हव्या त्या मुद्यावर चर्चा येत नव्हती. आदित्य बोलघेवडा असल्यामुळे नवीन विषय तोच सुरु करत होता पण श्रुती विषयाला वळण देत नव्हती. मग त्याने वैयक्तिक आवडी निवडी विषयी बोलायला सुरुवात केली. त्यावरून तो तुला मुलगा कसा हवा इथपर्यंत येऊन पोचला. एव्हाना श्रुतीला काय चालले आहे हे लक्षात येऊ लागले होते. पण ती तसे दाखवत नव्हती कारण ती आदित्य बद्दलच्या स्वतःच्या नेमक्या भावना काय आहेत ह्याबद्दल sure नव्हती. थोड्या वेळाने तो क्षण आलाच!


आदित्य: “तू खरंच विचार नाही केलास ह्या विषयावर? मला वाटलं होत की सगळ्या गोष्टीबद्दल तुझे विचार आणि views clear असतात तसे ह्याबद्दलही असतील “
श्रुती : “तसं नाही रे, मी एक सरळ, साधी, टिपीकल प्रकारात मोडणारे मुलगी आहे. आता माझ्यासाठी माझं करिअर जास्त महत्वाचं आहे. मला relationship आणि करिअर दोन्ही एकावेळेस सांभाळणं जमणार नाही हे माहितेय. म्हणून त्या वाटेल जायचं नाही असं मी ठरवलंय. एखादा दुसरा क्रश असणे वेगळे आणि प्रेमात पडणे वेगळे! प्रेमात पूर्ण dedication असावं आणि सध्या ती माझी प्रायोरिटी नाहीये. हे माझं clearly ठरलंय”
आदित्य: “आणि समजा, एखादा तुला आवडणाऱ्या मुलाने आता लग्नासाठी विचारलं, तर तुझी काय प्रतिक्रिया असेल?”
श्रुती: “मुलगा कोण आहे त्यावर ते अवलंबून असेल, पण शक्यतो माझे उत्तर “आता नाही, नंतर बघू” असेच असेल. सोड ना, दुसऱ्या विषयावर बोलू आपण”
आदित्य: “ऐक ना, जर समजा तो मुलगा मी असलो तर ?”
श्रुती: “म्हणजे? what do you mean exactly?”
आदित्य: “मला exactly हेच म्हणायचे आहे की, “
असे म्हणून गुलाबाची फुले समोर धरत अगदी फिल्मी पद्धतीने आदित्यने श्रुतीला थेट विचारले
“मला तू खूप आवडतेस, माझं प्रेम आहे तुझ्यावर, लग्न करशील माझ्याशी?”
श्रुती: “मस्करी नको हा आदित्य “
आदित्य: “हे बघ, हि बिलकुल मस्करी नाही. माझ्या खऱ्याखुऱ्या भावना आहेत ह्या. तुझ्या priorities माहित असूनही हे विचारतोय कारण माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. विचार कर, कदाचित तुलाही मी आवडत असेल. हवा तेवढा वेळ घे श्रु, पण नक्कीच तुझ्या माझ्याप्रती खऱ्या भावना काय आहेत ह्याचा शोध घे. तुझ्या डोळ्यात मला दिसलंय ते प्रेम ! पण तुला अजून जाणीव नाहीये त्याची. आणखी एक गोष्ट, तू स्वतःहून मला माझ्या proposal च उत्तर देशील तेव्हाच हा विषय निघेल. तोपर्यंत तुला मी हा विषय काढून त्रास देणार नाही. पण तू मात्र seriously विचार कर. येतो मी. आता तुझ्यासमोर असं थांबणं मला शक्य नाही”
आपल्या मनातलं भडाभडा बोलून आदित्यला हायसे वाटले होते. आपण तिला propose केले हे एक आव्हान साध्य केल्यासारखे वाटले त्याला !
पण इकडे विचारमग्न अवस्थेत श्रुतीला कॉफीशॉपमध्ये सोडून गेल्यांनतर तिच्या मनात उठलेल्या वादळाचा त्याला थांगपत्ता नव्हता!!

………………………………………………………………………………………………………………

भाग ४

आपण आपल्या भावना तिच्यापर्यंत पोचवल्या म्हणून मोकळ्या मनाने आणि ती काय उत्तर देईल ह्या विचारामुळे थोड्याश्या mixed feelings मनात घोळवत आदित्य तेथून गेला खरा, पण श्रुती मात्र गोंधळली होती.
“खरेतर आताच्या आता त्याच्या प्रेमाच्या प्रस्तावाला होकार देण्याची इच्छा होत आहे. पण मग आयुष्यात गाठायच्या ध्येयांचं काय? प्रेम निभावत उच्च शिक्षण, त्या अनुषंगाने येणारा अभ्यास आणि संशोधन जमणार नाही ह्या स्वतःच्या मर्यादा माहित असताना प्रेम स्वीकारणे म्हणजे दोन्ही बाबींवर अन्याय होईल. कारण दोहोंना पुरेसा वेळ देत त्यांना निभावणे आपल्याला जमणार नाही. काहीजण सगळं कसं व्यवस्थित सांभाळतात. मी मात्र एकाच गोष्टीत गुंतून राहते आणि दुसरीकडे दुर्लक्ष करते. असं होऊन कसं चालेल? काहीतरी एक निवडण्याची वेळ आलीये बहुधा. “

