
पॅचअप – शतशब्दकथा
“खरं सांग, तू अजूनही भेटतेस त्याला? चोरून? “
महान पातकाची कबुली द्यावी तशी मान खाली घालून ती पुटपुटली.
“कधी कधी.”
“पण तू त्याच्याशी रीतसर ब्रेकअप केलं होतंस”
“मला त्याची आठवण येते. एकेकाळी भरभरून प्रेम केलंय रे”
“एकांतात भेटलात?”
“एकदाच. दोन-तीन वेळा मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा भेटलेय”
“आवर स्वतःला.”
“प्रयत्न केले. जमत नाहीये. विशेषतः अशा धुंद पावसाळी संध्याकाळी त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण…. “
“बास.. मला काहीही ऐकायचं नाहीये. एवढंच सांगतो, विसर त्याला”
“पहिलं प्रेम विसरता येतं?”
“तुझ्या पुढाकाराने ब्रेकअप झालं ना? मग आता अशी का वागतेयस?”
“नाही सांगता येणार. पण मी आता पॅचअप करणारे हे नक्की.”
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असं म्हणून तिने वाफाळत्या चहाचा कप उचलला.
——————————————————————————–
**किल्ली**
——————————————————————————-
संदर्भासाठी ब्रेकअप कसं झालं हे येथे वाचा.
One thought on “पॅचअप – शतशब्दकथा”
मस्तच…. खुप छान आहे.