
नाचणी – वाळकाचे पौष्टिक थालीपिठ
घटक:
2 किसलेले वाळूक/वाळूख – (वाळूक नसेल तर मध्यम आकाराची किसलेली काकडी २ )
[वाळूक ही काकडीसारखी फळभाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मराठवाड्यात सहज मिळते. पुण्यात कधी दिसले नाही. ह्याची चव जराशी आंबूस असते. बाकी गुणधर्म काकडीसारखे असतात. बिया वाळवून नंतर सोलून खातात. वाळकाचे लोणचे, कोशिंबीर असे विविध पदार्थ करता येतात. उपासाला चालते.
वाळूक किसण्यासाठी त्याचे मधोमध चिरून ८ भाग करावेत. बिया कढून टाकाव्यात. फोडीच्या मागच्या भागाला किसणीवर धरून किसावे. साल शिल्लक राहते व गर किसला जातो. ह्या पद्धतीने काकडी, दुधी सुद्धा किसता येतो.]

नाचणीचे पीठ – दिड वाटी
ज्वारीचे पीठ – २ वाट्या
चणाडाळीचे पीठ – १ वाटी
गव्हाचे पीठ – १/२ वाटी (ऐच्छिक)
ओवा – चिमूटभर, चवीनुसार
तीळ – चिमूटभर, चवीनुसार
जिरे – चिमूटभर, चवीनुसार
हळद – चिमूटभर, चवीनुसार
लाल तिखट किंवा चिरलेली हिरवी मिरची – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
ठेचलेल्या लसणाच्या ५-६ पाकळ्या
कढीपत्ता – वाळवून चुरडलेला – अर्धी मूठ
उभा चिरलेला कांदा १ (ऐच्छिक)
तेल – कडेने सोडण्यासाठी आणि थापण्यासाठी (ग्रीसिंग )
पिण्यायोग्य पाणी
पाककृती:
१. सर्व पीठे एकत्र करावी.
२. पिठात चवीचे साहित्य घालून चांगले मिसळावे.
३. त्यात किसलेले वाळूक/काकडी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. ताजी आणि रसदार फळभाजी असेल तर नंतर पीठ मळून घेण्यास पाणी कमी लागते आणि चव चांगली येते.
४. बेताने थोडे थोडे पाणी टाकत पीठ मळून गोळा बनवावा. थालीपिठ थापता आले इतपत consistency असावी.
५. जाड बुडाच्या पॅनला (नॉनस्टिक असेल तर उत्तम ) थोडे तेल लावावे
६. मळलेल्या पिठाचा गोळा हातावर चांगला गोल करून थोडासा पसरवून घ्यावा. हा चपटा गोळा पॅनला आतल्या बाजूने गोलाकार थापून घ्यावा. हाताला थोडेसे तेल लावावे म्हणजे पीठ चिकटणार नाही.
७. पॅन वर झाकण ठेवून मोठ्या आचेवर थालीपिठे उलट सुलट भाजून घ्यावीत.


टिपा:
– गरम गरम असताना घट्ट ताज्या दह्याबरोबर थालीपिठाचा आस्वाद घ्यावा.
– ही थालीपिठे पोटभरीची आहेत, थोडी हेवी होतात. त्यामुळे कमी पचनशक्ती असलेल्या लोकांनी जरा जपून खा!
– थालीपीठाला थापून झाल्यानंतर ५-६ छिद्रे पाडून त्यात आणि कडेने तेल सोडल्यास चव आणखी खुलते
-थालिपिठ जरा झाकण ठेऊन वाफ आणून शिजलं की मग झाकण काढून, वरून जरास्सं तेल सोडून खमंग होईतोवर ठेवावं. त्यानं ते कमी तेलात असूनही चामट आणि कोरडं होत नाही .