दाल – बाटी ( सोपी_सविस्तर)

दाल – बाटी ( सोपी_सविस्तर)

लागणारे जिन्नस: 

बाटीसाठी साहित्यः
– गव्हाचं पीठ (६ पोळ्यांचं)
[नेहमी घरी पोळ्यांसाठी वापरतो ते पीठ घेतलं तरी चालेल, आपल्याला सोप्या पद्धतीने जास्त ताण न घेता रेसीपी बनवावयाची आहे. त्यामुळी पीठ मुळी जाडच पाहिजे, बारिक नको, रवाच पाहिजे अशा कही अटी नाहीत. साधी , सरळ सोपी भोळी भाबडी रेसीपी आहे. ]
– मक्याचं पीठ ( एका पोळीचं) (हे ऐच्छिक आहे, नसले तरी चालते)
– जीरे ( चवीनुसार, साधारण २ लहान चमचे भरून भेसळमुक्त जीरे )
[मी कधी कधी जीरे, मोहरी, मेथी दाणे एकत्र करून ठेवते. ते तसे येथे चालणार नव्हते, मिश्रणातील पदार्थ वेगळे करण्याच्या पद्धती शोधाव्या लागल्या असत्या. उपासासाठी वेगळ्या बरणीत साठवून ठेवलेले जीरे घ्यावेत, त्यात मोहरीची भेसळ नसते. ]
– ओवा ( चवीनुसार, साधारण २ लहान चमचे भरून)
– पिवळीधम्मक हळद (चवीनुसार, रंगानुसार)
– तेल किंवा तूप (शुद्ध साजूक तूप घ्यावे, उगाच कंजूसपणा करू नये)
– पिण्यायोग्य पाणी ( सामान्य तापमानाचे )
– खाण्याचा सोडा चिमूटभर

दाळ/दाल/वरण साठी साहित्यः
– तूरडाळ (घ्या तुमच्या हिशोबाने, २-३ वाट्या)
– कांदा १
– टमाटं १
– लसणाच्या सोललेल्या ६-७ पाकळ्या (देशी लसूण वापरावा मिळाला तर, छान स्वाद आणि सुगंध येतो)
– कढीपत्याची ५-६ पाने चुरडून
(ऐच्छिक आहे, उपलब्धता असेल तर ही चैन करता येते. नाहीतर कोथिम्बीर आहेच आपली बिचारी)
– फोडणीसाठी तेल
– मोहरी (चिमुटभर, भेसळ युक्त मोहरी चालेल, त्या निमितानी जीरे आणि मेथीदाणे पोटात जातात, पौष्टिक असतात)
– लाल तिखट पुड ( चवीनुसार, रंग जास्त आणि तिखटपणा कमी असणारी पुड वापरा)
– मीठ (चवीनुसार -आयोडिन नमक)
– धणेपुड ( चवीनुसार- चिमुटभर)

पाककृती: 

ही रेसीपी अगदी घरी नेहमी उपलब्ध असणार्‍या जिन्नासांचा वापर करून बनवता येते. जास्त उपद्व्याप करायला नकोत आणि घरच्या घरी इच्छा झाली की कमी वेळात आणि आहे त्या साहित्यात (आपल्याच कथा/कविता, जाऊदेत पांचट जोक!) बनवून खाता यावी हा सरळ साधा उद्देश आहे. हे ऑथेंटिक राजस्थानी वगैरे प्रकरण नाही. मनात भाव मात्र राजस्थानी कुझीन बनवत आहोत आणि निगडीला जाण्यायेण्याचे पैसे, आपला नम्बर कधी येइल ह्या गोष्टीची वाट पाहण्याचे कष्ट वाचवत आहोत असेच असावेत. तरच ही पाकृ चविष्ट होते. नाकं मुरडून केलीत तर तो नकारात्मक भाव व बोर चव अन्नात उतरते. [ म्हणा, मी दालबाटी करून खाणारच!]

चला आता नेमकं करायचं काय ते बघुया का?

