दुपार

दुपार

प्रकरण १

भर उन्हाळ्यातली दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन, तापलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा ह्या टिपीकल उन्हाळ्यातच घडणाऱ्या बाबींनी जेरीस आणलं होतं. तिचं मन कासावीस होत होतं. जिकडे बघावं तिकडे रखरखाट नुसता!  मध्येच एखादं हिरव्याकंच पानांच्या वैभवाने नटलेलं झाड दिलासा देऊन जाई. पण तेवढ्यापुरतं तेवढंच. तहान तर जन्मोजन्मी पाणी न प्यायल्यासारखी लागत होती. सतत घसा कोरडा पडत होता. जवळचं पाणीही संपत आलं होतं. जे होतं तेही गरम झालं होतं. कधी एकदा घरी पोचतेय आणि घटाघटा गार पाणी पितेय असं तिला झालं होतं. पण महामंडळाच्या बसेस वेळेत कुठल्या पोचायला? बस चुकायची असेल तेव्हा मात्र वेळेवर निघून जातात. पण आपण बसलो असताना नेमका उशीर करतात, हळूहळू जातात. मध्येच बंद काय पडतात. एक ना अनेक गोष्टी. पण आज काहीही करून लवकर घरी पोचलंच पाहिजे. एक बरंय, नशिबाने खिडकीची जागा मिळालीये.  नाहीतर गर्दीत गरमीने जीव घुसमटतो. असं वाटत श्वासच घेऊ नये. वारं येत असलं तर श्वास कोंडतही नाही. गाडी लागण्याची शक्यताही कमी होते.

तिच्या विचारांचा ओघ गाडीच्या वेगाबरोबर पळत होता. गाडीच्या मागच्या बाजूला बसल्यामुळे तिला धक्के जरा जास्तच जाणवत होते. छोट्या छोट्या गावांना जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यावरून प्रत्येक खड्ड्याची शरीराच्या हाडांना जाणीव करून देत महामंडळाची लाल परी धावत, छे धावत कसली, उडत होती.  ती घाईघाईत गावाला जायला निघाली होती. त्यामुळे धड जेवण झालं नव्हतं. कडाडून भूक लागली होती. एखादे बरे स्टेशन आले कि काहीतरी चारीमुरी खाऊन घेऊ असा विचार करून ती गप्प राहिली होती. असंही तिच्याकडे थोडेसेच पैसे होते. ते खाण्यावर खर्च झाले तर घरी काय आणि किती देणार हा प्रश्न होता. तिने तिकिटाचेच पैसे कसेबसे जमवले होते.प्रत्येक रुपयाची किंमत तिच्यासाठी लाखमोलाची होती. ह्या गाडीला तिकीट कमी म्हणून एक्सप्रेस सोडून ती ह्या प्रत्येक स्टॉपवर थांबणाऱ्या बस मध्ये बसली होती. जरा जीवाला बरे वाटावे, उपाशी पोटी पित्त वाढून मळमळ होऊ नये म्हणून तिने वाऱ्याच्या उष्ण झळा सोसत खिडकीत बसणे पसंत केले होते. खिडकीच्या खिळखिळ्या तावदानांचा खडखड आवाज, वाऱ्याचा आवाज, गाडीच्या इंजीनाचा आवाज ह्या सगळ्यांनी त्या प्रवासाला एक लय प्राप्त करून दिली होती. बाटलीचे झाकण उघडून एक घोट पाणी प्यायली तशी तिला थोडी हुशारी आली. दुपारची वेळ असल्यामुळे बसमध्ये त्यामानाने गर्दी कमी होती. यातल्या त्यात हे एक बरं वाटलं तिला. 