priorities स्पष्ट आहेत असं समजणारी श्रुती प्रेमप्रस्तावामुळे गोत्यात आली होती. एक मात्र मान्य करावं लागेल की श्रुती स्वतःच्या स्वभावाच्या मर्यादा आणि भावनिक गुंतवणूक जाणत होती. त्यामुळे विचारांचा खोटेपणा तिच्यात नव्हता. एकवेळ त्रास झाला तरी चालेल पण सतत भावनिक द्विधा मनस्थितीत राहणे हे तिला करायचं नव्हतं. त्याकडे जसा तिचा कल ध्येयाकडे झुकू लागला तसा काहीतरी एक निवडायचं ह्या निर्णयाप्रत ती आली. अर्थातच भावना आणि हृदयाला समज देऊन तिने आदित्यवरचे प्रेम हे गोड गुपित मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करायचं ठरवलं. पण हे तिला नक्कीच कठीण जाणार होतं. आयुष्यातलं पहिलंवहिलं प्रेम जे तिच्याकडे स्वतःहून चालत आलं होतं , ते नाकारणं म्हणजे मोठा निर्णय होता. पण ही रिस्क घ्यायची तिने ठरवलं. कारण काहीही झालं तरी उच्च शिक्षण आणि संशोधन ह्याबाबतीत तिला कुठलीही अडजस्टमेन्ट नको होती. जीवनध्येयासाठी प्रेमाचे आदित्यने पुढे उचललेले पाऊल मागे घ्यावे लागणार होते.
आदित्यला नकार देणे हे मात्र श्रुतीला कधीच शक्य झालं नसतं. त्याने थेट लग्नाचं विचारलं होतं. आपण जर त्याला नकार दिला तर तो कारण विचारेल, आपण त्याला जे काही आहे ते खरं कारण सांगू आणि मग तो convince करेल असं तिला वाटत होतं. ते convince करणं तिला टाळायचं होतं कारण त्याच्या बोलण्यामुळे ती पुन्हा confuse झाली असती आणि हे चक्र अविरत चालू राहिलं असतं.
ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी श्रुतीने वेगळाच पर्याय निवडला. परिस्थिती आहे तशी सोडून पळून जाण्याचा !

श्रुतीने आदित्यचा सहवास आणि संपर्क बंद करण्याचा निर्णय घेतला. एकाच कंपनीत काम करत असताना असे होणे जवळजवळ अशक्य होते. आदित्य कंपनीचा कारभार सांभाळत असल्यामुळे सगळ्यांबरोबर डील करत असे. त्याला टाळायचं असेल तर कंपनी सोडावी लागली असती आणि अशी तडकाफडकी नौकरी का सोडली ह्याबद्दल घरी काय सांगावे ह्या नवीन विवंचनेत श्रुती अडकली.


पण दैवाने तिची ह्या निर्णयात साथ दिली. अमेरिकेला एका नावाजलेल्या आणि मुळात भारतीय अशा कंपनीत तिच्या बाबांची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शक ह्या पदासाठी निवड झाली असं कळलं आणि काही दिवसातच श्रुतीने कंपनी सोडली. ती जेमतेम २ महिने नोटीस पिरेड वर होती. तिने ते २ महिने कसेबसे काढले, ती जाणार असल्यामुळे कामही खूप होतं. त्या कामाचा बहाणा होताच. आदित्यला वाटलं की श्रुती वेळ घेत आहे, तिला योग्य वाटेल तेव्हा ती नक्कीच प्रेमप्रस्तावाचं उत्तर देईल. ती अमेरिकेत जात आहे हे काही तिने सांगितलं नव्हतं. वैयक्तिक व कौटुंबिक कारण एवढंच सांगून तिने रिझाईन टाकलं होतं. ह्या विषयावर नंतर निवांत बोलता येईल म्हणून आदित्यनेही गंभीरपणे घेतलं नव्हतं. आपण गृहीत धरतो ना एखाद्याला आयुष्यात , तसं आदित्यने श्रुतीला नंतर विचारता येईल म्हणून गृहीत धरलं आणि मोठी चूक करून बसला. ह्या चुकीचे परिणाम तो विरहरूपाने भोगणारच होता. श्रुती कितीही दाखवत नसली, मनाला समजावत असली तरीही आदित्य तिच्या मनाचा हळवा कोपरा होता. ह्या कोपऱ्याने पूर्ण मन आणि आयुष्य व्यापू नये म्हणून ती दूर जात होती. पण तिला कुठे माहित होते की, असे दूर जाण्याने गोष्टी solve होत नाहीत म्हणून ! उलट जास्त कठीण होऊन बसतं सगळं !


