हिरवेगार समोसे

हिरवेगार समोसे

ह्या पाककृतीला मायबोली गणेशोत्सव २०२१ ह्या इव्हेंटमध्ये ‘पाककृती स्पर्धा २ : पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ ‘ ह्या विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

साहित्य :
१जुडी पालक,
(निवडून, देठे काढून स्वच्छ धुतलेली पाने )
गव्हाचे पीठ – ४ वाट्या,
लसणीच्या पाकळ्या – तीन ते चार,
मुगडाळ – २ टे स्पून,
बडीशेप – एक टी स्पून,
गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद – चवीनुसार / आवडीनुसार,
ओवाजीरे भाजून त्याची पूड – चिमूटभर,
अद्रक – छोटासा तुकडा, ठेचून किंवा पेस्ट करून
तळण्यासाठी तेल,
पिण्यायोग्य शुद्ध स्वच्छ पाणी,
चालू स्थिती तील गॅस शेगडी / induction / चूल / स्टोव्ह इत्यादी पैकी काहीही एक,
आवश्यक भांडी व उपकरणे,
संयम व चिकाटी,
अंगभूत खादाडपणा (#foodie )

…………………………………………………..

क्रमवार पाककृती:
१. मुगडाळ पाणी घालून (2तास) भिजवत ठेवा.
२. एका कढईत पालकची पाने (20-25 निघतात एका जुडी मध्ये) थोडेसे चमचाभर तेल घालून वाफवून घ्या. पाणी अजिबात घालायचे नाही
३. पूर्ण वाफवल्यानंतर थंड करून मिक्सर मधून फिरवून पेस्ट बनवून घ्या.
४. ह्या पेस्ट मध्ये चवीनुसार तिखट, मीठ, ओवाजीरे पूड व एक चमचा तेल घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
५. गव्हाच्या पिठात हिरवी पालक पेस्ट घालून चांगले मळून कणकेचा गोळा करून घ्या.
पाणी घालण्याची गरज नाही.


६. आता हिरवा कणकेचा गोळा झाकून ठेऊन सारण करायला घ्या.
७.सारणासाठी आधी फोडणी करावी लागेल. एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. ते तापलं की जिरे, जिरे फुलले की बडीशेप, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद व गरम मसाला घालून परतून घ्या.
८. ह्यात भिजलेली मुगडाळ घालून अर्धी वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आली की 4 चमचे चणाडाळीचे पीठ / बेसन घालून व्यवस्थित हटवून घ्या (पिठलं हटवतो तसे )
९. हे मिश्रण हटवल्यानंतर ते चांगले घट्ट होईल.
सारण तयार झाले.
ओळखीचे वाटत आहे का? 

Proud

(हे कशाचे सारण आहे ओळखणाऱ्यांना बावधन गाव इनाम )

Happy

 


१०. आता समोसे करायला घ्या. पारी तयार करण्यासाठी हिरव्या कणकेच्या गोळ्याचा एक उंडा घ्या. पोळी लाटून घ्या.


११. गोल पोळीचे मधोमध कापून दोन अर्धचंद्राकार तुकडे करा. एक तुकडा उचलून त्यात चमचाभर सारण भरा
१२. पारी दुमडून टोक बंद करत समोशाचा आकार द्या.
अशाच प्रकारे इतर सर्व समोसे बनवून घ्या
१३. तळण्यासाठी कढईत तेल घ्या. गॅस शेगडी चालू करा. तेल जरासे गरम/कोमट (आठवा : बालुशाही तळताना झालेली तेलाच्या तापमानाची चर्चा, same प्रकारे तळायचं आहे ) होताच त्यात समोसे सोडा.
गॅसची आच मध्यम असू द्यात.


१४. तळून झाले की हे समोसे गरमा गरम किंवा थंड गार करून(संयम असेल तर) किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत किंवा नुसतेच कसेही फस्त करा.

टीप : कणकेत आवश्यक वाटल्यास दही किंवा ताक घालू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!