भरभर वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर तिचे केसही उडत होते. एका हाताने केस सावरत दुसऱ्या हातात तिची पिशवी घट्ट धरून ती बसली होती. स्वतःचे आयुष्य ह्या उन्हाळ्यातील दुपारच्या वेळेप्रमाणे आहे असे तिला वाटले. नुसता रखरखाट! अवचित येणाऱ्या पावसाच्या सरीची वाट पाहण्याचा अगतिकपणा किती दाहक असतो हे त्या आग सहन करण्याऱ्या उघड्या बोडक्या माळालाच माहित. तसंच झालंय. ह्यातून सुटका होईल का?

ह्या अशा विचारांनी ती अधिकच निराश झाली.

तिचं गाव दुष्काळी भागातलं. पाणीटंचाई कायमच पाचवीला पुजलेली. गावात शिक्षणाची सोय असली तरी त्या मानाने उद्योगधंदे कमी होते. ती बऱ्यापैकी शिकलेली होती. थोडंफार इंग्रजी येत होतं. त्याच्या बळावर तिने तालुक्याला एका खाजगी दवाखान्यात रिसेप्शनिस्टची नौकरी धरली होती. दवाखाना फार मोठा नव्हता. जेमतेम पगार मिळत असे. त्यात ती स्वतःचे खर्च भागवून कुटुंबासाठी बचत करत असे. खरेतर असं म्हाताऱ्या आई वडिलांना घरी सोडून तालुक्याला राहणे तिला परवडत नव्हते व आवडतही नव्हते. पण सध्यातरी उत्पन्नाचे दुसरे साधन मिळेपर्यंत तिला ही नौकरी करणे भाग होते.गावातच एखादा छोटासा व्यवसाय करावा असे तिच्या मनात होते. पण भांडवल उभे करण्यासाठी पैसे कुठून आणणार?

खरेतर तिच्या हातात कपडे शिवण्याची कला होती. स्त्रियांचे ड्रेसेस ती सुरेख शिवत असे. dress designer होण्याचे तिचे स्वप्न होते. पण त्या क्षेत्रात ती शिक्षण घेऊ शकली नाही. फॅशन क्षेत्रात तिचे डोके खूप चालत असे. नवीन काय ट्रेंड्स आलेत, कशाची फॅशन कुणाला चांगली दिसेल ह्या गोष्टी तिला सहज सुचत आणि जमत. साधा कुर्तासुद्धा ती सफाईदारपणे शिवत असे.

पण सगळ्यांचीच सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत. आपल्या अधुऱ्या स्वप्नांना उराशी बाळगत तिने वर्तमानातील वास्तव स्वीकारले होते. असंही काही दिवसात घरचे त्यांना जमेल तसं आणि वाटेल तसं तिचं लग्न लावून देणार होते. तिचा होणारा नवरा तिला एकदाच भेटला होता. त्या एकाच भेटीत तिच्याशी खूप तुसडेपणाने वागला. पण त्याला घरच्या सगळ्यांनी तिच्यासाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं होतं. ती काही बोलूच शकली नाही. सगळंच आपलं प्रारब्ध असं समजून ती निमूटपणे समोर येईल ते स्वीकारत राहिली. स्वतःच आयुष्य रखरखीत असणार हे गृहीत धरलं की जास्त त्रास होत नाही असं तिला वाटत असे.

प्रकरण २

तिच्या वयाच्या मुली तारुण्यसुलभ स्वप्ने पाहतात. आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल, सुखी संसाराबद्दल मनात विशिष्ट चित्र उभे करतात. तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वारस्य वाटेनासं झालं होतं. ती जेथे काम करत होती त्या दवाखान्यात बऱ्याचदा डॉक्टरांना भेटायला जोडपी येत. डॉक्टरांच्या खोलीच्या बाहेर आत जर आधीच कोणी रुग्ण असतील तर इतर रुग्णांसाठी त्यांचा नंबर येईपर्यँत बसायला बाके टाकली होती. तिथे बसून एकमेकांसोबत गुलुगुलु बोलणारी जोडपी असत, चेहऱ्यावर ताण घेऊन वावरणारी वृद्ध मंडळी असत, लहान मुले असत. त्यांना पाहून कधीकधी तीही संसारसुखाच्या विचारात गुरफटू लागे. मग अचानक स्वतःला समजावून त्यातून बाहेर येई. स्वतःच्या आयुष्याच्या जोडीदाराच्या काही कल्पना किंवा अपेक्षा तिने ठेवल्याच नव्हत्या. आयुष्य एका विचित्र उदासीनतेने आणि यांत्रिकतेने रेटत होती.