ठरल्याप्रमाणे कुणाला काहीही न सांगता, न कळवता, सगळे नंबर बदलून, सोशल मीडियातुन बाहेर पडून श्रुती अमेरिकेला निघून गेली. तिच्या अशा वागण्याचं घरच्यांना पण आश्चर्य वाटलं. अभ्यासात अडथळा नको म्हणून नाही सांगितलं असं कारण ती घरी आई बाबा आणि दादा वहिनी ला सांगत होती. तिचा लहरी स्वभाव माहित असल्यामुळे कोणीही जास्त चौकशी केली नाही. श्रुती दादाची लाडकी होती. लहानपणापासूनच काहीही अडचण आली की त्याला सांगत असे. दादा दूर गेल्यापासून जरा कमी झालं होतं पण तिचा भावनिक आणि confused स्वभाव दादाला चांगलाच माहित होता. म्हणून तो तिच्यावर लक्ष ठेवत असे. दादाला शंका आली होती, त्याला सारखं असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे. त्याने एकदा चल तुला शहर दाखवतो म्हणून बाहेर नेले आणि खोदून खोदून काय झालं ते विचारू लागला. येथे मात्र स्वतःला खंबीर समजणारी श्रुती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने सगळं खरं काय घडलं ते दादाला सांगितलं. दादाला बहिणीने करिअर निवडलं म्हणून तिचा अभिमानही वाटला. पण तिने आदित्यला असं मध्येच सोडून यायला नको होतं असं दादा म्हणत होता.आदित्यबरोबर किमान एकदा बोलून घे असंही तो म्हणत होत. पण श्रुती मात्र ठाम होती. ती म्हणाली आता परत पुण्यात जाईन ते ध्येय पूर्ण करूनच!
—————————————————————————————————————-
“अरे बापरे सगळा वेळ विचारातच गेला म्हणायचा, आता काही महिने इथे राहायचं म्हणजे पुण्यात निवासाची व्यवस्था बघायला हवी.”
असं स्वतःशीच बोलत श्रुती विचाराच्या गर्तेतून बाहेर आली. स्वतःच्याच मनात डोकावून पाहिल्यामुळे जरा बरं वाटत होतं. पण त्याचवेळी आदित्यची आठवण आल्यामुळे हुरहूर वाटत होती. आता तिचे मन केवळ आदित्यविषयीच्या विचारांनी व्यापले होते.
“तो कुठे असेल, काय करत असेल. कंपनीच काय चालू असेल, त्याला माझी आठवण येत असेल का? त्याच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाले असतील. खूप वाईट वागले मी त्याच्याशी! कंपनीच्या प्रगतीच्या बातम्या कळतात तेवढाच काय तो अपडेट! बाकी मी काहीही माहित करून घेण्याच्या भानगडीत पडले नाही. एवढी कशी निष्ठुर झाले. पण आता वेळ निघून गेलीये कदाचित. इतकी वर्षे झाली, तो मला विसरला असेल. कदाचित त्याच्या प्रेमाला पात्र असणारी आणि त्याच्या भावनांची कदर करणारी दुसरी मुलगी त्याच्या आयुष्यात आली असेल तर ! “
ह्या शक्यतेने श्रुती एकदम दचकली. प्रथमच तिला खूप जास्त वाईट वाटले. पुण्यात आल्याचा उत्साह पार विरून गेला होता.
——————————————————————————————————————–


हर्षदा श्रुतीची बालमैत्रीण होती. तिच्याच घरी श्रुती राहायला सध्या आली होती. हर्षदा म्हणजे एकदम उत्साही, बडबडी मुलगी होती. तिच्याशी विविध विषयांवर गप्पा मारल्यामुळे श्रुतीला खूप बरं वाटलं. दोघी मस्त गावभर भटकून आल्या. वीकडे असल्यामुळे आणि कुठे जास्त गर्दीही नव्हती. हर्षदाने तर खास सुट्टी घेतली होती. बोलता बोलता श्रुतीने हर्षदाला सांगितले की तिला राहण्यासाठे जागा हवी आहे. मग काय! हर्षदच्या ओळखीत जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी त्या जाऊन आल्या. पण श्रुतीला जागा पसंद पडेना. तिला शांतता हवी होती, शिवाय जेवणाचा प्रश्न होताच. कधीही घर सोडून बाहेर न राहिलेल्या श्रुतीला घरगुती जेवण हवं होतं. शेवटी चार ठिकाणी विचारून ,चर्चा करून दोघींचं असं मत पडलं की श्रुतीने छोटासा फ्लॅट रेंट वर घ्यावा आणि तिथेच मनासारखे बस्तान मांडावे.
पण सगळ्याच गोष्टी तुम्ही जशा ठरवता तशा झाल्या असत्या, तर नशिबाला कुणी विचारलंच नसतं ना!
श्रुतीला कुठे माहित होतं की जे अर्धवट प्रश्न आणि गोष्टी तिने सोडल्या होत्या, त्या सर्वांची लवकरच तिला भरपाई करावी लागणार आहे !!
शेवटी ह्या जन्मी केलेल्या कर्माची फळं ह्या जन्मीच भोगावी लागतात, नाही का ?

(क्रमशः )
——————————————————————————————————-
**लेखिका : किल्ली उर्फ पल्लवी कुलकर्णी**
——————————————————————————————————-

error: Content is protected !!