१. कुकर मध्ये एका डब्यात धुतलेली तुरडाळ, त्यात थोडसं पाणी ( ही स्टेप का लिहीतेय मी? असो) , किंचित हळद, घालून शिजण्यास ( कुकर स्वतः वरण शिजवतो, आपण शिट्ट्या मोजायच्या) ठेवावी. ही डाळ चांगली शिजावी म्हणून कुकरला नेहमीपेक्षा १-२ शिट्ट्या जास्त द्याव्यात.
येथे तुम्ही डाळ शिजवतानाच त्यात टमाटं घालु शकता. त्याचे चार भाग करून तेही डब्यात ढकलून द्यावे.
२. डाळ शिजेपर्यन्त आपण बाटीसाठी कणिक मळून घेऊ.
बाटीसाठी लागणारे सर्व जिन्नस एका टोपात किंवा परातीत एकत्र मिसळून घ्यावे.
३. तूप गरम करून घ्यावे. हे तूपाचं(साधारण 1 छोटी वाटी) मोहन कणकेत घालून आणि पाणी घालून चांगले एकजीव करून मळून घ्या. कणिक पोळ्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट भिजवायची आहे. ( पण कणकेचा दगड नको)
४. कुकर झालय का ते पाहा. आच बंद करा.
५. बाट्या बनवण्यासाठी कणकेचा रोल बनवावा लागेल. त्यासाठी तो चपटा करून गुंडाळी करावी. ( फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे)
हा रोल छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावा.
[हे स्टेप ऐच्छिक आहे. तुम्ही सरळ पीठाचे गोल गोळे बनवून त्या गोळ्यांना बाट्या असं म्हणू शकता किंवा पुरणपोळी करताना पुरन भरुन हळुहळू उंडा बंद करतो तसेच पुरण न भरता बाटी आतुन किंचीत हॉलो केली की भाजल्यावर छान खुसखुशीत होते.]

६. बाट्या कुकरच्या डब्यात ठेवुन वाफवुन घ्याव्यात.
[स्टीमर असेल तर तो वापरावा. नसेल तर, आधी वापरलेले कुकर थंड झाले आहे ह्याची खात्री करून डाळीचा डब्बा बाजुला काढुन (ह्या स्टेप ला लगोलग डाळ घोटुन ठेवलीत तर उत्तम!) तेच कुकर वापरावे. डब्बा दुसरा घ्यावा. मी काय केले असेल? माझ्याकडे २ कुकर आहेत 

Proud

 मी वाफवण्यासाठी दुसरा कुकर घेतला. 

Happy

 ]

७. वाफवलेल्या बाट्या शुद्ध साजूक तुपामध्ये किंवा तेलामध्ये खरपूस तळून घ्याव्यात. ( क्रिस्पी/ कुरकुरीत झाल्या तरच पाकृ यशस्वी. )
[तुमच्याकदे मावे असेल तर त्यात ह्या बाट्या बेक करून घ्या. माझ्याकडे नाहीये, मला माहित नाही मावेत कसं करायच ते]

दाल/डाळ:
१. फोडणीसाठी तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. ती तडतडली की जिरे घाला. जिरे लाल झाले की ठेचलेल्या लसणीच्या ३-४ पाकळ्या, कढीपत्याची चुरडलेली पाने घाला.
२. लसूण परतला की त्यात मघाशी (शिजलेल्या टमाट्यासहित) घोटुन ठेवलेली डाळ घाला. पण जरा जपुन हा, गरम तेल हातावर उडण्याची शक्यता असते, बेतानेच करावे हे काम!
३. डाळ पळीने हलवुन घ्या. मिक्स झाली की त्यात मीठ, तिखट, धणेपुड घालुन एकजीव होइल अस हलवुन घ्या.
४. थोडेसे पिण्यायोग्य पाणी घाला, २-३ लसणीच्या अख्ख्या पाकळ्या घाला आणि खळखळून उकळी आली की आच बंद करा

अरेच्चा! हे तर नेहमी करतो तसे फोडणीचे वरण! [हे असं ह्यावेळी म्हणायच नाही, दाल/डाळ असच म्हणायच. कारण आपण वरण भात नाही तर दाल बाटी खाणार आहोत म्हणून!]

बारिक चिरलेला कान्दा/कोथिम्बीर, लिम्बाची फोड आणि एका वाटीत (हो हो वाटीत आणि हो , माझ्या फोटोत तुपाची वाटी शोधु नये) साजुक तुपाबरोबर सर्व्ह करा.

टिपा

१. ही साधी काढीव पाकृ आहे, तरीही चवीला उत्तम होते.
२. मावे मध्ये बाट्या बेक केल्या तर आणखी फास्ट होईल.
३. चिरोट्याला रोल करून वळकटी बनवतो तसं करुन वाफवलं तर मस्त लेअर्स पडतात.
४. इडली पात्रात सुद्धा बाट्या वाफवता येतात. प्रत्येक इडलीच्या खाचेत बाटे ठेवुन द्यायची
५. तुपात तळली तर जास्त चवदार होते. घरी कढवलेलं साजुक तुप वापरता आलं तर भारीच!
६. ह्या बाट्या नुसत्या सुद्धा छान खमंग लागतात चवीला, खाऊन बघा एखादी.
७. उरल्या तर पाकृ अयशस्वी असं समजु नका, एखाद्या चाळनीने झाकुन ठेवा म्हणजे वातड होणार नाहीत आणि नन्तर खाऊन संपवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!