कंडक्टरने बेल दिली,ड्रायव्हरने गचकन ब्रेक मारला आणि गाडी किर्र्रकिर्रर आवाज करत थांबली. गाडीच्या मागच्या बाजूने काळा धूर आणि त्याचा टिपीकल एसटी स्पेशल वास वातावरणात घुमला. त्या वासाने तिला ओकारीसारखंच झालं अगदी. ह्यावेळी तर पाणीही प्यायली नाही ती. तशीच बसून राहिली. गावी पोचायला अजून थोडा वेळ होता. ह्या स्थानकावर गाडी थांबली आणि बरीच गर्दी बसमध्ये घुसली. हो, घुसलीच म्हणावं लागेल. कारण एवढ्या गरमीतही रेटारेटी करून रिकाम्या बसमध्ये लोकं चढत होती. कुणी खिडकीतून रुमाल फेकून जागा अडवत होतं तर कुणी बाळाला सीटवर ठेवून जास्तीत जास्त जागा व्यापण्याचा प्रयत्न करीत होतं. खिडकीच्या आणि समोरच्या रांगेतील जागांसाठी बाचाबाची आणि भांडण सुरु झाली होती. मागची जागा रिकामी असूनही समोर बसण्यासाठी लोकांमध्ये जुंपली होती. बाहेर विक्रेत्यांची आरडाओरड सुरु होती. तेलकट भजे, समोसे, खरमूरे, वटाणे, फुटाणे, पॉपकॉर्नची पाकिटं, थन्ड पेये, केशरी रंगाच्या संत्र्या गोळ्या, चक्रीच्या आकारातले चिप्स, थंड पाण्याचे पाऊच आणि बाटल्या इत्यादी विकणाऱ्यांची झुंबड उडाली होती. स्टॅन्डवर आताच आलेल्या बसेसमुळे धुरळा उडाला होता. सगळ्या स्थानकांवर असतो तसा कोलाहल, एक मिश्र वास व्यापून राहिला होता. त्या सर्व वातावरणाने तिला कससंच होत होतं. आता मात्र हिंमत करून तिने पाणी विकणाऱ्याकडून ५ रुपयांचे पाणी पाऊच विकत घेतले. ते गारगार पाणी ती घटाघटा प्यायली. थंड पाणी प्यायल्याने तिला बरे वाटले. पण पैसे खर्च झाल्याचे दुःख होतेच. शेवटचा निर्मळ आनंद तिने कधी उपभोगला होता हे तिलाही ठाऊक नव्हते. परिस्थिती माणसाचा स्वभाव बदलून टाकते हे खरेच आहे. नेहमी दुःखात असणाऱ्याला सुखाचे क्षण आले तरी त्यांचा नीट आनंद घेता येत नाही. त्यांना सतत भीती असते, मनावर टांगती तलवार असते.

चालक वाहक आले. गर्दी स्थिरस्थावर झाली तशी सर्वाना पोटात घेऊन बस तिथून निघाली आणि लगोलग तिच्या गावी पोचलीसुद्धा! इकडे ह्या भागात नवीनच डांबरी रस्ता झाला होता. त्यामुळे गाडी वेगात आली. आपल्या हातातल्या पिशव्या सावरत ती बसमधून उतरली. भयंकर भूक आणि उकाड्याने जीव हैराण झाला होता. पण घरी तर पायीच जाणे भाग होते. काळ्याकुळीत डांबरी रस्त्यामुळे अधिकच झळा जाणवत होत्या. घामाच्या धारा वाहत होत्या. केस घामाने चिकट झाले होते. वाऱ्याचा मागमूस नव्हता. रस्त्याच्या कडेने झाडेही नव्हती कि ज्यांच्या सावलीच्या आधाराने चालत जाणे सुसह्य होईल. पण छे, असे काहीच नव्हते. कसेबसे भराभर पाय उचलत ती घराकडे निघाली. मुख्य रस्त्या सोडून आतल्या बाजूला वळली तसा उष्मा थोडा कामे झाल्यासारखा वाटला. वस्तीच्या भागातून झपाझप पावले उचलणे आता जमू लागले होते. सुमारे २० ते २५ मिनिटे चालून ती एकदाची घरी पोचली. नळाला पाणी आलेले होते, शासनाने नुकतीच पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळांची सोय केली होती. नाहीतर आधी दुरून हापशावर जाऊन हापसून पाणी आणावे लागे किंवा टँकरच्या मागे धावावे लागत असे. दारातच बाबांना पाहून तिथेच थबकली ती. ते वाट पाहत होते. त्यांनी तिच्या हातातून पिशवी घेतली. कॅरीबॅगच्या त्या प्लास्टिकचा आवाज करत ते पिशवी चाचपडू लागले.
“काय करायलात बाबा, त्यात काही नाही, फक्त अंगूर आणले. आत कागदात गुंडाळलेले असतील. आई ते पाण्याने धुइ गं अन मग दे त्यांना, तू पण घे”

अंगूर तिच्या बाबांना फार आवडत असत. त्यांची ही इच्छा ती नेहमीच पूर्ण करत असे.
अंगूर खाता खाता बाबा म्हणाले, “अगं पोरी, तुला चंद्रमा बंगल्यावर बोलवायलेत. त्यांची ताई आली शहरातून, ती काम देणारे शिलाईचं तुला असं काहीतरी जावईबापू म्हणत होते. जाऊन ये सांच्याला.”

तिचा होणारा नवरा निरोप घेऊन आलाय म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार हे तिने ताडले. कारण तो चंद्रमा बंगल्याच्या मालकांकडे काम करायचा. त्यांचा PA, driver आणि वेळ पडली तर इतरही बारीकसारीक कामे करायचा. ह्याआधी चंद्रमा बंगल्यावर ती कधी फिरकली नव्हती. पण तिथल्या श्रीमन्तीची वर्णने तिने ऐकली होती. तिथे छान बाग होती, घरकामाला नोकरचाकर होते. त्यांची मोठी मुलगी शहरात शिकायला गेली होती. काही काळ तिने शहरात नौकरी सुद्धा केली होती. आता तिचं स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं चाललं होतं आणि तिच्या आईबाबांचा तिला पूर्ण पाठिंबा होता. त्याच संदर्भात काम असावे असा विचार करून तिने ताईला भेटायला जायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच बऱ्यापैकी ड्रेस घालून ती चंद्रमा बंगल्यावर जायला निघाली.
“हे काम भेटलं तर छान होईल, इथंच राहता येईल तुला, आम्हाला आमची पोरगी आमच्याजवळ राहिली तर ख़ुशी होईल बघ. घे ताईचं काम”

“आईचं म्हणणं बरोबर आहे, खोलीचा किराया वाचेल. शिवाय घरचं खाता येईल. काही पैसे बाजूला पडतील, लग्नाचा खर्च आहेच पुढे चालून, त्याला मदत करता येईल. नाहीतर आईबाबांना काहीतरी विकावं लागेल. विकायला काय आहे म्हणा, जिरायती शेताचा तुकडा, तोही भावकीतल्या भांडणात अडकलेला. जाऊ दे, नको हे विचार आता. काम काय आहे ते नक्की कळलं पाहिजे. मग बघू, असा विचार करून ती घरातून निघाली.

छानच होता बंगला. त्यांच्या गावाच्या मानाने खूपच पॉश असा. ह्या रुक्ष उन्हाळयात हा परिसर डोळ्याला थंडावा देणारा होता. छान बाग केली होती. gate च्या बाहेरही काही झाडे होती. सुंदर फुलझाडं लावली होती, काही शोभेची झाडं होती. ह्या घरात नक्कीच स्वतःची बोअरवेल असणार त्याशिवाय झाडांना द्यायला पाणी कुठून येणार. इथे गावात तर पिण्याच्या पाण्याची बोम्ब आहे.
ती gate उघडायला गेली आणि गेटबाहेरच्या एका झाडापाशी थबकलीच. त्या झाडावर सुंदर अबोली रंगाची पाच पाकळ्यांची फुलं होती. त्या फुलांना सुवास असा नव्हता पण दिसायला खूपच सुंदर होती. दुपारीचं फूल!! ह्या फुलासारखं आपलंही स्थान सध्यातरी ह्या बंगल्याबाहेरच!

ती आत गेली. watchman ला म्हणाली, ताईने बोलवलंय. नाव पत्ता लिहून घेऊन मगच त्याने घरात पाठवलं. तिथे बंगल्याच्या मालकीणबाई होत्या. सगळेजण त्यांना काकू म्हणत. काकूंनी तिला बसायला सांगितलं. प्यायला पाणी दिलं. काकू म्हणाल्या
“गावातल्या ४-५ पोरी येऊन गेल्या आताच कामासाठी, तू कोण? “
“मी भानू, इथे राहते कोपऱ्यावरच्या गल्लीत.”
“रश्मीताईने बोलवलंय ना तुला की स्वतःहून आलीस?
“बोलवलंय “
“बरं बस, येईल ती.”
असं म्हणून काकू आतमध्ये निघून गेल्या.
भानू आजूबाजूला बघत बसली. त्या मऊमऊ कोचावर तिला अवघडल्यासारखं झालं होतं. खरंतर तिला त्यावर मस्त रेलून बसायचं होतं, पण काम मागायला आलोय आणि असं बरोबर दिसणार नाही म्हणून ती अंग चोरून एका कोपऱ्यात बसली होती.

“डायरेक्ट कामाचं बोलते, तूच भानू ना?” रश्मीचा आवाज आला.
तिने वर पाहिलं. हो म्हणाली.
“शिवण करता येते तुला, बरोबर?”
“हो, सगळं येतं. बायकांचे सगळ्या प्रकारचे कपडे, बेडशीट्स, चादरी, बाळाचे कपडे, एक दोन वेळेला घरी बाबांचे शर्ट सुद्धा शिवले आहेत.”
“सगळ्यात चांगलं शिवणकाम काय येते तुला? “
“ladies कुर्ते, पंजाबी ड्रेस, ब्लाऊझ वगैरे”
“हे बघ, शिवणकामच करायचं आहे, एकच अट, अजिबात डोकं लावायचं नाही. मी जशी सांगेल same तशीच design केली पाहिजे.हे जमलं तर पुढचं काम देईन. तुला किती छान शिवता येतं हे पाहण्यासाठी तुला आता माझ्या मापाचा मी दिलेल्या कापडाचा एक कुर्ता शिवावा लागेल. आवडला तर काम देईन आणि आताच्या कुर्त्याचे वेगळे पैसे सुद्धा देईन. मला नाही आवडला तर घरी घेऊन जा आणि इथल्या कामाचं विसरून जा. बघ जमते का?”
“चालेल मला. पण जर तुम्हाला मी केलेलं शिवणकाम आवडलं तर मलाही काही बोलायचं आहे, ते फक्त ऐकून घ्या एकदा ताई”
रश्मीने डोळे विस्फारले आणि म्हणाली,
“ठीक आहे. हे घे कापड आणि हे माप. चल तुला, machine दाखवते. लाग कामाला”

—————————————————————–
(क्रमशः )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!